नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणांवरून स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. पर्यावरणात, वन्यजीवांवर आणि संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या पर्यावरणातील नवदुर्गांच्या कार्याचा हा अल्पपरिचय...
पर्यावरणाचे संवर्धन, जतन आणि जनजागृती करण्याच्या विचाराने झपाटलेल्या संगिता नंदकिशोर जोशी. आपल्या आवडीमुळे पर्यावरणाविषयी जनजागृती आणि इतर काम करणार्या ’पर्यावरण दक्षता मंडळ’ या संस्थेबरोबर काम करत आहेत. पर्यावरणाच्या विविध शाखांमध्ये काम करण्याच्या उद्देशाने दि. ९ जुलै, १९९९ साली स्थापन झालेल्या पर्यावरण दक्षता मंडळाच्या सचिव म्हणून त्या सध्या काम पाहत आहेत.
एनव्हार्यनमेंटल सायन्स या विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेल्या संगीता यांनी संवर्धन आणि जनजागृतीच्या कामामध्ये स्वतःला झोकून दिले आहे. पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेमार्फत सुरू असलेली पर्यावरण शाळा संगीता यांनी सुरू केलेली आहे. असे अनेक उपक्रम राबविणारे पर्यावरण दक्षता मंडळ संस्थेने यंदा रौप्य महोत्सवी वर्षांत पदार्पण केले असून विविधांगी उपक्रम राबवून महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.