नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दि. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी मणिपूर पोलिसांच्या मदतीने मोहम्मद इस्लाउद्दीन खानला अटक केली. २१ जून २०२३ रोजी मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वाक्ता भागात कार बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
खान यांच्यावर यापूर्वी मणिपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर एनआयएने तपास सुरु केला. आणि जूनमध्येच इंफाळमध्ये पुन्हा गुन्हा नोंदवला. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खानला इंफाळ येथील न्यायालयात हजर करण्यात आले. तेथून त्याला सात दिवसांच्या NIA कोठडीत पाठवण्यात आले आहे.
या कार बॉम्बस्फोट प्रकरणातील ही दुसरी अटक आहे. एनआयने या प्रकरणी दि. १६ ऑक्टोबर रोजी पहिली अटक केली होती. त्यानंतर तपास यंत्रणेने नूर हुसैन याला आसाममधील काचर जिल्ह्यातील सिलचर भागातून अटक केली.
या प्रकरणातील एनआयएच्या तपासात असे दिसून आले आहे की २१ जून रोजी मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील तिद्दिम रोडलगत फुगाकचाओ इखाई अवांग लिकाई आणि क्वाक्ता भागात पुलावर उभ्या असलेल्या आयईडीने भरलेल्या वाहनात बॉम्बचा स्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटात इस्लाउद्दीन खानचाही हात होता. या बॉम्बस्फोटामुळे तीन जण जखमी झाले असून, जवळच्या घरांसह पुलाचेही नुकसान झाले होते.