मुंबई : विजयादशमीच्या निमित्ताने मंगळवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लालबाग नगराच्यावतीने विजयादशमी पथ संचलनचे आयोजन करण्यात आले होते. अश्वारूढ असलेल्या स्वयंसेवकाने प्रतिनिधित्व केलेल्या संचलनाचे विभागातील नागरिकांनी ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. सुभाष मैदान चिंचपोकळी येथून घोष वाद्यासह सुरू झालेल्या संचलनाचा काळाचौकी मार्गे गणेश गल्ली लालबाग येथे समारोप करण्यात आला.
समारोप कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून मम्माबाई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शिल्पा गणेश पवार उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, “मुलांना वाचनाची सवय लावा तसेच त्यांना शिष्यवृत्तीसाठी तयार करून मुलांना वेळ द्या आणि चांगले संस्कार करा, म्हणजे किमान सजग नागरिक म्हणून ते तयार होतील.” लालबाग नगर संघचालक दीपक मालवीय यांच्या हस्ते शस्त्रपूजन झालेल्या समारोप कार्यक्रमात डॉ. रतनजी शारदा यांनी उपस्थित स्वयंसेवक आणि नागरिकांना संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर कार्यवाह रत्नेश शुक्ला यांनी केले.