मुंबई : “सामाजिक एकतेसाठी राजकीय विचारांतून वेगळे होऊन संपूर्ण समाजाचा विचार करून चालण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वप्रथम परस्परांविषयी असलेला अविश्वास अथवा राजकीय वर्चस्वाच्या डावपेचांपासून दूर जावे लागेल. कारण देशात चालणाऱ्या स्पर्धात्मक राजकारणातून दोन गटांत फूट पाडणे ही दुर्भाग्याने रीती बनली आहे. म्हणून सर्वांनी संघटीत होऊन एका मार्गाने विचार करून चालण्याचा निश्चय करणे गरजेचे आहे. ‘संघटीत बलसंपन्न समाज’ हाच त्यावर एक उपाय आहे. असा समाज घडवण्याचे काम संघ करत आहे.”, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी नागपूर येथे केले.
मंगळवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी रेशिमबाग या रा.स्व.संघाच्या मुख्यालयात सकाळी ७.४० वाजता 'विजयादशमीचा उत्सव' पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान मंचावर सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, विदर्भ प्रांत संघचालक रामजी , नागपूर महानगर संघचालक राजेश लोया, नागपूर महानगर संघाचे सहसंघचालक श्रीधर गाडगे यांसह प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध गायक व संगीतकार पद्मश्री शंकर महादेवन उपस्थित होते. यावेळी संघाचे संस्थापक प.पू.डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांना आद्य सरसंघचालक प्रणामही देण्यात आला.
देशात आणि जगभरात सुरु असलेल्या घडामोडींवर लक्षकेंद्रीत करत सरसंघचालक म्हणाले, “सध्या हिंसा, दंगली, छेडछाड आदी घटनांसाठी एकमेकांवर आरोप करण्याच्या घटना घडत आहेत. काही लोकांची कृती ही त्या संपूर्ण समाजाची कृती आहे, असे गृहीत धरून त्याप्रमाणे विधाने केली जात आहेत. ज्या शक्ती समाजाला एकमेकांत लढवत ठेवून देश तोडू पाहत आहेत; ते याचा पुरेपूर फायदा घेतात. त्यामुळेच एखादी छोटीशी घटना देखील अवास्तव मोठी करून बघता मोठ्या प्रमाणावर प्रसारित केली जाते. देशविदेशातून चिंता व्यक्त करणारी आणि इशारा देणारी विधाने प्रचारित केली जातात. त्यानंतर हिंसा भडकवणारे ‘टूल किट’ सक्रिय केले जातात आणि परस्पर अविश्वास आणि द्वेष आणखी वाढविले जातात.”
सरसंघचालक पुढे म्हणाले की, “कोणीही कितीही चिथावणी दिली तरी प्रत्येक परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करीत, नागरी शिस्त पाळून, आपल्या घटनेने दिलेल्या संकेतांनुसार आचरण अनिवार्यपणे करायला हवे. प्रसारमाध्यमांतून होणारा चिथावणी देणारा भडकाऊ अपप्रचार आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या स्पर्धेत कोणीहू अडकता कामा नये. प्रसारमाध्यमांचा उपयोग समाजात सत्य आणि आत्मीयता पसरवण्यासाठीच व्हायला हवा.”
भारताचा विकास न बघवणाऱ्या आसुरी शक्तींबाबतही सरसंघचालकांनी यावेळी भाष्य केले. ते म्हणाले, “भारतात आणि भारताबाहेरील काही आसूरी शक्तींना विकसित होणारा भारत बघवत नाहीये. त्यामुळे त्यांच्याकडून कटकारस्थानं सध्या होत आहेत. आपल्या बेसावधपणामुळे आणि परस्पर अविश्वासामुळे आपण अशा कृत्यांना बळी पडतो. भारताचा विकास झाला तर कलह मिटतील, दुःखाचा नाश होईल या भितीमुळे काहीजण असे कृत्य करतात. जगभरात चालणाऱ्या कृत्याला पाहून मग ते असे कृत्य आपल्या समाजातही करू पाहतात. राजकारणात राजकीय स्वार्थासाठी, प्रतिस्पर्धीला हरवण्याठी अशा प्रवृत्तीच्या लोकांशी गठबंधन करण्याचा प्रत्यन होताना दिसतो. समाजात जर आत्मविस्मृती, भेद, आपापसातील लढाई, स्वार्थाप्रती प्रतीस्पर्धा, ईर्शा, द्वेश असेल तर अशा लोकांचे काम आणखी सोपे होते. त्यामुळे अशा आसुरी शक्तींची ताकद वाढणार नाही याकडे आपल्याला लक्ष देण्याची आज गरज आहे. मणिपूर याचे ज्वलंत उदाहरण आहे. आज मणिपूरमध्ये शांतता निर्माण होत असली तरी समाजाने एक विचाराने संघटीत होऊन मार्ग शोधणे आवश्यक आहे. संघ स्वयंसेवकांनी अत्यंत शांत डोक्याने मणिपूरची परिस्थिती सांभाळून घेतली आणि तेथे शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी झाले. स्वयंसेवक तिथे कार्यरत असले तरी सर्व समाजाने यासाठी काम करणे आवश्यक आहे.”
आगामी निवडणुका लक्षात घेता समाजाला आवाहन करत सरसंघचालक म्हणाले, “निवडणुकांचा कालावधी जवळ येत आहे, त्यामुळे सर्वांना सावध राहण्याची आवश्यकता आहे. कारण या कालावधीत अशा गोष्टी आणखी प्रभावित होऊ शकतात. निवडणूकीत मतदान करणे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. समाजाला जागरूक करण्यासाठी संघ स्वयंसेवक आपले कर्तव्य बजावतीलच. त्यामुळे योग्य व्यक्तीस मतदान करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.”
‘स्व’च्या आधारे एक यशस्वी प्रयोग जगाला द्यायचा आहे.
“प्रत्येक गोष्टीत ‘स्व’ आहे. त्याच ‘स्व’ला जगाला समर्पित करण्याची वेळ आली आहे. ‘स्व’च्याआधारे देशाचे यशस्वी जीवन संपूर्ण जगाला दाखवून देणे आपले कर्तव्य आहे. हीच आजच्या विश्वाची आवश्यकता सुद्धा आहे. विश्वात असलेल्या अनेक समस्यांचा मार्ग शोधण्यासाठी संपूर्ण जग भारताकडे पाहत आहे. केवळ स्वार्थापोटी जगातील कट्टरपंथीयांचे कटकारस्थान होताना दिसत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी भारताने रस्ता दाखवावा अशी जगाची अपेक्षा आहे. भारताला या समस्यांचे आपल्या देशात निराकरण करून रस्ता दाखवावा लागेल. आपल्याला जगाची नक्कल न करता स्वतःचा मार्ग तयार करायचा आहे. ‘स्व’च्या आधारे एक यशस्वी प्रयोग जगाला द्यायचा आहे. शासन-प्रशासन यासाठी तयार आहेच, परंतु समाजालाही आपल्या ‘स्व’ची माहिती असणे आवश्यक आहे.”, असे सरसंघचालक म्हणाले.
अखंड भारताच्या विचारामागे संघाचे मोठे योगदान!
सरसंघचालकांची मुंबईत झालेली पहिली भेट अविस्मरणीय होती. विजयादशमी उत्सवाचे आमंत्रण स्वतः सरसंघचालकांनी दिले ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आज या उत्सवाची भव्यता पाहून मला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. अखंड भारताचा विचार, संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवण्यात संघाशिवाय कोणाचेच योगदान नाही. भारताला लाभलेले संगीत हा एक खजाना आहे. आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत त्याचा जगभरात प्रसार कसा होईल याचा विचार करण्याची खरी गरज आहे. पुढच्या पिढीला शास्त्रीय संगीताची माहिती व्हावी यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. ज्याप्रमाणे एखाद्या डिजिटल संगणकामागे बायनरी कोड असतात, त्याप्रमाणे प्रत्येक संगीतामागे काही सरगम असतात. आणि म्हणून देशाला जर एक संगीत म्हणून संबोधले तर रा.स्व.संघाचे स्वयंसेवक हे त्या संगीतामागील सरगम आहेत. कारण देशावर येणाऱ्या कुठल्याही आपत्तीवेळी हेच स्वयंसेवक सायलेंटली उभे राहतात. असे स्वयंसेवक भारताला लाभले आहेत, त्यामुळे जगात कुठेही गेलात तरी आपण भारतीय आहोत याचा अभिमान बाळगा.
- पद्मश्री शंकर महादेवन, गायक व संगीतकार