‘हमासी’ भस्मासुराचे उलटलेले रॉकेट!

    19-Oct-2023
Total Views | 125
 Gaza Hospital blast

इस्रायलने अजून गाझा पट्टीवर जमिनीवरून हल्ला चढविलेला नाही. हा संयम ‘हमास’ने ओलिस धरलेल्या इस्रायली नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे. तो फार काळ टिकणार नाही. पण, ‘हमास’समर्थक एकाही नेत्याने किंवा देशाने या ओलिसांची सुटका करावी, असे आवाहन ‘हमास’ला केलेले नाही, यावरून ‘हमास’ आणि तिच्या समर्थकांचा कुटिल कावा लक्षात येईल. पण, आपल्याच निरपराध लोकांची हत्या करून ‘हमास’ने आपला अंत सुनिश्चित केला आहे, हे नक्की!

गाझा पट्टीतील एका रुग्णालयावर इस्रायलने रॉकेटने हल्ला करून सुमारे ५०० निरपराध लोकांचा जीव घेतल्याचा प्रचार ‘हमास’ आणि तिच्या समर्थक माध्यमांकडून केला जात असला तरी इस्रायलने, हा हल्ला केलेलाच नाही, हे मानण्यास भरपूर पुरावे उपलब्ध आहेत. इस्रायली लष्करी नेतृत्वाने हा हल्ला ‘हमास’च्याच दहशतवाद्यांनी घडवून आणल्याचा आरोप केला असून, त्याचे काही इलेक्ट्रॉनिक पुरावे दिले आहेत. अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनीही उपग्रहाच्या छायाचित्रांद्वारे आणि अन्य तांत्रिक उपकरणांद्वारे हा हल्ला पॅलेस्टिनी बाजूकडून झाल्याचे दाखवून दिले आहे. उलट ‘हमास’ आणि तिच्या समर्थकांनी इस्रायलविरोधात एकच काहूर माजविले आहे. पण, आपल्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ त्यांनी कोणताही ठोस पुरावा दिलेला नाही. इस्रायलची बदनामी करणे आणि त्याच्या बाजूने असलेली सहानुभूती कमी करणे, इतकाच या हल्ल्याचा हेतू आहे, हे दिसून येते. त्यासाठी त्यांना आपल्याच वंशाच्या निरपराध नागरिकांचा जीव घेताना जराही दु:ख झालेले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

गाझा पट्टीत लपून बसलेल्या ‘हमास’च्या एकेक दहशतवाद्याला शोधून काढून, त्याला ठार मारण्याची शपथ इस्रायलने घेतली असून, ते प्रत्यक्षात उतरवील, यात कोणालाही शंका नाही. उत्तर गाझा पट्टीतून निरपराध नागरिकांनी दक्षिणेला स्थलांतर करण्याचा आदेश इस्रायलने दिला असून, त्याचा अर्थ इस्रायली फौजा उत्तरेकडून गाझा पट्टीत शिरतील, असा होतो. पण, ही घोषणा करून चार-पाच दिवस झाले, तरी इस्रायलने हा हल्ला चढविलेला नाही, यामुळे काहीशी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. इस्रायलने हा हल्ला का चढविलेला नाही, त्याबाबत विविध तर्क लढविले जात असले तरी हल्ल्याचे नेमके स्वरूप, उद्देश आणि परिणामांची खात्री पटल्याशिवाय इस्रायल असा हल्ला करणार नाही. असा हल्ला झाल्यास जगभरात त्याचे पडसाद निश्चित उमटतील आणि आज इस्रायलच्या बाजूने असलेली सहानुभूती कदाचित काही प्रमाणात कमीही होऊ शकते, याची इस्रायलच्या नेतृत्वाला नक्कीच कल्पना आहे. पण, आपल्या प्रतिमेला तडा जाईल किंवा सहानुभूती कमी होईल, या भीतीस्तव इस्रायलने हा हल्ला रोखलेला नाही.

स्वसंरक्षणासाठी इस्रायल दुसर्‍यांच्या मेहेरबानीवर अवलंबून नाही. तसेच जागतिक लोकमताची पर्वाही त्याने कधी केलेली नाही (त्यामुळे त्याचे काहीही बिघडलेले नाही). पण, ‘हमास’ने आपले काही नागरिक ओलिस धरले असून, त्यांच्या प्राणांचे मोल इस्रायल जाणतो. शक्य तितक्या ओलिसांची जीवंतपणे सुटका करण्यासाठीच इस्रायल संयम राखून आहे. पण, हा संयम कायमचा टिकणार नाही. ‘हमास’कडून असलेला धोका नष्ट होत नाही किंवा ते ओलिसांची सुटका करणार नाहीत, ही गोष्ट स्पष्ट होईपर्यंतच इस्रायल वाट पाहील. नंतर प्रसंगी ओलिसांच्या प्राणांची किंमत देऊन आणि ‘हमास’चे समूळ उच्चाटण करून इस्रायल आपल्या शत्रूचा संहार करील.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि अन्य काही जागतिक नेत्यांनी नुकतीच इस्रायलला भेट दिली. या भेटीत बायडन यांनी इस्रायलला कदाचित सबुरीचा सल्ला दिला असावा. अमेरिका उघडपणे इस्रायलच्या बाजूने उभा आहे, हे बायडन यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. तरीही युद्धात होणार्‍या नागरी जीवितहानीमुळे नेत्यांवर टीका होतेच. काही प्रमाणात ही हानी अपरिहार्य असली तरी ती शक्यतो टाळावी, याचे उपाय अखेरपर्यंत सुरू असतात. ‘हमास’तर्फे किंवा तिच्या बाजूने काही देशांनी इस्रायली नेतृत्वाशी पडद्यामागून काही वाटाघाटी सुरू केल्या असण्याची दाट शक्यता आहे. पण, इस्रायल आपल्या ध्येयाबद्दल ठाम आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्याला सर्व ओलिसांची सुखरूप सुटका हवी आहे. ‘हमास’चे समर्थक इस्रायली अत्याचाराच्या खर्‍या-खोट्या बातम्या पसरवीत असले तरी यापैकी एकाही देशाने, नेत्याने किंवा संघटनेने आजपर्यंत या ओलिसांची मुक्तता करावी, असे आवाहन ‘हमास’ला केलेले नाही. यावरूनच ‘हमास’ समर्थकांचा कावा लक्षात येतो. किंबहुना, इस्रायलच्या बदनामीसाठी आपल्याच निरपराध शेकडो लोकांचे प्राण घेण्याइतकी ‘हमास’च्या नेतृत्वाची मती क्रूर आणि कुटिल आहे, हे लक्षात येईल.

इस्रायल गाझा पट्टीवर आज ना उद्या जमिनीवरून हल्ला चढवील, ही काळ्या दगडावरील रेघ आहे. या हल्ल्याचे पडसाद किती आणि कसे उमटतात त्याची आताच कल्पना देता येत नसली, तरी मध्य-पूर्वेत लष्करी संघर्षाची व्याप्ती वाढेल, याबद्दल कोणाचेही दुमत नाही. या युद्धात सर्वाधिक हानी अर्थातच ‘हमास’ची होईल. तेव्हाही ‘हमास’चे दहशतवादी आणि नेते हे रुग्णालय, दाट लोकवस्ती, शाळा तसेच मशिदी यांसारख्या नागरी स्थळांमध्ये आश्रय घेऊन तेथून इस्रायलवर हल्ला चढवितील. त्यांना प्रत्युत्तर देताना या स्थळांवर इस्रायलला बॉम्ब हल्ला चढवावा लागेल आणि त्यामुळे नागरी जीवितहानी कितीतरी पटीने वाढेल. मग ‘हमास’समर्थक पत्रकार, दूरदर्शन वाहिन्या आणि कथित बुद्धिजीवी इस्रायलच्या क्रौर्यावर गळे काढतील. जगभर मोर्चे-निदर्शने काढतील आणि जमेल तिथे दंगलीही घडवितील. इस्रायलवर याचा काहीही परिणाम होणार नाही. एकीकडे आपल्या १००-१५० नागरिकांना सोडविण्यासाठी शक्य तितकी कमी हिंसा करण्याचे इस्रायलचे धोरण कुठे आणि दुसरीकडे इस्रायलची बदनामी करण्यासाठी आपल्याच वंशाच्या ५०० निरपराध नागरिकांचा बळी घेण्याची क्रूर मानसिकता कोठे, याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. रुग्णालयावरील हल्ल्याने ‘हमास’रुपी भस्मासुराने आपल्याच मस्तकावर हात ठेवला आहे, हे निश्चित!




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121