पती-पत्नी असताना दुसरं लग्न करु शकणार नाही सरकारी कर्मचारी!
आसाम सरकारचा मोठा निर्णय
27-Oct-2023
Total Views |
मुंबई : आसाम सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आसाममधील कर्मचाऱ्यांना त्यांचा जोडीदार जिवंत असेपर्यंत दुसरे लग्न करता येणार नाही. हा नियम सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू असून धर्माच्या आधारे यात कोणालाच सूट देता येणार नसल्याचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे.
तसेच एखाद्या विशेष परिस्थितीत कर्मचाऱ्यांना दुसऱ्या लग्नासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात एक पत्रक जारी करण्यात आले आहे. यात आसाम नागरी सेवा (आचार) नियम १९६५ च्या नियम २६ च्या तरतुदींनुसार मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.
या परिपत्रकात मुस्लिमांचा उल्लेख न करता म्हटले आहे की, हा नियम अशा पुरुषांनाही लागू आहे ज्यांना वैयक्तिक कायद्यानुसार दुसऱ्यांदा लग्न करण्याची परवानगी आहे. तसेच कोणतीही महिला कर्मचारी जिचा पती जिवंत आहे तिला सरकारच्या परवानगीशिवाय लग्न करता येणार नाही, असेही यात म्हटले आहे.
Sharing Assam Government’s latest directive to end polygamy among government employees. pic.twitter.com/x6kInQtoct
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, ज्यावेळी मुस्लीम कर्मचारी दोनदा लग्न करतात तेव्हा त्यांच्या दोन्ही पत्नी पेन्शनकरिता भांडत असतात. त्यामुळे पहिला जोडीदार जिवंत असताना दुसरे लग्न न करण्याच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्यास सांगण्यात येत आहे.
आसामच्या चार लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ५८ वर्षांपूर्वी बनवलेल्या सेवा नियमांतर्गत बहुपत्नीत्वावर बंदी घालण्याचा हा आदेश आला आहे. यानुसार, सरकारच्या संमतीशिवाय पहिला जोडीदार जिवंत असेपर्यंत कर्मचारी दुसऱ्यांदा लग्न करू शकत नाहीत. आसाम नागरी सेवा (आचार) नियम १९६५ च्या नियम २६ नुसार, सरकारच्या मान्यतेशिवाय दुसरे लग्न करण्यास मनाई आहे. एखाद्या कर्मचाऱ्याने हा आदेश न मानल्यास त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते.