ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात मेट्रोमार्फत रस्त्यावर सुरू असलेली सर्व बांधकामे पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. वाहतुक कोंडीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रात सुरु असलेल्या मेट्रोच्या दोन मार्गिकांखालील रस्ते,दुभाजक, पदपथांच्या कामाचा आढावा आयुक्त बांगर यांनी नुकताच मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी आणि महापालिका अभियंते यांच्या उपस्थितीत घेतला. ठाणे शहरात मेट्रोच्या माध्यमातून मेट्रो सेवा पुरविण्या सोबतच संपूर्ण शहरात मेट्रो मार्गालगत सुशोभीकरण व तो मार्ग त्याचा परिसर सुंदर व नीटनेटका दिसेल अशी व्यवस्था मेट्रो प्राधिकरणाने करावी. मेट्रोच्या दोन पीलरमध्ये जे दुभाजक लावले जात आहेत. त्याची गुणवत्ता अत्युच्च दर्जाची असावी. त्यात फक्त मुरूम न टाकता काळी माती आणि शेणखत टाकून त्यावर शोभीवंत झाडे लावण्य़ात यावीत. जेणेकरून त्या परिसराच्या सौदर्यात भर पडेल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
मेट्रो मार्गाखाली असलेल्या दुभाजकांसाठी लावण्यात आलेल्या कर्ब स्टोनबद्दल असमाधान व्यक्त करीत त्यात आवश्यक त्या सुधारणा लगेच करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. मेट्रोच्या कामांसाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्सनी रस्त्याचा मोठा भाग व्यापला आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत. तसेच, गायमुख ते कापूरबावडी येथील रस्त्यावरील बॅरिकेड्स १५ फेब्रुवारीपर्यंत आणि कापूरबावडी ते माजिवडा येथील बॅरिकेड्स मे महिन्यापर्यंत हटविण्याचे नियोजन असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मेट्रो खालील रस्ते १५ दिवसात सुस्थितीत
मेट्रो कामासाठी आवश्यक तेवढे बॅरिकेड्स ठेवून इतर भाग वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच, मेट्रो खालच्या रस्त्यावर माती, डेब्रिज राहणार नाहीयाची दक्षता घेतली जावी. स्वच्छतेचे काम तसेच दुभाजकाची व्यवस्था येत्या १५ दिवसात पूर्ण करावी, अशी अपेक्षा आयुक्त बांगर यांनी व्यक्त केली.