वाघनखे भारतात आणण्याच्या कराराकरता सुधीर मुनगंटीवार ब्रिटेन दौऱ्यावर

    02-Oct-2023
Total Views |

vaghnakh 
 
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली वाघनखे लंडनच्या विक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियममध्ये असल्याचे सर्व भारतीयांना माहित आहे. ही वाघनखे करारी तत्त्वावर भारतात परत आणण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार १ ऑक्टोबरला ब्रिटेनला रवाना झाले आहेत.

वाघनखे परत आणण्याच्या करारावर सह्या करण्यासाठी लंडनच्या ऐतिहासिक दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी आमदार पराग अळवणी, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चव्हाण व इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
 
सुधीर मुनगंटीवार ३ ऑक्टोबर रोजी व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम येथे भेट देणार आहेत. यावेळी संग्रहालयचे संचालक ट्रायस्टम हंट यांच्यासोबत त्यांची बैठक होईल व वाघनखे भारतात परत आणण्याच्या करारावर स्वक्षऱ्या होतील. तरी, ब्रिटनने छत्रपती शिवरायांची वाघनखं तीन वर्षांसाठी भारताला देण्यास मान्यता दिली असून मुंबई, कोल्हापूर, सातारा, नागपूर आणि संभाजीनगर येथे वाघनखांचे दर्शन घेता येईल.