इस्रायल-हमास युद्धात न्यूयॉर्क टाईम्सचा खोटारडेपणा उघड; इस्रायलवर लावले होते खोटे आरोप

    24-Oct-2023
Total Views |

New York Times


मुंबई :
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान १७ ऑक्टोबर रोजी गाझा शहरातील अल-अहली हॉस्पिटलवर रॉकेट हल्ला झाला होता. यात ५०० जणांचा मृत्यू झाला. हा हल्ला इस्रायलने केल्याचा दावा करण्यात येत होता. न्यूयॉर्क टाईम्सने याबाबतचे वृत्त वारंवार प्रकाशित केले होते.
 
परंतू, नंतर पॅलेस्टिनी इस्लामिक दहशतवाद्यांनी इस्रायलच्या दिशेने फेकलेल्या रॉकेटच्या चुकीमुळे हा हल्ला झाल्याचे इस्रायलने स्पष्ट केले होते. त्यानंतर आता न्यूयॉर्क टाईम्सने याबद्दल एक पत्रक जारी केले आहे. यात त्यांनी आपल्या चुकीचे स्पष्टीकरण दिले आहे.  

 
यात त्यांनी कबुल केले की, गाझातील हॉस्पिटलवरील हल्ल्याबाबतचे त्यांचे सुरुवातीचे कव्हरेज हे हमासच्या दाव्यांवर अधिक केंद्रित होते. सुरुवातीला हमासच्या खोट्या दाव्यावरुन वारंवार वृत्त प्रसारित केल्यानंतर आता न्यूयॉर्क टाईम्सने १७ ऑक्टोबर रोजी प्रकाशित केलेल्या बातमीत संपादकीय चूक असल्याचे कबुल केले आहे.
 
न्यूयॉर्क टाइम्सने जारी केलेल्या पत्रकात लिहिले की, १७ ऑक्टोबर रोजी गाझा रुग्णालयावर झालेल्या हल्ल्याचे सुरुवातीचे कव्हरेज आणि बातम्या या हमासने केलेल्या दाव्यांना अनुसरुन होत्या. तसेच यामुळे वाचकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचल्याचेही त्यांनी कबुल केले आहे.