निकड अधिवास संवर्धनाची

    02-Oct-2023   
Total Views |



world habitat day


अधिवास म्हणजे नेमकं काङ्म, हे समजून घेण्यापासून तो टिकवण्यापर्यंतचा प्रवास अनेक टप्प्यांतून सुरू असतो. विविध अधिवासांबद्दल तसेच त्यांना निर्माण झालेल्या धोक्यांबद्दल विस्तृत चर्चा करणारा, हा लेख आजच्या ‘जागतिक अधिवास दिना’निमित्त...

वन्यजीवांच्या निसर्गतः वास्तव्यासाठी बनलेली ठिकाणं म्हणजे अधिवास अशी अधिवासाची साधी सोपी व्याख्या करता येईल. दरवर्षी, ऑक्टोबर महिन्याचा पहिला सोमवार ‘जागतिक अधिवास दिन’ म्हणून साजरा केला जातो. मानव, प्राणी, पक्षी अथवा वनस्पती अशा जैवविविधतेच्या स्तरांतील प्रत्येक घटकाचा आपापला असा अधिवास ठरलेला असतो. याच विविध प्रकारच्या आणि स्तरांतील अधिवासांचे संरक्षण, संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून ‘जागतिक अधिवास दिन’ साजरा केला जातो.

काय आहे जागतिक अधिवास दिनाचा इतिहास?

1985 साली संयुक्त राष्ट्रांनी जागतिक अधिवास दिन साजरा करायला सुरुवात केली. आपल्या गावांची आणि शहरांची स्थिती तसेच पुरेसा निवारा हा सर्वांचा मूलभूत अधिकार यावर विचार करण्याच्या दृष्टिकोनातून तसेच मानवी वस्तीच्या भविष्यासाठी त्याच्या सामूहिक जबाबदारीची जगाला आठवण करून देण्याच्या हेतूने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. 1986 साली पहिल्यांदा साजरा झालेल्या जागतिक अधिवास दिनाची संकल्पना (थीम) ‘निवारा माझा हक्क आहे’ अशी होती.
शास्त्रीय किंवा वैद्यानिक दृष्टिकोनातून एखाद्या प्राणी, पक्षी किंवा वनस्पतीचे निसर्गतः स्वाभाविक असणारे ठिकाण किंवा निवासस्थान म्हणजे अधिवास असं म्हंटलं जातं. वर्षावने, वाळवंटी प्रदेश, खारफुटी किंवा कांदळवने, गवताळ प्रदेश इत्यादी अनेक प्रकारच्या परिसंस्था भारतात आढळतात. या अधिवासांमध्ये नोंद असलेल्या आणि नोंद केली नसलेल्या अनेक विविध प्रजातींचा समावेश असलेला दिसतो. या प्रत्येक अधिवासामध्ये एक वेगळी परिसंस्था ही आहे.

वर्षावने किंवा एकूणच जंगल हा अधिवासाचा प्रकार अनेक झाडे, वनस्पती, फुलझाडे यांचे घर आहे. याचबरोबर या अधिवासाशी एकरुप झालेले अनेक सस्तन प्राणी आणि वन्यजीव ही इथे आढळतात. वाळवंटी प्रदेशांमध्ये असलेल्या तापमान आणि हवामानाच्या स्थिती वेगळ्या असल्यामुळे त्या भागात आढळणारी प्राणी वनस्पती संस्था ही वेगळी आहे. कांदळवने, गवताळ प्रदेश, हिमाच्छादित प्रदेश असे प्रत्येक अधिवासाच्या प्रकारात तेथील हवामान, वातावरण, तापमानाचे प्रमाण इत्यादी अनेक घटकांवरून वास्तव्यास असलेल्या प्रजाती आढळतात.

मानवासाठी वन्य अधिवास महत्त्वाचे का आहेत?

ग्रामीण भागात राहणार्‍या 75 ट्न्नङ्मांहून अधिक लोकसंख्या निसर्ग आणि त्यापासून मिळणार्‍या अनेक घटकांवर अवलंबून असते. तर्‍हे तर्‍हेचे चालणारे प्राथमिक व्यवसाय तसेच उदरनिर्वाहासाठी म्हणून ही अनेकजण वन्यजीव आणि संबंधित परिसंस्थेवर अवलंबून असतात. यामुळेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सामान्य अथवा गरीब माणूस नैसर्गिक अधिवासांवर अधिक अवलंबून असतो.


अधिवास नष्टतेचे काय परिणाम होतील?


जैवविविधतेच्या साखळीतील प्रत्येक घटक परस्परावलंबी असतो हे आपल्याला माहीत आहेच. पण विकास आणि औद्यागिकीकरणाच्या गर्तेत मानव अडकल्यामुळे अनेक परिसंस्थांचे अतोनात नुकसान होत आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे होणार्‍या जंगल अधिवासाचा र्‍हास, कांदळवन अतिक्रमणांमुळे होणारा त्या परिसंस्थेतील घटकांचा र्‍हास या आणि अशा अनेक कारणांमुळे अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर गेल्या आहेत, तर काही असुरक्षित गटामध्ये आहेत. या संदर्भातील यादी ‘आययुसीएन’च्या संकेतस्थळावर उपलब्ध असते. समुद्रातील प्रदूषण ही सातत्याने वाढत असल्यामुळे तेथील जीवांचे आयुष्य धोक्यात आले आहे. परस्परावलंबी असणार्‍या परिसंस्थेच्या साखळीतील एक जरी घटक निसटला, तरी त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात.
अधिवासाला कोणकोणते धोके निर्माण झाले आहेत?


जागतिकीकरण आणि औद्योगिकीकरण वाढत असताना प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. जल, वायू, पृथ्वी अशा सगळ्याच अधिवास ठिकाणांमध्ये अनेक जीव वास्तव्य करतात, हे आपण पाहिलेच. या सर्व स्तरांमध्ये वाढत असलेले प्रदूषणाचे गंभीर परिणाम तेथील सजीवांवर होत आहेत. शहरीकरण, पायाभूत सुविधांचा विकास, जंगलतोड, प्रदूषण आणि हवामानातील बदल यांमुळे भारतातील जैवविविधतेला असलेला सर्वात गंभीर धोका म्हणजे अधिवास नष्ट होणे आणि विखंडन होणे. अधिवास धोक्यांमध्ये काही निसर्गनिर्मित तर काही मानवनिर्मित कारणांचा समावेश आहे. निसर्गनिर्मित कारणांमध्ये पूरस्थिती, दुष्काळ परिस्थिती, वादळ आणि हवामान बदल यांमुळे परिणाम दिसून येतात, तर मानवनिर्मित कारणांमध्ये प्रदूषण व आधी नमूद केलेल्या सर्वच गोष्टींचा समावेश आहे.

 
काय आहे यंदाची थीम?


2023 या वर्षातील जागतिक अधिवास दिनाची ‘रेझिलियंट अर्बन इकोनॉमिज ः सिटीज ऍज ड्रायव्हर्स ऑफ ग्रोथ अ‍ॅण्ड रिकव्हरी’ अशी संकल्पना (थीम) आहे, तर यंदाच्या वर्षी अझरबैजानची राजधानी बाकू जागतिक अधिवास दिनाचे यजमानपद भूषवणार आहे. जगभरातील शहरे तोंड देत असलेल्या आव्हानात्मक आर्थिक परिस्थिती अधोरेखित करीत यंदा ती संकल्पना राबविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

नाही एकट्या मानवाची... ही पृथ्वी सार्‍या सजीवांची!


पृथ्वी ग्रहावर असलेल्या अनेक सजीवांमध्ये मानव ही बुद्धी असलेली प्रजात असली, तरी पृथ्वीवर केवळ मानवाचा अधिकार नाही, हे लक्षात घेणं आणि हे मूल्य रुजवणे अधिवास संवर्धनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं असलेलं पाऊल आहे. पृथ्वीवर जगत असलेल्या प्रत्येक सजीवाचा तितकाच अधिकार आहे, त्यामुळे केवळ अविचाराने विकासाच्या मागे न लागता जैवविविधतेतील इतर घटकांचा विचार करून शाश्वत जीवनशैली कशी अवलंबता येईल, याचा गांभीर्याने अभ्यास व्हायला हवा, तरच अधिवास संवर्धनाच्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता वाढेल.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.