महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, सर ज. जी. कला, वास्तुकला व उपयोजित कला महाविद्यालय, मुंबई यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन व सदिच्छा भेटीचा कार्यक्रम गुरुवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर ज. जी. कला महाविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्रदान केल्याचेही पत्र सुपूर्द करण्यात आले. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या स्वागतासाठी यावेळीआ योजित केलेल्या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृती आणि जुन्या दुर्मीळ कलाकृतींचे प्रदर्शन सध्या जेजे परिसरात कलारसिकांना अनुभवता येईल. त्यानिमित्ताने...
मुंबईचे सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट कला महाविद्यालय समूह आणि सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मिळून, सर ज. जी. कला, वास्तुकला व उपयोजित कला महाविद्याोलय’ या नावाने, ‘डिम्ड टु.बी. डिनोव्हो’ (अभिमत विद्यापीठ) असा दर्जा देण्याची एक पायरी पूर्ण झाली. गुरुवार, दि. १९ ऑक्टोबरला, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी, सर जेजे कलासमूहाने आयोजित कलाप्रदर्शनाला भेट दिली. व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंत्रिगणांनी ’सर जे. जे. ’ला ’डिम्ड टु.बी. डिनोव्होे’चा दर्जा दिल्याच्या पत्राचा सन्मानाने उल्लेख केला. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सदर देखण्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, तसे पत्र प्रदान केले.
या कार्यक्रमामुळे अगोदरच वैश्विक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या सर जे. जे. कला, उपयोजित कला आणि वास्तुकला महाविद्यालयाला एक मोठी प्रसिद्धी मिळाली. व्यासपीठावरील केंद्रीय शिक्षणमंत्री, कौशल्य विकास आणि उद्योजगतामंत्री धर्मेंद्र प्रधान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधानसभा अध्यक्ष आणि कुलाबा विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल नार्वेकर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा या सर्वच मान्यवरांनी दृश्यकला, कलेचं महत्त्व, सर ज. जी. कला समूहाचं महत्त्व यावेळी विशद केलं.
या मान्यवरांमध्ये, सर्वांनाच दृश्यकला आणि सर जे. जे. कला महाविद्यालय’ समूहाबाबत आत्मियता असल्याचे जाणवले. धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या भाषणात महाराष्ट्र आणि त्यांचे राज्य ओडिशा, या दोन राज्यांची तुलना फारच आपलेपणाने सांगितली. सांगून गेली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील अजिंठा आणि ओडिशातील कोणार्क, इकडे कोकण तर तिकडे पुरीचा तटवर्ती भाग, ओडिशातील बक्षी जगबंधू, तर महाराष्ट्रात राजा शिवछत्रपती असे अनेक समांतर नाते त्यांनी गुंफले. ’सर जेजे पॅटर्न’ हा जगभरात पोहोचेल जेव्हा जेजेला’ ’डिम्ब टू.बी. डिनोव्हो’चा दर्जा दिला जाईल. तेव्हा, अशी आशादेखील प्रधान यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. जेजेच्या वास्तुतील कला प्रदर्शन पाहताना त्यांना ’न्यूडिटिका’ हे पेंटिंग जेजेने १९व्या शतकात बनविले. आम्ही इतिहास बदलणारे लोक नसून, इतिहासाला पुढे नेणारे लोेक आहोत, हे सांगताना, आजही जेजेमध्ये ’न्यूड पेंटिंग्ज’ आणि ’न्यूड स्टडी’ चालतो. यावर त्यांनी प्रगल्भ दृष्टी ही जेजेने दिली, असे सांगितले.
१८५० ते १८५७च्या काळात जेव्हा देशात युद्ध स्थिती आणि क्रांतीचे वारे वाहत होते, तेव्हा जेजेने कलेच्या माध्यमातून खूप मोठे परिवर्तन सुरू केले होते. या संदर्भात त्यांनी वासुदेव गायतोंडे, रझा, राम सुतार अशा ज्येष्ठ कलाकारांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला. ‘डिनोव्हो दर्जा’ देण्याचा प्रशासकीय उपचार तर पूर्ण झाला. परंतु, जेव्हा कला शिक्षण हे सुरू होईल तेव्हा जेजे केवळ एक सर्टिफिकेट देणारी संस्था राहणार नाही, याची काळजी घेऊन, भारतीय संस्कृतीची खोलवर रुजलेली पाळेमुळे अधिक बलशाली करून जागतिक बाजारपेठेत स्वतंत्र स्थान निर्माण करता यावं, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. नवीन शैक्षणिक धोरणात असणार्या पाठ्यपुस्तकामध्ये, चित्रांचा भरपूर प्रमाणात उपयोग करणार असल्याचे ते म्हणाले.
परंपरांगत सर्व प्रकारच्या लोककला वा तत्सम कला प्रकारांमध्ये काम करणार्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ’प्रधानमंत्री विश्वकर्मा’ कार्यक्रमाची त्यांनी माहिती सांगितली. ’डिम्ड टु.बी डिनोव्होे’टचा उच्च दर्जा जोपासतानाच या संस्थेने परंपरागत कला प्रकारांचं महत्त्वही टिकवून ठेवावे, असेच त्यांना सुचवायचे असावे. जेजे एक रिसर्च विद्यापीठ बनवतानाच भारतीय ज्ञान परंपरा आणि मूळ चरित्राला बाधा येणार नाही, याची संबंधितांनी काळजी घेतली पाहिजे, असेही त्यांनी सुचविले. जेजेच्या परिसरात सर जजी उपयोजित कला महाविद्यालय येथे उपयोजित कलाकारांच्या कलाकृती प्रदर्शित आहेत, तर सर जेजे स्कूलला, पेंटिग्ज प्रदर्शित कलेले आहेत. त्यात जुन्या किंवा ओल्डमास्टर्स पेंटिग्ज पाहण्याची संधी आहे.
’मनुष्याच्या अभिव्यक्तीला आर्टिफिशयल इंटेलिजन्स कधीच पराजित करू शकत नाही’ असे ठासून सांगत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, कलाकाराच्या नैसर्गिक कल्पनाशक्तीचा गौरव केला. कुठलंही तंत्रज्ञान हे ’टूल’ असते. ‘त्या’ तंत्रज्ञान’ नामक ’घोड्यावर स्वार होऊन विकासाची गती साधायची आहे, असे मत प्रदर्शित करतानाच त्यांनी जेजेच्या समृद्ध कलापरंपरेचा वारसा, जागतिक कलाजगताला मार्गदर्शक ठरेल असाच असल्याबद्दल सांगितले. त्यांनी जेजे परिसरात प्रदर्शित केलेल्या कलाकृती पाहिल्या. ’आर्ट इज क्रिएटीव्ह मेनिफेस्टेशन ऑफ डीप इमोशन्स’ असे उत्स्फूर्त उद्गार त्यांनी काढले. ’जेजे’ला बंदिस्त न ठेवता खुल्या आकाशात भरारी घेऊ देण्याचा विचार करूनच आम्ही केंद्राकडे प्रस्ताव पाठविला.
आज म्हणूनच ’डिम्ड टुबी डिनोव्हो’ दर्जा जेजेला देऊन एक पाऊल पुढे नेले आहे. त्यामुळे अशी आशा करता येईल की जेजेचा कला विषयक दर्जा अधिक उंचावेल.” यावेळी त्यांनी कला आणि समाज यांचा संबंध किती महत्त्वाचा आहे, हेदेखील प्रकर्षाने सांगितले. कला ही भावनांची कलात्मक अभिव्यक्ती आहे. ही अभिव्यक्ती समाजात सकारात्मकता तयार करते. हा एक संस्कार आहे. मनुष्याला मनुष्यत्व या संस्कारांनी प्राप्त होते. ज्या मानवतेचा विचार आपण करतो, ती मानवता म्हणजे काय, हे कलेच्या अविष्कारातून आपणास पाहायला मिळते. सकारात्मकता ही कलेच्या आणि अविष्कारातून आपणांस पाहायला मिळते. व्यक्ती जेव्हा विकसित होतो, तेव्हा त्याच्या जाणिवा विस्तारित होतात. हे समजून घ्यायचं असेल, तर त्या त्या समाजाची कलात्मक अभिव्यक्ती अभ्यासली पाहिजे. हे काम नियोजित, ’डिनोव्हो’ दर्जा दिलेल्या ’जेजे’ने करावे,” असे प्रतिपादन फडणवीस केले.
या कार्यक्रमात विविध मान्यवर मंत्रिमहोदयांची समयोचित भाषणे आणि सर्व शाखांमधील कला प्रकारांची प्रदर्शने हे एक अनोखे समीकरण जाणवले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकातदादा पाटील यांचे समयोचित भाषण झाले. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही कला शिक्षकांच्या जागा, प्रत्येक हायस्कूलमध्ये भरण्यासाठीचे उपस्थितांना सांगितले. ’महाराष्ट्रातील शाळांमध्ये एक तरी आर्ट टीचर असावा’ यावर त्यांनी विचार सुरू असल्याचे सांगितले.
उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रस्तोगी यांनी ’डिम्ड टू. बी. डिनोव्हो’ ही प्रक्रिया २०१९ पासून कशी कशी टप्प्याटप्याने पुढे नेली, टास्क फोर्स समितीने केलेले काम, नवीन शैक्षणिक धोरणातील कलेचे स्थान याबद्दल सविस्तर माहिती दिली. ‘इंटरमिजिएट’ ग्रेड परीक्षांपासून आर्ट डिप्लोमा, ‘डिग्री बी.एफ. ए’पर्यंतच्या कोर्सेसचं महत्त्व त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी नियोजित ‘डिनोव्हो’ दर्जाच्या जेजे’त एक्स्पीरिंशीयल लर्निंग आणि फ्लेक्सिबिलीटी लर्निंग’ या विषयांवर लक्ष केंद्रित करण्याचे अभ्यासक्रम येतील, असे सांगितले.
ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षण हे अनुभवाच्या निकषांवर असावे, या धोरणातून अभ्यासक्रम निश्चित करावयास हवेत असे वाटते. तसेच ते प्राप्त परिस्थितीचा विचार करून शिक्षणात लवचिकता आणणारे विषय असतील. असा जर उद्देश असेल, तर असे अभ्यासक्रम निर्माण करण्यासाठी अनुभवी, शैक्षणिक अर्हता असणारे, हेकटपणा वा पोरकटपणा न ठेवणारे प्रगल्भ आणि लवचिकपणे मार्ग शोधून पर्याय, निश्चित करणारे व्यक्ती नियुक्त करावयास हवेत. सद्यःस्थितीत जेजेचा सदस्य, या नात्याने मला हे फार गरजेचे वाटते.
याचवेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांन ही समयोचित विचार मांडले. जेजेच्या परिसरात सध्या सर्व भिंती रंगल्या आहेत. परिसर फार स्वच्छ झाला आहे. दोन्ही कॉलेजमधील प्रदर्शने या सप्ताहात पाहता येतील, असे कार्यक्रमातच जाहीर केले गेले आहे. एकूणच महाराष्ट्राचे सर जेजे हे महाराष्ट्रातील सुप्त कलागुण असणार्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठीय व्यासपीठ व्हावे, अशा सदिच्छांसह, सरकारच्या या निर्णयाला शुभेच्छा...
प्रा. डॉ. गजानन शेपाळ
८१०८०४०२१३