३.५ लाख कोटींच्या भारत-मध्य पूर्व युरोप कॉरिडॉर प्रकल्पाचा शुभारंभ लवकरच!
23-Oct-2023
Total Views |
मुंबई : एकीकडे इस्त्रायल आणि हमासमधील युद्ध सुरु असताना आता भारताने भारत-मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEEC) चे काम सुरू केले आहे. या प्रकल्पाकाला ३.५ लाख कोटी रुपये खर्च येणार असून हा प्रकल्प भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
या प्रकल्पाद्वारे भारतीय बंदरांवरून जहाजाद्वारे संयुक्त अरब अमिरातीतील फुजैराह येथे माल पोहोचवला जाऊ शकेल. त्यानंतर ते कंटेनर रेल्वेने इस्रायलमधील हैफा येथे नेले जातील. पुढे, हैफा येथून कंटेनर इटली, फ्रान्स, यूके आणि अमेरिका आणि युरोपपर्यंत जातील. या प्रकल्पाद्वारे ग्रीस आणि उत्तर आफ्रिकेच्या बंदरांवरही माल पोहोचवता येणे शक्य होणार आहे.
भारत-मध्य पूर्व युरोप कॉरिडॉर या प्रकल्पाकरिता जी-२० परिषदेमध्ये सहमती झाली होती. याद्वारे ८ बंदरांना रेल्वे मार्गाने जोडण्यात येणार आहे. याबद्दल माहिती देताना रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव म्हणाले की, “३.५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. यामध्ये ४,५०० कोटी रुपयांच्या सोन नगर-आंदल लिंक अपग्रेडचाही समावेश आहे."
पुढे ते म्हणाले की, पश्चिम आशियातील तणावामुळे या प्रकल्पाच्या प्रगतीवर काही शंका उपस्थित केली जात आहे. परंतू, त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे मोदी सरकारने म्हटले आहे. तसेच आम्ही आठ बंदरांशी कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आमची गुंतवणूक वाढवू, जेणेकरून आम्ही देशाच्या कोणत्याही भागातून ३६ तासांच्या आत या बंदरांपर्यंत पोहोचू शकू, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या प्रकल्पाचे कौतूक केले आहे. ते म्हणाले की, हा प्रकल्प युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि मिडल इस्टसाठी एक चांगले भविष्य घडवण्यासाठी काम करेल. अमेरिका आणि संपूर्ण प्रदेशातील आमचे भागीदार मध्य पूर्वसाठी एक चांगले भविष्य घडवण्यासाठी काम करत आहेत. भारत, मध्य पूर्व आणि युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरसारख्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांद्वारे नवीन बाजारपेठा आणि अधिक रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील, असेही ते म्हणाले आहेत.