सद्दामच्या मृत्यूने...

    25-Oct-2023   
Total Views |
Saddam Hussein's Daughter Charged With 7-Year-Jail Term For Promoting Father's Political Party


इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनची कन्या रगद हुसेन हिला बगदाद न्यायालयाने नुकतीच सात वर्षांची शिक्षा सुनावली. 2021 साली रगद हिने इराकद्वारे प्रतिबंधित केलेल्या बाथ पक्षाबद्दल जाहीररित्या माहिती दिल्याबद्दल रगद हिला ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. एका मुलाखतीमध्ये रगद म्हणते की, ”1979 ते 2003 ही वर्षे इराकमध्ये सुवर्णाक्षराने लिहिली जावीत, अशी वर्षे आहेत. असे अनेकजण मला सांगतात.” रगदने तिचे पिता सद्दाम हुसेनच्या आठवणींचीही यावेळी उजळणी केली. बाथ पक्ष हा सद्दाम हुसेनचा राजकीय पक्ष. इराकमध्ये या पक्षावर 2003 सालापासून बंदी आहे. सद्दाम हुसेनला दि. 30 डिसेंबर 2006 रोजी फाशी दिली गेली. ज्या क्रूर कृत्यांसाठी सद्दामला फाशी झाली, त्याच कृत्यांमुळे त्याच्या बाथ पक्षावरही बंदी आणली गेली. सद्दाम हुसेनने जीवाच्या भीतीने आयुष्यभर इतरांवर अत्याचार केले. लाखो कूर्द नागरिकांची आणि 148 शियांची निर्घृण हत्या करण्यात आली.


इराण आणि कुवेतवर हल्ला आणि कब्जा करण्याचा प्रयत्न आणि इतरही अनेक नरसंहार केले. कुणीतरी आपला जीव घेणार आहे, ही भीती सद्दामला इतकी वाटत होती की, संशय येणार्‍या प्रत्येकाला ते मृत्युदंडच देत. त्यांच्यासाठी जे अन्न बनवले जाई, ते अन्न पहिल्यांदा अन्न बनवणार्‍या स्वयंपाक्याचा मुलगा खात असे, मगच सद्दाम अन्न खात असे. एकदा त्याच्यावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे घाबरून आणि रागाने सद्दामने शियाबहुल गावांवर हल्ला केला. सद्दामच्या लष्काराने शियांचा नरसंहार आरंभला. त्यातून शियाधर्मीय इराण आणि इराकचे युद्ध पेटले. त्यातच सद्दामने इराणसह कुवेतसोबतही युद्ध सुरू केले. कुवेतवर कब्जा केला. सद्दामच्या हिंसेला, अत्याचाराला कंटाळून इराकमधील जनता बेहाल झाली. अमेरिका आणि ब्रिटनला वाटले की, सद्दामकडे अणुबॉम्ब आणि विनाशकारी हत्यारे आहेत, ज्यामुळे जगाचा विनाश ओढवू शकतो.


शेवटी अमेरिकेने इराकवर हल्ला चढविला. 2003 साली सद्दामला ताब्यात घेतले. शिया आणि कूर्द नरसंहाराला जबाबदार ठरवून सद्दामला फाशीची सजा सुनावण्यात आली. सद्दामने हे सगळे काही केले, ते बाथ पक्षाचे सर्वेसर्वा सत्ताधारी म्हणून! त्यामुळेच सद्दामच्या पश्चात सत्तेवर आलेल्या राजकीय पक्षाने सद्दामच्या बाथ पक्षावर बंदी आणली. त्यामुळेच बाथ पक्ष आणि सद्दाम हुसेन याच्या आठवणी सांगितल्याबद्दल रगद हिला बगदाद न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली. या सगळ्या घडामोडींमध्ये आज अनेक पॅलेस्टाईन समर्थक समाजमाध्यमांवर संदेश लिहीत आहेत की, आज सद्दाम हुसेन असता, तर पॅलेस्टाईनवर हल्ला करण्याची इस्रायलची हिंमत झाली नसती. काही लोक तर सद्दाम हुसेनचे छायाचित्र टाकून त्यावर संदेश लिहीत आहेत की, ”अमेरिकेने या बादशाहाला फाशीची शिक्षा सुनावली, तेव्हा तो हसत होता. तो मृत्यूपुढे आणि जुलमी सत्तेपुढे झुकला नाही.

 कारण, तो खरा मुसलमान होता.” हे खरे आहे का? तर हे अर्धसत्य आहे, असेच म्हणावे लागेल. कारण, सद्दाम हुसेन हा खरा मुस्लीम आहे का? तर हो खरेच, तो सुन्नी मुस्लीम होता. सुन्नी हेच खरे मुसलमान, यावर सद्दामचा विश्वास. त्यामुळेच शिया मुस्लिमांचा नरसंहार करताना, त्याने जराही कुचराई केली नाही. इतकेच काय तर 1990 साली सद्दाम हुसेनने अल्लाप्रति निष्ठा व्यक्त करताना 605 पानांवर कुराणाच्या 114 आयाती स्वतःच्या 27 लीटर रक्ताने लिहिल्या होत्या म्हणे! अर्थात, खरा मुसलमान म्हणून सद्दामची ओळख अशी आहे. मात्र, फाशीची शिक्षा दिल्यावर सद्दाम अजिबात घाबरला नाही, हे खरे आहे का? तर सद्दामला पकडणार्‍या अमेरिकन सैनिकाने त्याच्या आत्मचरित्रामध्ये लिहिले आहे की, “सद्दाम एका बंकरमध्ये लपून राहिला होता.

अमेरिकन सैनिकांनी त्याला शोधून काढताना पहिल्यांदा, त्याला कुणाचे तरी डोक्यावरचे केस दिसले. हे कोण हे पाहण्यासाठी त्या सैनिकाने ते केस ओढले, तर सद्दाम बाहेर आला.” लाखो लोकांची कू्ररपणे हत्या करणारा सद्दामचा अंत असा झाला. त्याच रगद हिचा पती हुसेन कमाल अल मजीद याची आणि त्याच्या भावाची (हा सुद्धा सद्दामचा जावई) हत्याही सद्दामच्या मुलांनी केली होती. जावई आपल्या विरोधात बोलला, याने अपमान झाला मानून सद्दाम यांनी रगदला पतीपासून घटस्फोट घ्यायला लावला. रगद आणि तिची बहीण राणा हिने घटस्फोट घेतल्याच्या दुसर्‍याच दिवशी त्यांच्या पतीची हत्या करण्यात आली. त्याच रगदला सद्दामच्या मृत्यूनंतरही सद्दामची क्रूरता भोगावी लागत आहे, हेच म्हणावे लागत आहे.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.