रामललाच जाणो!

    26-Oct-2023   
Total Views |
MP Sanjay Raut attack on PM Modi about Ram Mandir

“राम मंदिर सोहळ्यासाठी पूजार्‍यांनी नरेंद्र मोदींना आमंत्रित करण्याची गरज नाही,” असे संजय राऊत म्हणाले. अर्थात, त्यांना यासाठीही कुणी विचारले नव्हते. पण, सध्या त्यांच्या संघटनेचा जो वैचारिक अंधार झाला आहे, त्यानुसार कुणी विचारो ना विचारो ‘बिच मे मेरा चांदभाई’ करण्याची त्यांना गरज वाटतेच. संजय राऊत यांच्या म्हणण्यावर मुख्य पूजारी सत्येंद्र दास म्हणाले की, ”प्राणप्रतिष्ठा विश्वास हा श्रद्धा आणि आस्थेचा विषय आहे. त्यामुळे पंतप्रधानांना आमंत्रित केले आहे. त्यांनीच या मंदिराचेही भूमिपूजन केले आहे. संजय राऊत यांना केवळ निवडणुका दिसतात” राम मंदिराचे मुख्य पुजारी जे काही म्हणाले, ते सध्या संजय राऊतांसह त्यांच्या आलाकमान, त्यांचे साहेब आणि त्यांचे काकाश्री यांना समजणार तरी आहे का?मुळात 2019 पासून संजय राऊत आणि त्यांच्या सर्वेसर्वांचे लपलेले खरे रूप जनतेने पाहिले आहे. त्यामध्ये बहुसंख्य हिंदू समाजाविरोधात संतापजनक वक्तव्य करणे, समाजविघातक शक्तींना आडून-आडून समर्थन देणे, काँगेस पक्षाचे महिमामंडन करणे, मराठी माणूस, मराठी माणूस बोलता-बोलता मराठी मुसलमान, मराठी मुसलमान करत उर्दू भवनासाठी जीजान देण्याची तयारी करणे, असे एक ना अनेक. हे सगळे पाहून मराठी माणूस खरेच दुःखी झाला. हेच काय ते नेते आणि हाच काय तो पक्ष? ज्याच्यासाठी आम्ही सलग तीन पिढ्या ‘आवाज कुणाचा’ म्हणत मुंबई, ठाणे आणि आता बदलापूर, नेरळपर्यंत विस्थापित झालो? याच पक्षाला सत्तेत आणण्यासाठी आम्ही अंगावर केसेस घेतल्या? पुढे-पुढे तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना हरताळ फासत हे लोक वाहवतच गेले. काँग्रेसशी समाजवाद्यांशी युती काय? हिंदू धर्माला शिव्याशाप देणार्‍या सुषमा अंधारेला पायघड्या काय? कशाला कशाचा पायपोस उरला नाही. हे सगळे कशासाठी, तर भाजपला सत्तेतून म्हणे खाली खेचायचे आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करतो म्हणणारे आता केवळ आणि केवळ मोदी-शाहंना शिव्याशाप देणे इतकेच करताना दिसतात. असो. राम मंदिर उभारणी ही हिंदूंच्या शेकडो वर्षांच्या धर्मस्वप्नांची पूर्तता आहे. ही पूर्तता मोदी पंतप्रधान असताना कायद्याच्या मदतीने सत्य स्वरुपात आली. त्यामुळे मोदींना राम मंदिराच्या सोहळ्यामध्ये राम मंदिराचे पुजारी बोलावणार नाहीत, असे होईल का? संजय राऊत आणखीन किती हसे करून घेणार, हे आमचा रामललाच जाणो!


कुणाची मुलाखत घेऊ?


ते सत्यपाल मलिक आहेत ना, ते म्हणाले की, “आता मोदी सत्तेत येणार नाहीत.” किती छान ना मम्मा! मोदींमुळे मी पंतप्रधान होत नाही. आपलेच काही लोक मला काही कळत नाही, असे म्हणतात. पण, कमळवाले म्हणतात की, मी भाजपचा सदिच्छादूत आहे. मी येतो, बोलतो आणि माझ्यामुळे लोक मोदींना मत देतात आणि भाजप जिंकतो. मम्मी, माझे हे टॅलेंट त्या कमळवाल्यांना माहिती आहे. पण, आपल्या लोकांना कळत नाही. मी किती हुशार आहे, हे कृतीतूनच सिद्ध केले. मी काय केले माहिती आहे का?मम्मा, मी आता मुलाखतदेखील घ्यायला लागलो. सत्यपाल मलिकांची मुलाखत घेतली. त्यांना प्रश्न विचारले. तेच प्रश्न गं! जम्मू-काश्मीरबद्दल. जम्मू-काश्मीरमध्ये कसं वाईट चालले आहे. ‘370 कलम’ हटवून मोदी आणि भाजपने कसे देशाचे नुकसान केले आहे, पुलवामा हल्ला कसा ‘फेक’ होता, याबद्दल त्यांनी काय उत्तर द्यावी, हे आधीच ठरलेले होते. आपण कसे नेहमी काहीही बोलतो आणि आपल्या गांधी आडनावाला जागणारे लोक ते खरे मानतात. तसे मलिक यांनी बोलायला हवे होते ना? पण, ते काय स्पष्ट उत्तर देत नव्हते. देशाच्या साधनसंपत्तीवर अल्पसंख्याकाचा हक्क, असे आपण म्हटलो होतो ना? मग मणिपूरमधले ख्रिस्तीही अल्पसंख्याक. नानीच्या इथले लोकपण सगळे ख्रिस्ती आहेत ना? त्यामुळे त्यांना मणिपूरबद्दलही प्रश्न विचारले? सॉरी, सॉरी निवडणुका जवळ आल्यात, असे नको म्हणू ना मी? आता जानवे घालायची वेळ झाली आहे. आपण ब्राह्मण आहोत, हे बोलायची पण वेळ झाली आहे. आणखीन एक आता मोदींनी जानेवारी 2024 मध्ये राममंदिराची तारीख दिली आहे ना? पण, आपले महाराष्ट्रातले ठाकरे तर बोलत होते की, हे लोक बोलतात की, “मंदिर वही बनायेंगे, लेकीन तारीख नही बतायेंगे.” पण, यांनी तर तारीख सांगितली. हो, अरे विसरलोच मम्मा! खरे तर सत्यपाल मलिकांना हा पण प्रश्न विचारायचा होता की, पॅलेस्टाईन-इस्रायलसाठी मोदीच जबाबदार आहेत का? थांब, यासाठी आणखीन एक मुलाखत घेतो. कुणाची मुलाखत घेऊ गं? हे कोण म्हणते की, संजय राऊत किंवा ओवेसी किंवा प्रकाश आंबेडकरांची मुलाखत घे म्हणून! हो हेच लोक ठीक आहेत. ते म्हणतील सूर्य, चंद्र असेपर्यंत मोदी जिंकणार नाहीत. व्वा व्वा! आता त्यांचीच मुलाखत घेतो.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.