अ‍ॅमेझॉनचे डॉल्फिनबळी...

    02-Oct-2023   
Total Views |
Death of Amazon river dolphins linked to severe drought heat

ब्राझीलच्या वायव्येस असलेल्या अ‍ॅमेझोनियन नदीत १००हून अधिक डॉल्फिन अचानक मरण पावल्याची घटना अलीकडेच समोर आली. बदलत्या हवामानाचा फटका या जीवांना बसला आहे. कारण, या भागातील प्रदीर्घ दुष्काळामुळे बहुतांश जलस्रोत कोरडेठाक पडले आहेत. याचा परिणाम मध्य अ‍ॅमेझोनास या राज्यातील टेफे सरोवरात प्रकर्षाने दिसून आला. या सरोवरातच ‘अ‍ॅमेझोनियन डॉल्फिन’ ज्यांना ‘बोटो’ म्हणूनही ओळखले जाते, त्यांचे १००हून अधिक मृतदेह आढळून आले आहेत. अ‍ॅमेझोनास राज्यातील या विदारक दृश्याचे वर्णन शब्दात मांडणे कठीणच.
 
गेल्या महिन्याभरात वायव्य ब्राझीलमधील मध्य अ‍ॅमेझोनास राज्यातील टेफे भागाला दुष्काळाचा तीव्र फटका बसला. इथे राहणार्‍या लोकांसाठी, अ‍ॅमेझोनास या गुलाबी नदीत डॉल्फिनसचे नियमित दर्शन होणे, हा तसा एक नित्याचा कार्यक्रम. अगदी किनार्‍यालगतच्या बाजारपेठेतून देखील डॉल्फिन विहार करतानाचे दृश्य अगदी सहजपणे दिसून येत असे. याउलट गेल्या काही दिवसांपासून डॉल्फिनचे फक्त मृतदेह किनार्‍यालगत दिसू लागले आहेत. एक नाही, दोन नाही, तर तब्बल १०० डॉल्फिन्सचे मृतदेह येथे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या ठिकाणी डॉल्फिन्सच्या मृतदेहांचा अशाप्रकारे खच जमा होणे, ही एक शोकांतिकाच. डॉल्फिनच्या एवढ्या मोठ्या संख्येने होणार्‍या मृत्यूंमागच्या संभाव्य कारणांचा शोध स्थानिक ‘ममिराउ इन्स्टिट्यूट’च्या भूविज्ञान संशोधकांकडून घेतला जात आहे.

तीव्र उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन नदीपात्रच कोरडे पडले. त्यामुळे डॉल्फिनच्या मृत्यूमागे तापमानवाढ आणि नदीच्या पाण्याची खोली कमी होणे, ही दोन प्रमुख कारणे असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, पाण्याचे तापमान ३९ अंश सेल्सियस इतके होते. जगाच्या इतर भागांप्रमाणेच ब्राझीलला अलीकडच्या काही महिन्यांत तीव्र हवामानाचा सामना करावा लागला आहे. याचे कारण म्हणजे मानवी हस्तक्षेपामुळे खालावलेला हवामानाचा दर्जा आणि त्यातच ‘एल निनो’चा परिणाम. तीव्र वादळांमुळे ब्राझीलच्या दक्षिणेकडील भूभागात पूरस्थिती, तर उत्तरेकडे कोरड्या हंगामामुळे दुष्काळी परिस्थिती असा हा टोकाचा विरोधाभास. गेल्या दोन आठवड्यांपासून अ‍ॅमेझॉन नदीच्या पातळीतही दैनंदिन ३० सेंमीने घट झाली आहे. अ‍ॅमेझॉन ही जगातील सर्वात मोठी नदी.

पण, गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहिली, तर लक्षात येईल की, नदीची सरासरी खोली ४.४ मीटरने कमी होते, पण यंदा ती ७.४ मीटरने कमी झाली आहे आणि याचे परिणाम दूरगामी आहेत. कारण, या भागात वापरला जाणारा जवळ-जवळ सर्व अन्न आणि इंधन पुरवठासाठा ५५० किमी (३४१ मैल) दूर असलेल्या मॅनॉस येथून सोलिमोस नदीकाठी बोटीद्वारे वाहून आणला जातो. पण, आता हा जलमार्गच धोक्यात आला आहे. याचा परिणाम म्हणजे तेलाच्या वाढत्या किमती आणि अन्नधान्याची टंचाई.

तसेच ब्राझीलमधील टेफे हे दुष्काळाने सर्वाधिक प्रभावित झालेल्या क्षेत्रांपैकी एक. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेटिओरॉलॉजी’ने म्हटले आहे की, या भागात सप्टेंबरमध्ये पाऊस सरासरीच्या केवळ एक तृतीयांश बरसला. त्यामुळे अनेक जलवाहिन्याही कोरड्या पडल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी नदीतून बोटीच्या प्रवासाला तीन तास लागायचे, पण आता मात्र पूर्ण दिवस लागतो. कारण, या बोटींना आता चिखल आणि पाण्यातून मार्गक्रमण करावे लागते. यामुळे टेफेमधील ७० हजार लोकसंख्या संकटात आहे. पाणीटंचाईमुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रात ऑक्टोबरमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढेल, असा तज्ज्ञांचा अंदाज. त्यामुळे स्थानिक अधिकार्‍यांनी मदतीसाठी ब्राझिलियाकडे धाव घेतली आहे.
 
नदीच्या चांगल्या आरोग्याचे सूचक मानले जाणारे हे अ‍ॅमेझोनियन डॉल्फिन पिरान्हा मासे खातात. हे डॉल्फिन एकतर गुलाबी किंवा राखाडी रंगाचे असतात. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर द कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ने या अ‍ॅमेझोनियन डॉल्फिनचे वर्गीकरण ‘धोकाग्रस्त’ या श्रेणीत केले आहे. जगात उरलेल्या गोड्या पाण्यातील डॉल्फिनच्या फक्त सहा प्रजातींपैकी ही एक प्रजाती. चीनमध्ये देखील यांग्त्झी नदीतील प्रदूषण, जलवाहतूक, धरणे आणि मासेमारीमुळे नदीतील डॉल्फिन नामशेष झाले आहेत. तीच परिस्थिती आता अ‍ॅमेझॉनमध्येही दिसून येते. तेव्हा, या समस्येकडे गांभीर्याने पाहणे आणि उपाययोजना करणे ही काळाची गरज म्हणावी लागेल.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.
 
जंगलात फिरून विविध जीव कॅमेरात कैद करण्याची आवड, मध्य भारतातील बहुतांश जंगलात फिरण्याचा अनुभव. रामनारायण रुईया महाविद्यालयातून 'बी. एम. एम.' पदवी प्राप्त करून पर्यटन शास्त्रात पदव्युतर शिक्षण. आणि नाविन्याचा ध्यास.