उद्धवजी तुमचं आडनाव ठाकरे नव्हे वाकरे ठेवा : ज्योती वाघमारे
25-Oct-2023
Total Views | 79
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा दसरा मेळावा मंगळवारी (२४ ऑक्टो.) आझाद मैदानात पार पडला. या मेळाव्याची सुरुवात ज्योती वाघमारे यांच्या भाषणाने झाली. ज्योती वाघमारेंनी भाषणात बोलताना उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धवजी तुमचं आडनाव ठाकरे नव्हे वाकरे ठेवा. संजय राऊत यांना शॉक ट्रीटमेंट देण्याची गरज आहे. ते भाकरी मातोश्रीची खातात, पण चाकरी राष्ट्रवादीची करतात. त्यामुळे संजय राऊत यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. असा इशारा दिला.
ज्योती वाघमारेंनी सुषमा अंधारेंवर टीका केली. त्या म्हणाल्या, "लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी सावित्रीच्या लेकीला लखपती बनवण्याची योजना सुरु केली. आज तिकडच्या मंचावर कोण उभी आहे? कोण कुठली ती अक्काबाई! दसरा आई-भवानीचा उत्सव. दसरा महिषासूर मर्दिनीची उत्सव आणि आज या दसरा मेळाव्याच्या पावन स्टेजवरुन उद्धव ठाकरेंना सवाल करायचा आहे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर तुमचं राजकारण होत असेल तर या महाराष्ट्राच्या बापाला बाळासाहेब ठाकरेंना थेरडं म्हणणारी सुषमा अक्का तुमच्या शिवसेनेचा चेहरा कशी काय होऊ शकते? अरे काय म्हणते ती बाई अचकटविचकट हावभाव करत काय म्हणते? छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत असणारी आई तुळजाभवानी. महाराष्ट्राची आई तुळजाभवानीबद्दल अचकटकविचकट हावभाव करुन बोलणारी ही बाई जर उद्धव ठाकरे तुमच्या शिवसेनेचा चेहरा असेल तर थू तुमच्या जिंदगानीवरती."
"जर तुम्ही अशा बाईच्या पदरात राजकारण चालवत असाल. कोण कुठला शर्जिल उस्मान?, कोण कुठला ओवैसी? औरंगजेबाच्या कबरीवर फुलं उधळतो तुम्ही त्याच्यावर कारवाई करत नाही. हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या या लोकांना तुम्ही शिवसेनेत सन्मानाचं स्थान देत असाल, जर सिल्व्हर ओकची आणि सोनिया गांधींची गुलामगिरी करुन तुम्ही राजकारण करत असाल तर माझा तुम्हाला सल्ला आहे की ठाकरे आडनाव लावण्याचा तुम्हाला अधिकार नाही तुम्ही यापुढे वाकरे आडनाव लावा. कारण या लोकांपुढे वाकण्यात तुमची जिंदगी गेली आहे." असा घणाघात ज्योती वाघमारेंनी ठाकरेंवर केला.