पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’चे ‘भारत’ करण्याची एनसीईआरटी समितीची शिफारस

    25-Oct-2023
Total Views |
ncrt

नवी दिल्ली : 
एनसीईआरटीने शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’चे ‘भारत’ करावे अशी शिफारस केली आहे. मात्र, यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी एनसीईआरटी आपल्या अभ्यासक्रमात बदल करत आहे. त्याअंतर्गत अभ्यासक्रमात अनेक सुधारणाही केल्या जात आहेत. अभ्यासक्रमातील बदलांबाबत १९ सदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली होती. या समितीने पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’ ऐवज ‘भारत’ असा शब्दप्रयोग करण्याची शिफारस केली आहे. समितीमध्ये आयसीएचआरचे अध्यक्ष रघुवेंद्र तंवर, जेएनयूमधील प्राध्यापक वंदना मिश्रा, डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू वसंत शिंदे यांच्यासह अन्य तज्ज्ञांचा समावेश आहे.

त्याविषयी बुधवारी सायंकाळी एनसीईआरटीतर्फे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यानुसार, एनसीईआरटी सध्या नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांच्या विकासाच्या प्रक्रियेत गुंतलेली आहे. यासाठी एनईसीआरटीने विविध क्षेत्रातील विषय तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांमधील कोणत्याही वृत्तांवर सध्या बोलणे घाईचे ठरेल, असे एनसीईआरटीतर्फे सांगण्यात आले आहे.

‘भारत’ हे नाव हजारो वर्षांपासूनचे – सी. आय. आयजॅक

समितीचे अध्यक्ष आणि इतिहासकार सी. आय. आयजॅक यांनी ‘भारत’ या नावाचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, विष्णु पुराणासारख्या ग्रंथात भारत या शब्दाचा उल्लेख असून तो जवळपास ७ हजार वर्षे जुना आहे. ‘इंडिया’ हे नाव साधारणपणे ईस्ट इंडिया कंपनीचा काळ आणि १७५७ सालच्या प्लासीच्या लढाईनंतर वापरात आले. त्यामुळे ‘भारत’ हे नाव वापरणे हे सर्वथा योग्य ठरते.