काय दाखवणार?

    25-Oct-2023
Total Views |
Editorial on Vijayan govt plans to launch microsite on 'Islam in Kerala' to attract tourists

पिनाराई विजयन सरकारने चक्क ‘केरळमधील इस्लाम’ पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मग विजयन दहशतवादी संघटनांमधील केरळी मुस्लिमांचा भरणा, हिंदूंवरील अत्याचार, ‘केरळ फाईल्स’सारखे धर्मांतराचे प्रकार, कट्टरतावादाचा प्रचार आणि प्रसार हे वास्तवही पर्यटकांना यानिमित्ताने दाखवण्याचे धारिष्ट्य करणार का, हाच खरा सवाल!


केरळमधील पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट सरकार लवकरच राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘केरळमधील इस्लाम’ यासाठी म्हणे एक संकेतस्थळ तयार करणार आहे. हे संकेतस्थळ केरळमधील इस्लामची मुळे शोधून काढून त्याची डिजिटल प्रसिद्धी करेल. केरळचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री पीए मोहम्मद रियास यांनी यासाठी तब्बल 93.8 लाख रुपयांचा निधी मंजूर केला, हे विशेष. म्हणजेच पर्यटनाच्या नावाखाली विजयन यांचे सरकार इस्लामचा प्रचार आणि प्रसार करणार, हे उघडच. केरळमधील मुस्लिमांचा इतिहास विशेषत्वाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार. प्रत्यक्षात हे संकेतस्थळ इस्लामी मूलतत्त्ववाद्यांना आकर्षित करण्यासाठीच आहे, असे म्हटले तर फारसे वावगे ठरू नये. विजयन यांचा हा प्रकल्प म्हणजे तुष्टीकरणाचे राजकारणच. म्हणूनच केरळमधील ज्येष्ठ स्वयंसेवक आणि लेखक, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संघटनेचे राष्ट्रीय संयोजक जे. नंदकुमार यांनी केरळच्या पर्यटन मंत्र्यांविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे.

प्रस्तावित प्रकल्प हा केवळ इस्लामचे उद्दात्तीकरण करायचे, या एकाच उद्देशाने प्रेरित दिसतो. केरळमधील इस्लाम हा सातव्या शतकात रुजला, असा केला जाणारा दावा हा निखालस खोटा आहे. चेरामन मशिदीची उभारणी सातव्या नव्हे, तर चौदाव्या शतकात झाली. स्थापत्य शैली तसेच ऐतिहासिक नोंदी हेच सांगतात, असे नंदकुमार यांनी म्हटले आहे. मग असे असेल तर मुळी केरळमधील विजयन सरकारला इस्लामी संकेतस्थळ उभे करण्याची गरज का वाटली, हाच प्रश्न उपस्थित होतो.पर्यटनाला चालना देण्यासाठी हे संकेतस्थळ काम करेल, असा दावा विजयन सरकारने केला आहे. तथापि, गेल्या वर्षी केरळने पर्यटनातून तब्बल 12 हजार, 285 कोटी रुपयांचा महसूल जमा केला, ज्याचा केरळच्या जीडीपीत वाटा दहा टक्के इतका आहे. केरळमधील हिंदू मंदिरे, नितांत सुंदर समुद्रकिनारे, थंड हवेची ठिकाणे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. वैद्यकीय पर्यटन आणि आयुर्वेदिक उपचारांसाठी केरळ ही देवभूमी प्रसिद्ध. केरळची संस्कृती आणि वारसा जागतिक नकाशावर यापूर्वीच नोंद झाला आहे. असे असतानाही केरळ सरकार इस्लामी इतिहास जतन करत असेल, तर त्याकडे केवळ आणि केवळ तुष्टीकरणाचा प्रयत्न म्हणूनच पाहायला हवे. विजयन सरकारने एकगठ्ठा मुस्लीम मतांसाठीचे केलेले हे लांगूलचालनच. केरळ सरकारमधील मुस्लीम मंत्री त्यासाठी विशेषत्वाने काम करताहेत, यातच सर्वकाही आले.

केरळ आणि इस्लाम यांच्यातील संबंध सातव्या शतकापासून असल्याची मान्यता आहे; तसेच या संबंधांना रक्तरंजित इतिहासही आहे. अरब व्यापार्‍यांचा एक गट सातव्या शतकात मलबार किनारपट्टीवर आला होता. या अरब व्यापार्‍यांनी कोझिकोड तसेच कोचीसारख्या किनारी मुस्लीम वसाहती स्थापन केल्या, अशा नोंदी सापडतात. तथापि, 13व्या शतकात आलेल्या मोपला मुस्लिमांनी केरळमधील इस्लामचा हिंसाचाराने आणि रक्ताळलेला इतिहास लिहिला. स्थानिकांशी विवाह करून केरळात स्थिरावले आणि ते शक्तिशाली बनले. 16व्या शतकात मोपला आणि स्थानिक हिंदू राज्यकर्ते यांच्यात संघर्षांची मालिका सुरू झाली. 1591-1602 या कालावधीत झालेल्या पोर्तुगीज राजवटीविरोधातील मलबार बंड झाले. हे बंड पोर्तुगीजांनी चिरडले. तथापि, 1921 मध्ये मोपल्यांनी केलेल्या बंडात हजारो बळी पडले. हिंदूंना यात मोठ्या संख्येने मारले गेले. ऑगस्ट 1921 मध्ये झालेल्या या बंडात हिंदू मंदिरांना लक्ष्य केले गेले. मूर्तींची विटंबना करण्यात आली. हिंदू गावांवर हल्ले केले गेले. इंग्रजांनी हे बंड मोडून काढले असले, तरी हिंदूंची अपरिमित हानी झाली. केरळमधील हिंदू तेव्हापासून हिंदू-मुस्लीम संघर्षाची झळ सोसत आहेत.

शतकानुशतके केरळमध्ये हिंदूंविरुद्ध हिंसाचार तसेच छळाच्या घटना घडल्या आहेत. केरळमध्ये कम्युनिस्ट विचारसरणीचे सरकार आले, तरी हिंदूंवरील अत्याचार कायम राहिले. कम्युनिस्टांनी नेहमीच हिंदूविरोधी धोरणांना प्रोत्साहनच दिले. एवढेच नाही तर शेकडो हिंदुत्ववादी संघ परिवार तसेच भाजप कार्यकर्त्यांचे खून पाडले. त्यांच्यावर निर्बंध लादले. नुकताच ‘त्रावणकोर देवस्मोम मंडळा’ने संघ परिवारावर नव्याने प्रतिबंध लादले. ‘त्रावणकोर देवस्मोम मंडळ’ ही प्रदेशातील प्रमुख मंदिरांचे व्यवस्थापन करते. देवस्मोम आयुक्तांनी एक परिपत्रक काढून देवस्थानांच्या आवारात मंत्रोच्चार करण्यासही बंदी घातली. त्याचबरोबर मंदिराच्या आवारात संघाच्या शाखा भरतात का, हे पाहायला तसेच तेथे कोणते प्रशिक्षण दिले जाते, हे तपासण्यासाठी अकस्मात छापे टाकण्यासाठीचे निर्देश दिले आहेत.

हिंदू मंदिरे तसेच संस्थांवर लादण्यात येणारे हे निर्बंध हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्य तसेच सुरक्षिततेला धोका पोहोचविणारेच आहेत. तसेच हिंदू राष्ट्रवादावर करण्यात येणारा हा हल्लाच. भगव्यावर बंदी घालून त्यांच्या श्रद्धेचे प्रतीक हिरावून घेण्याचाच हा प्रयत्न. केरळमध्ये घडत असलेल्या धर्मांतरावर ‘केरळ फाईल्स’ चित्रपटाने जळजळीत प्रकाश टाकला होता. तथापि, अशावेळी शहामृगासारखे विजयन सरकार वाळूच्या ढिगार्‍यात तोंड खुपसून बसलेले संपूर्ण देशाने पाहिले.इस्रायल-‘हमास’मधील रक्तरंजित संघर्षात ‘हमास’ला भारतातून मिळणारे बळ, या पार्श्वभूमीवर केरळमधील हिंदूंविरोधात तेथील सरकार घेत असलेली भूमिका याचे गांभीर्य अधोरेखित करते. ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेत केरळमधील मुस्लिमांची वाढत्या संख्येने होणारी भरती, हीसुद्धा गंभीर चिंतेची बाब. केरळमधील मुस्लीम सीरिया तसेच इराकमध्ये लढत असल्याची वृत्ते येत आहेत. म्हणूनच केरळमधील इस्लामी जात्यांधपणा वाढीस लागला आहे.

मुस्लिमांसाठी स्वतंत्र जिल्ह्यांची मागणी याच जिहादी मानसिकतेतून पुढे येत आहे. केरळच्या एकता आणि अखंडतेला धोका पोहोचवणारी अशी ही मागणी. मलबार आजही हिंदूंसाठी सुरक्षित नाही. सरकारने सर्वधर्मियांच्या हिताचे संरक्षण करायचे असते, याचा केरळमधील विजयन सरकारला मात्र विसर पडलेला दिसतो. विजयन सरकारच्या कालावधीत हिंदूंवर होणारे अत्याचार, वाढता मुस्लीम दहशतवाद हेच केरळमधील इस्लामचे वास्तव. ते दाखवण्याचे धाडस मुख्यमंत्री विजयन करणार का? नाहीच, तर मग ते नेमके ‘केरळमधील इस्लाम’ म्हणून काय दाखवणार?