नवी दिल्ली : “अनेक शतकांच्या प्रतिक्षेनंतर अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराची उभारणी होणे हा भारतीयांच्या धैर्याचा विजय आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील द्वारका येथे रावणदहन कार्यक्रमास संबोधित करताना केले.
अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराची उभारणी व्हावी, यासाठी भारतीय समाज अनेक शतकांपासून प्रतीक्षा करत होता. अखेरिस अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर उभारणी अंतिम टप्प्यात आली असून आता लवकरच रामलल्ला मंदिरात विराजमान होणार आहेत. आता केवळ काहीच दिवस राहिले असून पुढील श्रीरामनवमी अयोध्येतील भव्य मंदिरात साजरी होणार आहे. त्यावेळी जगभरात त्याचा प्रभाव निर्माण होईल. अयोध्येत भव्य मंदिराची उभारणी होणे हा भारतीयांच्या धैर्याचा विजय असून आता प्रभू श्रीरामचंद्रांच्या विचारांच्या भारताची उभारणी करायची आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारताचे सामर्थ्य हे विश्वकल्याणासाठी असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “प्रभू रामाची मर्यादा जशी आम्हास माहिती आहे, त्याचप्रमाणे आमच्या सीमांचे रक्षण करण्याचेही आम्ही जाणतो. यंदाची विजयादशमी ही रामाच्या पुनरागमनासारखी आहे. भारतात चांगल्या गोष्टी घडत आहेत, आपण चंद्रावर पोहोचलो आहोत, आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत, संसदेची नवीन इमारत बांधली गेली आहे, महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे. त्याचवेळी विद्यमान जागतिक अस्थिरतेच्या काळात सर्व जग लोकशाहीची जननी असलेल्या भारताकडे आशेने पाहत आहे,” असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.