अर्थमेव जयते!

    25-Oct-2023
Total Views |
India to outpace Japan as second-largest economy in Asia by 2030: S&P Global Market Intelligence


भारताने जगाला अनेक गोष्टी दिल्या. त्यात सांस्कृतिक आणि बौद्धिक बाबींचा प्रकर्षाने समावेश आहे. त्यात अर्थशास्त्राची देणगीसुद्धा भारतानेच जगाला दिली. भारतात कधीकाळी एवढी सुबत्ता होती की, येथे सोन्याचा धूर वाहत होता, असे म्हटले जाते. हे त्रिवार सत्य असून, त्यावेळी भारत आर्थिकदृष्ट्या किती सक्षम असेल, याची कल्पनाही करवत नाही. पारतंत्र्याचा काळ, त्यानंतर मिळालेले स्वातंत्र्य आणि गमावलेला स्वाभिमान यांमुळे आपली अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर अगदी तळाशी गेली होती. नियोजनाचा अभाव आणि निर्णयप्रक्रियाच नसल्याने जागतिक बँकेसह विकसित देशांकडे भारत आशाळभूत नजरेने पाहत होता आणि चमत्कार घडावा त्याप्रमाणे 2014 साली राजकीय परिवर्तन घडताच, अर्थव्यवस्थेने हळूहळू वेग घेतला. रेंगाळलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी येऊ लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गती मिळालेली अर्थव्यवस्था नंतर अक्षरशः धावायला लागली. जगात दहाव्या क्रमांकापासून ते आता पाचव्या स्थानापर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेने मजल मारली. येत्या काळात म्हणजेच 2030 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था तिसर्‍या क्रमांकावर जाईल आणि त्यावेळी ‘जीडीपी’ म्हणजेच ‘सकल राष्ट्रीय उत्पादन’ 7.30 लाख कोटी डॉलर असेल. हा अंदाज भारतीयांचा नसून ‘एस अ‍ॅण्ड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स’ या संस्थेने वर्तवला आहे. त्याचवेळी भारतीय अर्थव्यवस्था आशिया खंडात जपानला मागे टाकत दुसर्‍या क्रमांकावर येणार आहे, असेही अधोरेखित केले आहे.2021-2022 या वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेने प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली. त्यातूनच चालू आर्थिक वर्षात मार्च 2024 अखेर देशाचा जीडीपी 6.2 ते 6.3 टक्के नोंदवला जाण्याची शक्यता आहे. तसेच पहिल्या तिमाहीत त्यात 7.8 टक्के वाढ झाली आहे. हे सर्व शुभसंकेत असून, विश्वगुरूचा बहुमान मिळालेला भारत आगामी काळात जगाला अर्थजगताचे धडे देण्याबरोबरच ‘अर्थमेव जयते’चा मंत्रही देईल, हे निश्चित. एककाळ असा होता की, भारत बड्या देशांपुढे अर्थसाहाय्यासाठी आशाळभूत नजरेने पाहत होता. मात्र, आजघडीला भारत मागण्यापेक्षा देण्याच्या स्थितीत आला असून, याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांनाच द्यावे लागेल.

चला, आतिथ्य स्वीकारूया!


वर्षातून एकदा तरी पर्यटन करायचेच, असा निर्धार सर्वच क्षेत्रांतील बहुतांश भारतीय करतात. यात अनेक अपवादही आहेत. काहीजण फक्त विचार करतात; मात्र आर्थिक तसेच अन्य कारणांमुळे त्यांना पर्यटनाचा आस्वाद काही लुटता येत नाही. असे असले तरी अन्य देशांच्या तुलनेत भारतीयांमध्ये पर्यटनाची हौस प्रचंड असल्याचे पर्यटन जगतातील आकडेवारीवरून अधोरेखित होते. ‘कोविड’नंतरच्या काळात ठप्प झालेला पर्यटन व्यवसाय पुन्हा उभारी घेऊ लागला. 2019 मध्ये पर्यटन व्यवसायात तब्बल 173 टक्क्यांची वाढ होऊन एकंदरीत व्यवसाय 150 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचला असून, आजघडीला भारत जागतिक पर्यटन व्यवसायात सहाव्या स्थानावर आहे. भारतीयांमध्ये असलेली पर्यटनाची हौस पाहता, 2030 पर्यंत त्यात लक्षणीय वाढ होऊन, भारत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानापर्यंत मजल मारत, या क्षेत्रातील व्यवहार तब्बल 410 अब्ज डॉलर्सपेक्षाही अधिक असेल, असा अंदाज आहे.भारतीय पर्यटनाचा लेखाजोखा मांडणार्‍या ‘बुकिंग डॉट कॉम’ आणि ‘मेकेन्सी’ अ‍ॅड कंपनीने हा अंदाज वर्तविला आहे. पर्यटन नियोजनात भारतीय तसे मागेच. सरासरी 29 दिवस आधी भारतीय लोक पर्यटनाचे नियोजन करतात, त्या तुलनेत जपान 57 दिवस तरी अमेरिकी 63 दिवस आधीच कुठे, कसे जायचे, कुठे थांबायचे जेवणाची व्यवस्था आदींचे नियोजन करतात. त्या तुलनेत भारतीयांचा कल ऐनवेळी ठरविण्याकडे असतो, असे या पाहणीत नमूद करण्यात आले आहे.पर्यटन करताना काटकसर करण्यावर भारतीयांचा भर असतो. त्यातूनच ते मिळेल त्या पर्यांयाचा स्वीकार करतात. भारतीयांवर समाजमाध्यमांचा पगडा असल्याने युट्यूब, इन्स्टाग्राम यांतील संदर्भ घेऊन ते पर्यटन करतात. धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांबरोबरच समुद्रकिनारे भारतीयांच्या आवडीची ठिकाणे. परेदशात कमी दिवसांत स्वस्त आणि मस्त सहल करण्यासही भारतीयांची पसंती आहे. व्हिएतनाम, नेपाळ आणि इंडोनेशिया या देशांत भारतीय पर्यटक सर्वाधिक संख्येने जात असतात. भारतीयांच्या संस्कृतीत ‘अतिथी देवो भव’ असले तरी आतिथ्य स्वीकारतानाही भारतीय पुढेच असतात, हेही तितकेच प्रशंसनीय!



- मदन बडगुजर