ट्रुडो यांच्या नेतृत्वाखाली कॅनडाची प्रतिमा डागाळली

कॅनडियन विरोधी पक्षनेत्यांचा टोला

    23-Oct-2023
Total Views |
canda

नवी दिल्ली :
कॅनडातील कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते पियरे पोइलिवरे यांनी भारतासोबतच्या राजनैतिक वादावर पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर टीका केली आहे. गेल्या आठ वर्षांत ट्रुडो यांची कोणतीही किंमत राहिलेली नसून भारतासह जगभरात त्यांचे हसे झाले आहे, असे पोइलिवरे यांनी म्हटले आहे.

कॅनडात २०२५ मध्ये होणार्‍या निवडणुकांसाठी पोइलिहरे हे विद्यमान पंतप्रधान ट्रुडो यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. पोइलिवरे यांचा पक्षदेखील सार्वत्रिक निवडणुकांबाबत घेण्यात आलेल्या काही जनमत चाचण्यांमध्ये त्यांचा पक्ष आघाडीवर आहे. 'नमस्ते रेडिओ टोरंटो'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत विरोधी पक्षनेते पियरे पोइलिवरे यांनी ट्रुडो यांच्यावर जोरदार टिका केली आहे.

कॅनडाच्या परराष्ट्र धोरणाच्या हाताळणीवर पोइलिवरे यांनी ट्रुडो यांना लक्ष्य केले. चीन देशात ढवळाढवळ करत असून अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी तर कॅनडाच्या पंतप्रधानांचे पायपुसणे केले आहे. ट्रुडो यांच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात कॅनडाची प्रतिष्ठा डागाळली आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात जस्टिन ट्रुडो हे हास्यास्पद झाले आहेत. आपल्या पक्षाची सत्ता आल्यास भारतासोबत संबंध सुधारण्यावर भर देण्यात येईल. असे पोइलिवरे यांनी म्हटले आहे.

कॅनडातील हिंदू मंदिराची तोडफोड आणि हिंदूफोबिया यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पोइलिवरे म्हणाले की, कंझर्व्हेटिव्ह पक्ष हिंदू मूल्यांचा आदर करतो. धार्मिक स्वातंत्र्य, उपासना करण्याचे स्वातंत्र्य असावे, असे आमचे मत आहे. हिंदू मंदिरांवरील हल्ले, हिंदू नेत्यांना दिलेल्या धमक्यांचा मी तीव्र निषेध करतो. हिंदू मंदिरांवर हल्ला करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई व्हायला हवी. त्याचप्रमाणे भारतीय राजनयिकांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधातदेखील कारवाई व्हावी, असे आपले असल्याचे पोइलिवरे यांनी म्हटले आहे.