महुआ मोईत्रांच्या अडचणीत वाढ! उद्योगपती हिरानंदानी यांनी पैसे दिल्याचे आरोप स्वीकारले
20-Oct-2023
Total Views |
मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात लाच घेतल्याचा भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या आरोपाची कबुली उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांनी दिली आहे. त्यामुळे भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या आरोपामध्ये तथ्य असल्याचे आता उघड झाले आहे.
महुआ मोईत्रा यांनी अदानी ग्रुप प्रकरणात गौतम अदानी यांना टार्गेट केल्याचा दावा उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांनी केला आहे. यामागे त्यांचा उद्देश हा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा खराब करण्याचा होता, असा दावा देखील उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांनी केला आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्या हिरानंदानी ग्रुपवर टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांना अदानी ग्रुपबाबत संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप आहे. हिरानंदानी ग्रुपचे सीईओ दर्शन हिरानंदानी म्हणाले की, "मोईत्रा यांनी हे केले कारण त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा खराब करायची होती."
प्रतिज्ञापत्रात, हिरानंदानी यांनी कबूल केले की कंपनीने सरकारी मालकीच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) च्या एलएनजी टर्मिनलवर ओडिशातील धमरा एलएनजी आयात सुविधा निवडल्यानंतर अदानी यांना लक्ष्य करणारे प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी मोइत्रा यांच्या संसदीय लॉगिनमध्ये प्रवेश केला होता.
त्यांनी दावा केला की मोइत्रा "महागड्या लक्झरी वस्तू, दिल्लीतील त्याच्या बंगल्याचे नूतनीकरण, प्रवास खर्च, सुट्ट्या आणि देश आणि जगातील विविध ठिकाणी सहलीसाठी सतत पैशांची मागणी करत होत्या." हिरानंदानी म्हणाले की, २०१७ मध्ये बंगाल ग्लोबल बिझनेस समिटमध्ये महुआ मोईत्राला भेटल्यानंतर, त्या गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची मैत्री झाली होती. त्यामुळे विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये व्यवसायाची संधी मिळण्याची आशा असल्याचे हिरानंदानी यांनी सांगितले."
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी रविवारी (१५ ऑक्टोबर) ओम बिर्ला यांना पत्र लिहून महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी उद्योगपती हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतल्याचा आरोप केला होता. टीएमसी नेते महुआ यांनी हा आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.