युद्ध मैदानातले आणि जनमानसातले...

    25-Oct-2023
Total Views |
Israel-Hamas war

इतर युद्धांशी तुलना करता ‘हमास’ने घडवलेले हत्याकांड नजरेत येत नसले तरी जर इस्रायल आणि भारताची तुलना केली तर भारतात दीड लाख लोकांचे शिरकाण केल्यावर जी भावना उसळेल, ती भावना इस्रायलमध्ये उसळली आहे.

इस्रायल आणि ‘हमास’ यांच्यातील युद्धाला तीन आठवडे पूर्ण झाले आहेत. सध्या इस्रायल आणि ‘हमास’पुरते मर्यादित युद्ध अधिक व्यापक झाले, तर त्यात लेबेनॉनमधील ‘हिजबुल्ला’, सीरिया आणि इराणही सहभागी होतील. हे टाळण्यासाठी अमेरिकेने आपल्या दोन विमानवाहू नौकांसह अनेक युद्धनौका भूमध्य समुद्रात आणल्या आहेत. दि. 7 ऑक्टोबरच्या सकाळी ‘हमास’च्या शेकडो दहशतवाद्यांनी इस्रायलची अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था भेदून सुमारे 30 ठिकाणांवर हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये 1 हजार, 400 इस्रायली मारले गेले. त्यातील बरेचसे हे सामान्य नागरिक होते. प्रत्युत्तरादाखल इस्रायलने गाझा पट्टी, जॉर्डन नदीच्या पश्चिम खोर्‍यात, लेबेनॉनमधील ‘हिजबुल्ला’च्या तळांवर तसेच सीरियामध्ये हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये ‘हमास’च्या दहशतवाद्यांसह सुमारे चार हजार लोक मारले गेले आहेत.


इस्रायलने सुमारे 3.5 लाख राखीव सैनिकांना सैन्यात भरती केले असून, लवकरच गाझा पट्टीमध्ये सैन्य पाठवण्यात येणार आहे, अशी चर्चा आहे. अर्थात, ही चर्चा सुरू होऊनही दोन आठवडे उलटले आहेत. अजूनही इस्रायली, अमेरिकन आणि अन्य देशांचे 200हून अधिक नागरिक ‘हमास’च्या ताब्यात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी अमेरिका कतारच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. त्यामुळे इस्रायलला आस्ते कदम जायला सांगितले आहे. ‘हमास’कडून गेल्या तीन आठवड्यांत इस्रायलवर सुमारे 7 हजार, 200 रॉकेट्सचा मारा करण्यात आला आहे. त्यातील केवळ 400 रॉकेट्सनी इस्रायलमधील लक्ष्यांचा वेध घेतला. इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ प्रणालीने सुमारे 1 हजार, 100 रॉकेट्स हवेतल्या हवेत उद्ध्वस्त केली. सुमारे 500 रॉकेट्स गाझा पट्टीतच कोसळली. अशाच एका रॉकेटमुळे या युद्धावर अमेरिका आणि अन्य देशांच्या मदतीने या युद्धावर तोडगा काढण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. गेल्या आठवड्यात रोमानियाचे पंतप्रधान मार्सेल सोलाकू तसेच जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शुल्झ यांनी इस्रायलला भेट दिली. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक इस्रायलला भेट देणार होते.


जो बायडन जॉर्डनला जाऊन तिथे आखाती अरब देशांच्या नेत्यांसोबत बैठक घेऊन, या युद्धात गाझा पट्टीतील सामान्य लोकांना युद्धभूमीबाहेर नेऊन, त्यांचे कशा प्रकारे पुनर्वसन केले जाऊ शकेल, याबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार होते. पण, बायडन इस्रायलला जायला निघत असताना इस्रायलने गाझा पट्टीत दक्षिणेला असलेल्या अल अहली हॉस्पिटलवर बॉम्बफेक करून सुमारे 500 लोकांना मारल्याची बातमी पसरली आणि अरब-मुस्लीम राष्ट्रांमध्ये संतापाची मोठी लाट उसळली. इस्रायलच्या लष्कराने या हल्ल्यातील सहभाग नाकारला असला तरी ‘न्यूयॉर्क टाईम्स’ आणि ‘बीबीसी’सह अन्य महत्त्वाच्या जागतिक वृत्तवाहिन्यांनी, ही बातमी दाखवल्याने ती जगभर वार्‍यासारखी पसरली. अवघ्या तासाभरात इस्रायलकडून आपल्या विमानांनी किंवा ड्रोनने हल्ला केल्याची बातमी नाकारण्यात आली, तरीदेखील या माध्यमांनी लोकशाही व्यवस्था आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार्‍या इस्रायलपेक्षा ‘हमास’सारख्या दहशतवादी संघटनेने केलेल्या दाव्याला महत्त्व दिले. या बातमीमुळे अनेक देशांमध्ये मुस्लीम समाज रस्त्यावर उतरून इस्रायल आणि अमेरिकेच्या विरोधात आंदोलन करू लागला.

अवघ्या 12 तासांत इस्रायलने या हल्ल्याचे अनेक तपशील सादर केले. या दाव्यांनुसार हे रॉकेट ‘पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद’ या दहशतवादी संघटनेने डागले होते. या घटनेत जमिनीवर बॉम्ब किंवा मिसाईलद्वारे होतो, तसा खड्डा तयार झाला नाही. हे रॉकेट पडताना अनेक वृत्तवाहिन्यांच्या थेट प्रक्षेपणात दिसत होते. ते इस्रायलकडून गाझाच्या दिशेला नाही, तर गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट झाले. इस्रायलने एवढ्यावरच न थांबता हे रॉकेट पडल्यानंतर ‘हमास’च्या दहशतवाद्यांमधील संभाषणही उघड केले. ‘हमास’ करत असलेल्या रॉकेट हल्ल्यांपैकी किमान 20 टक्के रॉकेट इस्रायलपर्यंत न पोहोचता गाझा पट्टीतच कोसळतात, हे व्हिडिओद्वारे दाखवून दिले. त्यानंतर शोध पत्रकारांनी उपग्रह आणि ड्रोनच्या साहाय्याने मिळवलेल्या छायाचित्रांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मृतांची संख्या ही 500 नसून, 50-100च्यादरम्यान असल्याचा खात्रीशीर अंदाज व्यक्त केला. या सगळ्यात जागतिक वृत्तवाहिन्यांना ‘हमास’प्रति असलेला कळवळा स्पष्टपणे दिसून आला. त्यानंतर काही वृत्तमाध्यमांनी माफी मागितली असली तरी अनेकांनी आपल्या वाचकांना अंधारातच ठेवले. या घटनेमुळे अमेरिकेच्या पुढाकाराने तसेच पाश्चिमात्य आणि आखाती अरब देशांच्या सहकार्याने या युद्धात तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरुवात होण्याआधीच कोसळले.

या युद्धात इस्रायलची बाजू नैतिकतेची असून, ती जगाला पटवून देण्यासाठी त्यांना अथक प्रयत्न करावे लागत आहेत. ‘हमास’कडून युद्ध नियमांना केराची टोपली दाखवून सामान्य इस्रायली नागरिकांना लक्ष्य केले जाणे आणि दुसरीकडे गाझा पट्टीतील सामान्य नागरिकांना ढाल म्हणून पुढे उभे करून, त्यांच्या पाठून इस्रायलमध्ये रॉकेट हल्ला करणे, हा दुहेरी युद्ध गुन्हा आहे. पण, या प्रश्नाची गुंतागुंत माहिती नसलेल्या किंवा माहिती असूनही समजून घेण्याची इच्छा नसलेल्या वर्गाला पटवून देणे, हे इस्रायल पुढील महत्त्वाचे आव्हान आहे. एकाच युद्धात लोकशाहीवादी इस्रायलकडून वेगळ्या आणि दहशतवादी संघटना असलेल्या ‘हमास’कडून वेगळ्या अपेक्षा केल्या जातात. युद्धातील प्रमाणबद्धतेबद्दलही अशाच प्रकारचे गैरसमज आढळून येतात. ‘हमास’ने इस्रायलमधील 1 हजार, 400 लोकांना मारले म्हणून इस्रायलनेही गाझा पट्टीतील साधारण तेवढ्याच संख्येने लोकांना मारल्यावर युद्धविराम घोषित करावा, असे मत मांडणार्‍यांना हे कळत नाही की, युद्धाचे उद्दिष्टं हत्याकांड घडवणे, हे नसते. भविष्यात ‘हमास’ला इस्रायलवर हल्ला करून अशा प्रकारे हत्याकांड करता येऊ नयेत, हे पाहणे महत्त्वाचे. त्यासाठी गाझा पट्टीतील घरं, शाळा, रुग्णालयं आणि कार्यालयांमध्ये ‘हमास’ने उभे केलेले दहशतवादी कारवायांचे जाळे उद्ध्वस्त करावे लागेल. त्यासाठी गाझा पट्टीच्या उत्तर भागातून लोकांना दक्षिणेकडे स्थलांतरीत करणे आवश्यक आहे.


लोकांनी दक्षिणेकडे जाऊ नये, म्हणून ‘हमास’ रस्ते अडवत आहे. दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येला काही दिवसांत दुसरीकडे राहायला जाणे अवघड आहे. त्यात त्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागणार, हे निश्चित आहे. असे असले तरी ‘हमास’चा धोका कायमचा संपवायचा असेल, तर दुसरा पर्याय नाही. इतर युद्धांशी तुलना करता ‘हमास’ने घडवलेले हत्याकांड नजरेत येत नसले तरी जर इस्रायल आणि भारताची तुलना केली तर भारतात दीड लाख लोकांचे शिरकाण केल्यावर जी भावना उसळेल, ती भावना इस्रायलमध्ये उसळली आहे.‘संयुक्त राष्ट्रां’च्या सुरक्षा परिषदेत हा प्रश्न चर्चेला आला असता, महासचिव असलेल्या अँटोनियो गुटेरस यांनी ‘हमास’चा हल्ला पोकळीत नाही झाला, असे विधान करून या हल्ल्यासाठी इस्रायललाही जबाबदार धरले. इस्रायल-पॅलेस्टाईन प्रश्नाची सोडवणूक न झाल्यामुळे ‘हमास’ने हा हल्ला केला, असे सूचवणे असंवेदनशीलपणाचे लक्षण आहे. ‘हमास’च्या अतिरेक्यांनी डोक्यावर कॅमेरे बांधून आपण करत असलेल्या हत्या, बलात्कार आणि जाळपोळीचे चित्रण केले. या चित्रीकरणात ‘हमास’च्या दहशतवाद्यांकडून आणि गाझा पट्टीतील त्यांच्या परिवार आणि मित्रांकडून केला जाणारा जल्लोष समोर येतो. ‘हमास’च्या पशुतुल्य किंबहुना त्याही पलीकडच्या वागणुकीचे समर्थन करणे, माणुसकीला काळीमा फासणारे आहे. पण, हे समजण्याइतकी प्रगल्भता अजून समाजात येणे बाकी आहे. इस्रायलसाठी ‘हमास’च्या आव्हानावर कायमस्वरुपी उत्तर शोधत असताना, अरब मुस्लीम देशांमध्ये तसेच पाश्चिमात्य देशांतील सुसंस्कृत वर्गात आपल्या कारवाईचे महत्त्वं पटवून देणेही आवश्यक आहे.

-अनय जोगळेकर