आर्थिक साक्षरता: बजाज फायनान्स आणि बजाज ऑटोच्या सहकार्याने आरबीआय लोकपालतर्फे रिझर्व्ह बँक लोकपाल योजना,फसवणूक आणि आर्थिक साक्षरतेवर जनजागरुकता उपक्रम

    25-Oct-2023
Total Views |

RBI
 
 
आर्थिक साक्षरता: बजाज फायनान्स आणि बजाज ऑटोच्या सहकार्याने आरबीआय लोकपालतर्फे रिझर्व्ह बँक लोकपाल योजना,फसवणूक आणि आर्थिक साक्षरतेवर जनजागरुकता उपक्रम
 
मुंबई: रिझर्व्ह बँक एकात्मिक लोकपाल योजना (RBIOS), फसवणूकीबाबत जागरूकता आणि आर्थिक साक्षरतेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लोकपाल (ओम्बड्समन) मुंबई कार्यालयाने, बजाज फायनान्स आणि बजाज ऑटो लिमिटेडच्या सहकार्याने बजाज ऑटोच्या वाळूज (औरंगाबाद) येथील प्रकल्पाच्या परिसरात व्यापक जनजागरूकता कार्यक्रम यशस्वीरित्या राबविला. १९ आणि २० ऑक्टोबर 2023 या दोन दिवशी या कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते.
 
मुंबई II चे डेप्युटी एच. एस. वर्मा, मुंबई II चे एजीएम लोकपाल अनिरुध्द मलिक आणि मुंबई II चे एएम लोकपाल आकाश काब्रा तसेच मुख्य नोडल अधिकारी रिंकु आनंद आणि त्यांच्या टीमच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय स्टेट बँकचे (एसबीआय) असंख्य कर्मचारी आणि सुमारे 300 उत्साही सहभागींनी या शैक्षणिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला
 
सामान्य नागरिकासाठी एक अपरिहार्य उपयुक्त आणि मदतरुपी घटक ठरलेल्या रिझर्व्ह बँकेच्या लोकपाल योजनेच्या यशावर श्री. वर्मा यांनी आपल्या भाषणात भर दिला. त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या लोकपाल योजनेंतर्गत तक्रार दाखल करण्याची सोपी आणि विनामूल्य प्रक्रिया स्पष्ट केली. सर्वसामान्य व्यक्तीला बँकेच्या सेवांसंदर्भात cms.rbi.org.in या संकेतस्थळावर आपली तक्रार ऑनलाइन दाखल करता येते, याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
 
ज्या समस्यांचे निराकरण बँका किंवा इतर नियमनांतर्गत येणाऱ्या कंपन्याकडे ग्राहकाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत निर्णय घेण्यास अपयशी ठरल्यास, अशा तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आरबीआयची एकात्मिक लोकपाल योजना (RBIOS) ही एक मुक्त, जलद, निःपक्षपाती आणि कार्यक्षम यंत्रणा म्हणून काम करते. एच. एस. वर्मा यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सदस्यांना त्यांच्या बँक खात्यातील घडामोडी आणि व्यवहारांवर एसएमएसद्वारे सतत लक्ष ठेवण्याचे त्याचबरोबर अनधिकृत व्यवहारांबाबत त्यांच्या संबंधित बँकांकडे त्वरित तक्रार करून सतर्क राहण्याचे आवाहन केले.
 
कार्ड हरवल्यास किंवा एखाद्या प्रसंगात माहितीत फेरफार झाल्यास संभाव्य नुकसान टाळण्यासाठी क्रेडिट कार्डवरील सीव्हीव्ही क्रमांकासारखी वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भर दिला. बँक खाते क्रमांक, डेबिट कार्ड तपशील, ओळख (आयडी), वैयक्तिक ओळख क्रमांक (पिन), किंवा वन-टाइम पासवर्ड (ओटीपी) यासारखी संवेदनशील वैयक्तिक माहिती अन्य कोणालाही देऊ नये, असे आवाहन श्री वर्मा यांनी केले. विशेषत: फोनवर या माहितीची विचारणा करणाऱ्या ठग अथवा तिऱ्हाईत व्यक्तीला तर अजिबात माहिती न देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच लॉटरी जिंकल्याबद्दल किंवा सोडतीबद्दल एसएमएस किंवा ईमेल पाठविणाऱ्यांना अजिबात कोणतेही पैसे हस्तांतरित करु नये, असा सल्लाही त्यांनी आपल्या भाषणात दिला.
 
डिजिटल वॉलेट्स, प्रीपेड पेमेंट सुविधा, मोबाईल बँकिंग आणि इलेक्ट्रॉनिक बँकिंग संबंधित तक्रारी, व्यापाऱ्यांनी क्रेडिट न देणे आदी प्रकरणांसह,अपुर्ण/अयशस्वी/अनधिकृत व्यवहारांसाठी परतावा मिळण्यासाठी आणि अन्य बऱ्याच आर्थिक बाबींबाबत रिझर्व्ह बँकेच्या लोकपालांकडे ऑनलाइन पोर्टलद्वारे आपल्या तक्रारी नोंदविण्यास सहभागी सदस्यांना यावेळी प्रोत्साहित करण्यात आले.रिंकू आनंद,अंकुर अरोरा आणि  मेघा मोरे यांच्यासह बजाज फायनान्सच्या प्रतिनिधींनी उपस्थित सदस्यांशी संवाद साधत त्यांना लोकपाल योजनेविषयी महत्वपुर्ण माहिती देत त्यांच्यात जागरुकता निर्माण केली. मलिक आणि काब्रा यांनी सर्व उपस्थितांना ऑनलाइन बँकिंग आणि एटीएम वापरताना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले. तसेच कोणालाही आपला पिन क्रमांक किंवा ओटीपी देऊ नये, असा सल्ला दिला. तक्रारदार व्यक्ती आपल्या तक्रारींच्या स्थितीबद्दल चौकशी करू शकते किंवा टोल-फ्री क्रमांक 14448 वर रिझर्व्ह बँक लोकपालाशी संपर्क साधून आपले मुद्दे मांडू शकतात, हा महत्वपुर्ण मुद्दा त्यांनी यावेळी अधोरेखित केला.
 
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लोकपाल मुंबई, बजाज फायनान्स आणि बजाज ऑटो लिमिटेड या तिघांमधील सहकार्य सार्वजनिक जागरूकता, आर्थिक साक्षरता आणि फसवणूक रोखण्याबाबत त्यांची वचनबद्धता अधोरेखित करते. आपल्या आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करण्याबरोबरच बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रामध्ये येणाऱ्या कोणत्याही समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी अधिकाधिक व्यक्तींना सक्षम व साक्षर बनवण्यासाठी हा कार्यक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.