श्वानांच्या निर्बीजीकरणावर कोट्यवधींचा खर्च

कडोंमपा परिसरात दहशत कायम

    26-Oct-2023
Total Views |
dogs

कल्याण :
श्वान निर्बीजीकरणावर कल्याण-डोंबिवली महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, तरीही शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. गेल्या तीन वर्षांत (मे २०२३ पर्यंत) भटक्या श्वानांनी ४८ हजार, १४ जणांचा चावा घेतला आहे. शहरातील वाढत्या भटक्या श्वानांची दहशत पाहता निर्बीजीकरणावर केला जाणारा खर्च याविषयी साशंकता निर्माण होत आहे. निर्बीजीकरणावर एवढा खर्च केला जात असला तरी शहरातील भटक्या कुत्र्यांची दहशत अजिबात कमी झालेली नाही.

श्वान निर्बीजीकरणावर पालिकेने गेल्या तीन वर्षांत २ कोटी, १५ लाख, ५९ हजार, ६३६ रुपये खर्च केले आहेत. सध्या पालिका प्रत्येक श्वानामागे निर्बीजीकरणावर ९८९ रुपये खर्च करीत आहे. गेल्या तीन वर्षांतील आढावा घेतला असता २०२० मध्ये ९ हजार, ४२८ श्वानांचे निबीर्जीकरण करण्यात आले. त्यावर ७९ लाख, १९ हजार, ५२० रुपये खर्च करण्यात आला. २०२१ मध्ये १० हजार, ९०५ श्वानांच्या निबीर्जीकरणावर ९१ लाख, ६० हजार, २०० रूपये खर्च झाले. २०२२ मध्ये १२ हजार, ४५६ श्वानांचे निर्बीजीकरण झाले. त्यावर ४४ लाख, ७९ हजार, ९१६ खर्च करण्यात आला आहे.

कल्याण-डोंबिवली हद्दीत श्वानदंशाच्या घटना या सुरूच आहेत. पादचार्‍यांच्या अंगावर धावून जाणे, चावा घेणे, रात्री-अपरात्री भुंकणे तर रात्रीच्या सुमारास दुचाकी, चारचाकी चालकांचा पाठलाग करून चावा घेण्याचा श्वान प्रयत्न करतात. काही घटनांत दुचाकी चालकांना अपघातही झाले आहेत. गत तीन वर्षांत भटक्या श्वानांनी ४८ हजार, १४ जणांचा चावा घेतला आहे. श्वानदंशाच्या घटना आजही सुरू आहेत. कडोंमपातर्फे प्रतिवर्षी खासगी ठेकेदारामार्फत श्वानांची नसबंदी करण्यात येते. त्यावर एक कोटी रुपये खर्च केला जातो, तर श्वान चावला की, जखमी व्यक्तीला कडोंमपाच्या रुग्णालयात मोफत इंजेक्शन दिले जाते. त्यावर वर्षाला ५० लाख रुपये कडोंमपा खर्च करते.

गेली २३ वर्षं ‘पॉज’चे कार्य अविरत सुरू

२३ वर्षांपासून ‘पॉज’ संस्था रस्त्यावर उतरून भटक्या प्राण्यांसाठी अविरत कार्य करीत आहे. प्राण्यांवर उपचार करणे, त्यांचे पुनर्वसन करणे, तर रेबीज लसीकरण मोहीमसुद्धा संस्था राबविते. श्वानांचे मानवाला अनेक फायदे आहेत. पोलीस त्यांच्या मदतीने गुन्हेगारांचा शोध घेतात. श्वानांना काही श्वानप्रेमी जेवायला देतात. त्यामुळे त्यांचे पोट भरलेले राहते व ते कोणालाही त्रास देत नाहीत.
- निलेश भणगे, संस्थापक पॉज संस्था

पाळीव श्वान धारकांसाठी परवाना पद्धत सुरू करावी - डॉ. अकोले

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर अकोले यांनी सांगितले की, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनतर्फे दरवर्षी रेबिज लसीकरण मोहीम राबविण्यात येते. पण, हे काम समुद्रातील एका मोत्याएवढे आहे. कल्याणमध्ये अंदाजे २८ हजार, तर डोंबिवलीत २२ हजार भटके श्वान आहेत. श्वान कधीही स्वतःहून माणसाला चावा घ्यायला जात नाहीत. माणसाने त्यांची वृत्ती बदलली पाहिजे. कडोंमपाने पाळीव श्वानधारकांसाठी परवाना पद्धत सुरू करावी, अशी आमची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, अद्याप परवाना पद्धत सुरू केली जात नाही. सर्व महत्त्वाच्या शहरात ही पद्धत अमलात आणली जाते. या पद्धतीचा अवलंब केल्यास महापालिकेलाही उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होऊ शकतो, तर महापालिकेने श्वानांसाठी दवाखाना सुरू करावा.