संघाचे कार्य गेले शतकभर सुरू आहे. त्या कार्याला आता धुमारे फुटले आहेत आणि तरीही या कार्याची यापुढेही आवश्यकता आहे. या संघटनेची ज्युबिली साजरी व्हावी, अशी आपली अपेक्षा नाही, असे डॉ. हेडगेवार यांचे विधान उद्धृत करण्यात येते. मात्र, याचा अर्थ ते कार्य शक्य तितक्या वेगाने व्हावे, असा त्यातील अर्थ अध्याहृत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला ९८ वर्षे पूर्ण होत आहेत. शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या संघाच्या वाटचालीचा प्रारंभबिंदू १९२५ हा असला तरी तत्पूर्वीपासूनच संघनिर्माते डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या मनात अशा संघटनेचा विचार आकार घेत होता. पारतंत्र्यात असणार्या देशासमोर सर्वांत मोठे लक्ष्य, हे स्वातंत्र्यप्राप्तीचेच असते. मात्र, ती ध्येयप्राप्ती करण्यासाठी पारतंत्र्याचा विळखा का पडला, या कारणांचा शोध घेणे आवश्यक, अशी डॉ. हेडगेवार यांची धारणा होती. कोणताही वैद्य हा एखाद्या व्याधीवर औषधोपचार करताना मुळात, ती व्याधी का उद्भवली, याचे अध्ययन करतो, जेणेकरून तो रुग्ण केवळ व्याधिमुक्तच व्हावा, असे नाही तर ती व्याधी पुन्हा उद्भवू नये, अशी त्या वैद्याची त्यामागची कल्पना असते. हेडगेवार डॉक्टर होते. कदाचित त्यांची भारतातील सामाजिक दोषांकडे पाहण्याची दृष्टी विकसित होण्यास, त्यांची ही शैक्षणिक पार्श्वभूमीही काही अंशी कारणीभूत असावी.
एकीकडे काँग्रेसमधील मवाळ आणि जहाल गट होते; दुसरीकडे क्रांतिकारक होते. क्रांतिकार्यात स्वतः डॉ. हेडगेवार सहभागी होते. तेव्हा त्या मार्गाच्या सामर्थ्यांची आणि मर्यादांची त्यांना जाणीव असणार. काँग्रेसमध्येही ते सक्रिय होते. लोकमान्यांचे ते भक्त होते. लोकमान्यांचा पगडा देशभरच्या तरुणांवर होता आणि डॉ. हेडगेवार त्यास अपवाद नव्हते. १९२० साली लोकमान्यांचे देहावसान झाले आणि काँग्रेसचे एकमुखी नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे गेले. लोकमान्य निवर्तल्यानंतर डॉ. हेडगेवार यांना निराळी संघटना काढावीशी वाटली, हा योगायोग असावा की, काँग्रेसच्या नव्या नेतृत्वाच्या धोरणांविषयी असणारा अपेक्षाभंग असावा, असाही प्रश्न उपस्थित झाल्याखेरीज राहत नाही. दि. २८ मार्च १९३७ रोजी अकोला येथे एका बैठकीत केलेल्या भाषणात डॉ. हेडगेवार यांनी म्हटले होते की, “१९१४ साली इंग्लंड व जर्मनी यांच्यात तुमूल युद्ध सुरू होते. अशा वेळी देशात नवीन कार्य सुरू करण्यासारखी परिस्थिती नव्हती. १९१८ साली महात्मा गांधींचा काळ सुरू झाला. देशात त्याचे राज्य सुरू झाले व १९२० साली त्याचे परिणामही दिसू लागले. अशा सर्व अडचणीत मला त्रास देत असलेले विचार सत्यकृतीत उतरवणे शक्य झाले नाही,“ हा दाखला महत्त्वाचा. गांधीजींकडे काँग्रेसची सूत्रे आल्यानंतर पाच वर्षांतच डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली, हे नोंद घेण्यासारखे. संघाच्या प्रारंभीच्या काळाचा मागोवा डॉ. हेडगेवार यांच्या भाषणांतून आणि त्यांनी केलेल्या पत्रव्यवहारातूनच घेणे, त्यामुळे औचित्याचे.
संघाची स्थापना हिंदू समाजाच्या संघटनेसाठी करण्यात आली होती, हे उघडच होते. मात्र, तरीही या संघटनेच्या नावात ‘हिंदू’ असा शब्द का नसावा, असा प्रश्न पडणे स्वाभाविक. त्यामागची कारणमीमांसा डॉ. हेडगेवार यांनी त्याच भाषणात नमूद केली होती. संघटनेची स्थापना झाल्यानंतर सहा-एक महिन्यांनी संघाला नाव मिळाले. १९२५ सालच्या विजयादशमीच्या दिवशी या संघटनेची सुरुवात झाली आणि त्यापुढील वर्षाच्या वर्षप्रतिपदेच्या दिवशी, या संघटनेचे नामकरण ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ असे करण्यात आले. डॉ. हेडगेवार यांनी म्हटले होते की, “सहा महिने संघकार्य केल्यानंतर आपण व्यवस्था कशी करू शकतो, हे ओळखण्याकरिता व अनुभवण्याकरिता वर्षप्रतिपदेला रामटेकच्या यात्रेस जाण्याचे ठरले. तेव्हा साहजिकच लोकांनी असा प्रश्न विचारणे नैसर्गिक की, हे लोक कोण? कुठले? म्हणून नाव ठेवण्यासाठी बरीच चर्चा केली. सर्व लोकांचा भर याचे नाव ‘महाराष्ट्र स्वयंसेवक संघ’ ठेवावे यावर पडला. परंतु, आपली संघटना ही संपूर्ण हिंदुस्थानव्यापी करावयाची होती, म्हणून ते सार्थ वाटेना. डॉ. हेडगेवार यांचे द्रष्टेपण आणि संघटनेच्या कार्याच्या व्याप्तीबद्दलचे त्यांच्या मनातील स्पष्ट चित्र, याची कल्पना यातून येऊ शकेल.
डॉ. हेडगेवार पुढे म्हणतात की, “हिंदू स्वयंसेवक संघ असे नाव का असू नये? हा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा मी त्याचे असे समर्थन केले की, रशियात एखादी हिंदूंची कॉलनी असली व तिच्या संरक्षणार्थ एखादे स्वयंसेवक दल निर्माण करण्याची आवश्यकता असेल, तर त्या दलाला ‘हिंदू स्वयंसेवक संघ’ असे नाव योग्य होईल. परंतु, आपला देश हिंदूंचा असल्यामुळे येथील हिंदू हा राष्ट्रीय आहे व त्याच्या हितार्थ होणारी कोणतीही चळवळ ही राष्ट्रीयच! त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ!’‘ हे नाव स्वीकारण्यामागे डॉ. हेडगेवार यांचे केवढे चिंतन होते, याचा प्रत्यय आल्यावाचून राहणार नाही. ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ हे डॉ. हेडगेवार यांनी यातून अधोरेखित केले. केवळ टोकाचे तेच हितावह असे न मानता, प्रत्येक शब्दामागे आणि कृतीमागे चिंतन आणि दूरदर्शीपणा, हे डॉ. हेडगेवार यांचे वैशिष्ट्य होते.
स्वतः डॉ हेडगेवार यांनी काँग्रेसमध्ये कार्य केले होते, तरीही त्यांना संघासारखी स्वतंत्र संघटना स्थापन करावीशी वाटली. याचे कारण स्वातंत्र्यप्राप्ती हे काँग्रेसचे चळवळीचे ध्येय होते; तर समाजातील संघटन नव्हे, तर समाजाचे स्थायी संघटन हे डॉ. हेडगेवार यांचे ध्येय होते. अर्थात, या दोन्ही मार्गांचे महत्त्व होतेच आणि त्याची जाणीव डॉ. हेडगेवार यांना होती. त्यामुळे संघाची स्थापना केल्यानंतरदेखील ते काँग्रेसशी फटकून राहिले नाहीत. त्यांनी धोरण ठरविले ते इतकेच की, संघाच्या स्वयंसेवकांना काँग्रेसने पुकारलेल्या सत्याग्रहात सहभागी व्हायचे असेल, तर त्यांनी तसे बेशक करावे; पण संघ म्हणून तो सहभाग नसेल. यामागील तर्काचे स्पष्टीकरण डॉ. हेडगेवार यांनीच एका पत्रातून दिले होते.
मध्य प्रदेशातील बिलासपूरचे संघचालक नूलकर वकील यांना लिहिलेल्या पत्रात (दि. १८ सप्टेंबर १९३०) डॉ. हेडगेवार लिहितात की, “प्रस्तुत चळवळीत (काँग्रेसचा सत्याग्रह) संघाच्या अस्तित्वाला कोणत्याही प्रकारचा धोका लागता कामा नये. याचा अर्थ असा कोणी काढू नये की, संघ या चळवळीच्या विरुद्ध आहे. परंतु, संघकार्य हे राष्ट्रकार्य असल्यामुळे ते चालू ठेवणे, हे प्रत्येक स्वयंसेवकाचे कर्तव्य आहे. या चळवळीत भाग घ्यावयाचा आहे, त्यांनी व्यक्तिशः चालकांच्या परवानगीने भाग घ्यावा. परंतु, संघाचे जे कोणी आधारस्तंभ असतील, त्यांच्यावर मात्र संघ चालविण्याची जबाबदारी आहे. जागृती व्हावी म्हणून संघाचे या चळवळीशी सहकार्याचे धोरण आहे, विरोधाचे नाही, तरीपण संघाच्या अस्तित्वाला धोका पोहोचवून मदत करावी, असे संघाचे मत नाही.“
संघाने काय करावे, संघाची कार्यपद्धती कशी असावी इत्यादींवर टीकाटिप्पणी करणारे आताच आहेत, असे नाही. संघाच्या स्थापनेपासून ते होतेच. आता संघ शताब्दीच्या उंबरठ्यावर आहे. तेव्हा अशा टीकाकारांच्या मतलबी, छिद्रान्वेषीपणाला किती महत्त्व द्यायचे, याची संघ स्वयंसेवकांना आता सवय झाली आहे. मात्र, संघाच्या सुरुवातीच्या काळात संघाची व्याप्ती मर्यादित होती. संघाचे कार्य हिंदू समाजाच्या संघटनेचे आहे आणि दैनंदिन शाखेच्या माध्यमातून ते करावयाचे आहे, देशभक्ती नैमित्तिक असून उपयोग नाही, तर ती स्थायी असायला हवी इत्यादी संकल्पनादेखील अनोख्या होत्या. त्या सर्वांच्या गळी उतरणे शक्य नव्हते आणि साहजिकच संघाच्या कार्यपद्धतीत सुधारणा काही जण सूचवित असत. त्यांत सगळेच जण संघाचे टीकाकार असत असे नाही; संघाचे सहानुभूतीदार देखील असत. त्या सुरुवातीच्या काळात अशा टीकाटिपण्णी ऐकल्या की, स्वयंसेवक गोंधळून जाणे स्वाभाविक. तथापि, डॉ. हेडगेवार यांच्या विचारांतील स्पष्टतेचा प्रत्यय त्याबाबतीतदेखील आल्याखेरीज राहणार नाही.
१९३१ साली डॉ. हेडगेवार यांनी विदर्भातील श्री. मुलकर यांना पत्र लिहिले आणि याच संदर्भात मार्गदर्शन केले की, “आपले संघाचे कार्य जसे जोराने चालले आहे, तसेच जोराने चालू ठेवावे. दुसर्या कोणाचीही सूचना ऐकून कार्यपद्धतीत फरक करण्याचे कारण नाही. आत्मविश्वासाने, निश्चयाने, नेटाने व जगात कोणालाही न भीता आपण आपले कार्य करीत राहावे म्हणजे परमेश्वर आपल्याला यश देईल, याची खात्री बाळगावी.’‘ या पत्रातील शब्दयोजना पाहिली, तरी त्यातील नेमकेपणा दृगोच्चर होईल. कुठलाही मोघमपणा त्यात नाही; उगाच सर्वांच्या सूचनांचा अवश्य विचार करावा, असा आशाळभूतपणा नाही, आपल्या कार्याविषयी संदिग्धतेचा अंश त्यात नाही, जे मार्गदर्शन आहे, त्यात कुठेही अकारण नेतेपणाचा बढेजाव नाही, जे लिहिले आहे, ते प्रांजळ आहे, तरीही स्वयंसेवकांना दिशा देणारे आणि प्रेरित करणारे आहे, त्यांच्या मनातील संभाव्य गोंधळ दूर करणारे आहे. नेत्याची दृष्टी जेव्हा स्वच्छ असते, ध्येय जेव्हा अढळ असते; मार्ग जेव्हा स्पष्ट असतो, तेव्हाच असे शब्द अंतःकरणातून येऊ शकतात. डॉ. हेडगेवार स्वयंसेवकांना इतके स्पष्ट मार्गदर्शन करू शकतात, याचे कारण त्यांनी निवडलेल्या मार्गावर त्यांची अढळ निष्ठा होती.
हिंदू समाजाच्या संघटनेचे कार्य लगेच होईल असे नाही. तसे यश त्वरित मिळेल असे नाही, याची त्यांना जाणीव होती. लगेच यश येताना दिसले नाही की, अनेकांमध्ये चलबिचल होते किंवा तडजोडीची भावना निर्माण होते. मात्र, त्याने होते ते इतकेच की, कार्यनाश होतो. डॉ. हेडगेवार यांना ते होऊ द्यायचे नव्हते. संघाचे कार्य गेले शतकभर सुरू आहे. त्या कार्याला आता धुमारे फुटले आहेत आणि तरीही या कार्याची यापुढेही आवश्यकता आहे. या संघटनेची ज्युबिली साजरी व्हावी, अशी आपली अपेक्षा नाही, असे डॉ. हेडगेवार यांचे विधान उद्धृत करण्यात येते. मात्र, याचा अर्थ ते कार्य शक्य तितक्या वेगाने व्हावे, असा त्यातील अर्थ अध्याहृत आहे. डॉ. हेडगेवार यांनी १९३८ साली नागपूर येथे केलेल्या भाषणातून यावर भाष्य केल्याचे दिसेल. त्यावेळी संघाच्या स्थापनेला १३ वर्षे झाली होती.
डॉ. हेडगेवार यांनी त्या भाषणात जे म्हटले होते ते आजही तितकेच लागू होईल-’‘आता आपल्या कार्याला १३ वर्षे पूर्ण झाली आहे. या अवधीत आपल्या कार्याचा प्रसार बराच झाला. आपले म्हणणे लोक ऐकून घेत आहेत; मान्य करीत आहेत. ते आपल्या कार्याचे स्वागत करावयास तयार आहेत. गेल्या १३ वर्षांत आपण इतके कार्य केले. पण, १३ वर्षे हा काही लहान अवधी नाही. ही काही क्षुल्लक गोष्ट नाही. या एका तापाच्या अवधीत अपेक्षेपेक्षा पुष्कळच अल्प कार्य झाले आहे, ही गोष्ट जर आपण नीट निरीक्षण करून पाहाल, तर आपल्याला स्पष्ट दिसून येईल. नुसती विचारप्रणाली लोकमान्य करण्यासाठी, तिला केवळ तात्त्विक मान्यता मिळवून देण्यासाठी जर आपल्याला १३ वर्षे लागली, तर मग प्रत्यक्ष संघटन करण्यासाठी, प्रत्येक हिंदू अंतःकरणात भावनेची ज्योत पेटवून कार्याची प्रचंड व अभेद्य भिंत उभी करण्यासाठी आपण किती वर्षे काम करणार आहोत? हे साधे त्रैराशिक सोडवा म्हणजे सध्या चालू आहे, याच गतीने पुढेही काम चालू राहिल्यास, ते पूर्ण यशस्वी होण्यासाठी किती दीर्घकाळ लागेल, याची स्पष्ट कल्पना तुम्हाला सहज येईल आणि कार्याची गती वाढविण्याची जरुरी आपणास सहज समजेल.“
संघाच्या कार्याचे एका अर्थाने संघनिर्मात्याने केलेले हे आत्मपरीक्षण आणि प्रकट आत्मचिंतन. संघाच्या प्रारंभीच्या काळात संघ संस्थापकांच्या चिंतन-मननाचा प्रत्यय त्यातून अवश्य येईल. कामाचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करणे, निर्धारित लक्ष्याच्या फूटपट्टीवर कार्याचे मूल्यमापन करणे, जे झाले नाही, ते मान्य करणे आणि त्यातून धडा आणि बोध घेऊन पुढील मार्गक्रमण करणे, हे सगळे डॉ. हेडगेवार यांनी या भाष्यातून साधले आहे आणि नेतृत्व कसे असावे, याचा वस्तुपाठही घालून दिला आहे. त्या पावलांवर संघाचे मार्गक्रमण सुरू राहिले म्हणून अनेक संकटाना तोंड देत देतही संघ वर्धिष्णू राहिला आणि आता तो शतकपूर्ती करणार आहे!
राहूल गोखले
९८२२८२८८१९