खोक्याची लंका दहन करणारी धगधगती मशाल माझ्यासोबत: उद्धव ठाकरे

    24-Oct-2023
Total Views |

dasra melava

मुंबई :
शीवतीर्थावर उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. खोक्याची लंका दहन करणारी धगधगती मशाल माझ्यासोबत आहे, असं ठाकरेंनी म्हटलं आहे. ५७ वर्ष झाले पण आपण आपली परंपरा चालूच ठेवली आहे. काही लोकांनी ही परंपरा मोडून काढण्याचा प्रयत्न केला. पण आपण मोडू दिला नाही. आपला मेळावा झाल्यानंतर इथे आपण खोकासुराचं दहन करणार आहोत. असंही ठाकरेंनी भाषणात बोलताना सांगितले.
 
उद्धव ठाकरे म्हणाले, "रामाने रावणाचा वध केला कारण, रावण माजला होता. त्याने सीताहरण केलं होतं. त्याचप्रमाणे, आज आपली शिवसेना पळवण्याचा प्रयत्न होतोय. त्यांनी खबरदारी घेतली आहे, रामाने रावणाचा वध धनुष्यबाणाने केला होता म्हणून त्यांनी धनुष्यबाणही चोरला. पण ज्याप्रमाणे हनुमानाने रावणाची लंका जाळली, तशी हजारो धगधगत्या मशालींनी तुमची खोक्यांची लंका जाळून टाकू. महाराष्ट्र आणि देशात सध्या खूप प्रश्न आहेत. भाषणाच्या सुरुवातीला आवर्जून जरांगे पाटलांना धन्यवाद देत आहे. अथ्यंत व्यवस्थितपणे त्यांनी आंदोलन सुरू ठेवलं आहे. आज त्यांनी धनगरांना साथ घातली. ज्याप्रमाणे डायरने जालियनवाला बागमध्ये गोळीबार केला होता, त्याचप्रमाणे अंतरवाली सराटीमध्ये लाठीहल्ला केला. एवढ्या निर्घृणपणे कसे वागता. मी मुख्यमंत्री असतानाही आंदोलन सुरू होतं. तेव्हा मी लाठीचार्जचा आदेश दिला नव्हता. तेच पोलिस आहेत, पोलिस आदेशाशिवाय असं वागू शकत नाहीत."
 
"काश्मीरमध्ये दंगलखोरांवर ज्या छर्ऱ्याच्या बंदुका वापरतात त्याने आंदोलकांवर गोळ्या चालवल्या. हा विषय सोडवायचा असेल तर तो लोकसभेमध्ये सोडवावा लागेल. गणपतीच्या दिवसांत जे अधिवेशन झालं, त्यात हा निर्णय होईल, असं आम्हाला वाटलं होतं. मराठा समाज, धनगर, ओबीसींना न्याय मिळेल असं वाटलं होतं. जातीपातीच्या भिंती उभ्या करून आपसांत झुंजवण्याचं जे कारस्थान भाजप करत आहे, ते आपल्याला मोडून टाकायचं आहे. ज्यांच्याशी आपण लढत आहोत तो कपटी आणि विघ्नसंतोषी आहे. जे कोणाचंही लग्न असो तिथं जाणार, पोटभरून खाणार, ढेकर देणार पण निघताना नवरा बायकोत भांडण लावून दुसऱ्या लग्नात भांडण लावायला जाणार. पानिपतमध्ये जो अब्दाली आला होता, त्याने हेच केलं होतं. भांडणं लावायची आणि बेकारी, महागाई अशा प्रश्नांवरून लक्ष हटवायचं. पेटत्या घरांच्या होळीवर पोळी भाजायचं काम त्यांनी केलं." असं उद्धव ठाकरे म्हणाले.