डोंबिवली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कल्याण जिल्ह्याच्या वतीने विजयादशमी निमित्त कल्याण, डोंबिवली व टिटवाळा या भागात संपूर्ण गणवेशातील स्वयंसेवकांची घोषाच्या तालावर एकूण १३ संचलने काढण्यात आली. त्यात काही हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते.
संचलनानंतर झालेल्या उत्सवांत विविध मान्यवरांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. कल्याण पश्चिम भागातील प्रमुख उत्सवात बोलतांना क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी यांनी भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी स्वयंसेवकांनी आपले आधिकाधिक योगदान द्यावे असे आवाहन केले.
ते पुढे म्हणाले, संघाच्या ९९ वर्षाच्या परिश्रमातून हजारो संस्था निर्माण झाल्या तरीही सर्व समाजाला शाखेवर आणण्यासाठी अधिक परिश्रमाची आवश्यकता आहे. समाजातील अनेक घटक संघाजवळ येत आहेत. परंतू अजून ते स्वतःला जाती बंधनात बांधून घेत आहेत. जातीभेद विसरून ते हिंदू म्हणून उभे रहावे असा आपला प्रयत्न राहीला पाहिजे.
उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून कल्याणातील उद्योजक सुरेश संगोई हे उपस्थित होते. त्यांनी संघाच्या संस्कारांचे महत्व सांगून संघ करीत असलेल्या विविध सेवा कार्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला.