सरकारी शाळेत नमाज पठण करण्याचे प्रशिक्षण; हिंदू संघटनांच्या आक्षेपानंतर मुख्याध्यापकावर कारवाई

    22-Oct-2023
Total Views |
Lucknow-School-Namaz 
 
लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील एका सरकारी शाळेत विद्यार्थिनींना नमाज शिकवण्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी करण्यात आलेल्या विभागीय तपासात ३ कर्मचारी दोषी आढळले आहेत. शाळेच्या प्रभारी मीरा यादव यांना निलंबित करण्यात आले. सहायक शिक्षिका तहजीब फातिमा आणि शिक्षामित्र ममता मिश्रा यांच्यावर विभागीय कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. शनिवारी (२१ ऑक्टोबर २०२३) या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. याप्रकरणी हिंदू संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण लखनऊच्या ठाकूरगंज पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथील नेपियर रोडवर एक शासकीय प्राथमिक शाळा असून, येथे सुमारे १०६ विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेच्या आजूबाजूला संमिश्र लोकवस्ती आहे. शाळेत मुस्लिम विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याचा दावाही केला जात आहे. शनिवारी येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. व्हायरल व्हिडिओमध्ये काही विद्यार्थिनी भिंतीजवळ हिजाब घातलेल्या दिसत आहेत. त्या एका ठिकाणी उभ्या राहून नमाज अदा करताना दिसत आहे.
 
हा व्हिडिओ एक दिवस आधी शुक्रवारी (२० ऑक्टोबर २०२३) झालेल्या शुक्रवारच्या नमाजचा आहे. शाळेच्या हद्दीबाहेर उभ्या असलेल्या कोणीतरी हा व्हिडिओ बनवला आहे. हे दृश्य पहिल्यांदाच पाहिल्याचा दावा व्हिडिओच्या निर्मात्याने केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदू संघटनांनी आक्षेप नोंदवला. हिंदू संघटनेचे लोक शाळेत पोहोचले तेव्हा प्रभारी मीरा यादव यांच्याशी त्यांचा वाद झाला. या वादाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 
वाद वाढत असताना ही बाब लखनऊच्या जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी अरुण कुमार यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याप्रकरणी तातडीने चौकशी समिती स्थापन करून घटनेचा अहवाल लवकरच सादर करण्याच्या सूचना दिल्या. चौकशी समितीने आपला अहवाल बीएसए (प्राथमिक शिक्षण अधिकारी) यांना सादर केला. या अहवालात शाळेच्या प्रभारी मीरा यादव यांच्यासह सहाय्यक शिक्षिका तहजीब फातिमा आणि शिक्षा मित्र ममता मिश्रा यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
 
तपास अहवालाच्या आधारे प्रथमदर्शनी दोषी आढळल्याने अधिकाऱ्यांनी प्रभारी मीरा यादव यांना निलंबित केले आहे आणि ममता मिश्रा आणि तहजीब फातिमा यांना इशारा दिला आहे. या प्रकरणाचा सविस्तर तपास अद्याप सुरू आहे. तपास अधिकारी ब्लॉक शिक्षण अधिकारी राजेश कुमार यांनी पुढील कारवाईसाठी हा अहवाल १५ दिवसांत अधिकाऱ्यांना पाठवायचा आहे. निलंबित मीरा यादव यांना त्यांच्या पदावरून हटवून ब्लॉक रिसोर्स सेंटरमध्ये संलग्न करण्यात आले आहे.