दुर्लभ भारते जन्म...

    27-Oct-2023   
Total Views |
Danish Kaneria revelations shows reality of Pakistan

”इरफान पठाणला भारताच्या बहुसंख्य हिंदूंना खूश करायचे होते. त्यांची भीती वाटूनच तो पाकिस्तानच्या पराजयात दुःखी न होता खूश आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करत होता. जर इरफानने तो पाकिस्तानच्या विरोधात आहे हे दाखवले नसते, तर त्याला भारतात जगणे मुश्किल झाले असते.” नुकत्याच क्रिकेट विश्वचषकात झालेल्या अफगाणिस्तान-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा दारूण पराभव केला.

तेव्हा अफगाणिस्तान क्रिकेट टिमच्या जल्लोषात सामील होत भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाननेही आनंदी होत अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खानसोबत बेभान नृत्य केले. यावर पाकिस्तानी रिल्समध्ये एकाने केलेले हे वक्तव्य केले. इरफान मुस्लीम आहे, म्हणून भारतात त्याला पाकिस्तानी विरोधी हिंदूंना खूश करण्यासाठी असे करावे लागते, असेच पाकिस्तान्यांचे म्हणणे. खरे तर जसे आपण असतो, तसेच जग दिसते. पाकिस्तान्यांना वाटते, त्यांच्यासारखे भारतातही अल्पसंख्याकांवर दडपशाही केली जात असेल. मात्र, नुकताच या पाकिस्तान्यांना घरचा आहेर मिळाला आहे.

पाकिस्तानचा माजी हिंदू क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने नुकतेच एक खळबळजनक विधान केले. तो म्हणाला की, ”पाकिस्तानचा माजी कप्तान शाहिद आफ्रिदी धर्मांतरासाठी माझ्यावर दबाव टाकायचा. तसेच, दररोज सकाळच्या वेळी नमाज पढण्यासाठी ये, असा निरोप देणारा फोनही केला जायचा. इतकेच काय तर शाहिद आफ्रिदी आणि पाकिस्तानचे काही खेळाडू माझ्यासोबत कधीही जेवायला बसत नसत. मी धर्मांतर करून मुसलमान झालो असतो, तर आज कदाचित पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कॅप्तानही होऊ शकलो असतो.” दानिशच्या या वक्तव्याने पाकिस्तानच्या धर्मांधतेचे पितळ पुनश्च उघडे पडले. पण, ते आताच उघड पडले असे तरी कसे म्हणावे? कारण, मुस्लीम देश कुराण आणि शरिया याव्यतिरिक्त पाकिस्तानने कधीही आपल्या देशात दुसर्‍या धर्माचे लोकही राहतात, याचा विचार केला नाही. इतकेच काय तर पाकिस्तान सुन्नीबहुल मुस्लिमांचा देश असल्याने तिथे अहमदिया मुस्लिमांवरही बंधन आहेत. या पाश्वर्र्भूमीवर दानिशसोबत जे घडले, त्याबद्दल अजिबात आश्चर्य वाटत नाही.

दानिश कनेरिया सन २००० ते २०१० पर्यंत पाकिस्तानी क्रिकेट संघासाठी खेळायचा. मात्र, २०१३ साली ‘इंग्लिश अ‍ॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्ड’तर्फे त्याच्यावर सट्टेबाजीचा गुन्ह्यात सहभागी म्हणून बंदी आणली गेली. दानिशच्या म्हणण्यानुसार, शाहिद आफ्रिदीला वाटायचे की दानिश हिंदू आहे म्हणून त्याने त्याच्या संघामध्ये खेळू नये. त्यामुळे दानिशला सट्टेबाजीमध्ये गुंतवले गेले आणि दोषी ठरवल्यामुळे त्याची क्रिकेटपटू म्हणून कारकिर्द समाप्त झाली.” दानिशची कारकिर्द आणि निलंबन या गोष्टी बाजूला सारले तरीसुद्धा जाणवते की, धर्मांधतेची कीड आणि धर्मांतराचा राक्षस पाकिस्तानच्या सर्वच क्षेत्रात अगदी सर्वत्रच बोकाळला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, दानिशसोबत मोहम्मद आमिर, मोहम्मद आसिफ आणि सलमान बट या क्रिकेट खेळांडूवरही सट्टेबाजीचा आरोप होता. या सर्वांना पाकिस्तानी क्रिकेट टिमने पुन्हा खेळण्याची संधी दिली.
 
मात्र, दानिशला संधी दिली गेली नाही. दानिशचे क्रिकेट संपवण्याची खेळी केली गेली. असो, दानिशच्या या म्हणण्याने क्रिकेटविश्वात वादळ उठले. बरं, दानिश मुस्लीम क्रिकेटरांना लक्ष्य करतो असे म्हटले, तर ‘इंजमाम उल हक आणि शोएब अख्तर हे दोघे खूप चांगले होते, हे दोघे नेहमी आपले मनोधैर्य वाढवायचे,’ असे म्हणत दानिश या दोघांबद्दल चांगले म्हणतोय. पण, तरीही दानिशने एक प्रश्न उपस्थित केला की, ”त्याच्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटमध्ये एकाही हिंदूला स्थान का दिले गेले नाही? पाकिस्तानी हिंदू क्रिकेट खेळूच शकत नाहीत का?” या सगळ्या प्रकरणाबाबत पाकिस्तानच्या क्रिकेट खेळाडूंनी काहीही मत व्यक्त केले नाही. अर्थात, बोलण्यासारखे असेल, तर ते बोलतील. पाकिस्तानमध्ये १९४७ मध्ये जवळ जवळ २०.५ टक्के हिंदू होते.
आज २०२३ साली पाकिस्तानमध्ये हिंदू किती टक्के उरलाय, तर केवळ १.९ टक्के! गेल्या ७० वर्षांत पाकिस्तानातून हिंदू नामशेष व्हायला आला. कुठे गेले हे १८.६ टक्के हिंदू? त्यांनी स्वेच्छेने धर्मांतरण केले की सगळेच एकसाथ देवाघरी गेले की आणखी काही? नाही, पाकिस्तानमध्ये दानिशसारख्या सुस्थापित हिंदूंसोबत धर्मावरून जर असा भेदभाव आणि इतक्या टोकाचे असहिष्णू वर्तन, दडपशाही होत असेल, तर सामान्य हिंदूंचे काय? भारतातल्या अल्पसंख्याकांनी याबद्दल अंतर्मुख होऊन विचार केला, तर तेही म्हणतील दुर्लभ भारते जन्म!

९५९४९६९६३८
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.