आपल्या हिताचा शोध घ्यावा...

    18-Oct-2023   
Total Views |
Article on Protecting self-interest

समर्थ सांगत आहेत की, तुमच्या हितासाठी जे सत्य आहे, ते मी तुम्हाला सांगत आहे. तुमच्या हितासाठी तुम्हाला याचा शोध घ्यायचा आहे. आत्मप्रचिती घ्यायची आहे. माझे सांगणे जसेच्या तसे न स्वीकारता खरे हित शोधण्याचा तुम्हीच प्रयत्न करा. आत्मप्रचितीने खर्‍या हिताची जाणीव होते.

वादविवाद कसे निर्माण होतात, याची कारणमीमांसाकरताना मागील काही श्लोकांतून लोकांच्या तीव्र अहंकारी वृत्तीचे विवेचन करण्यात आले आहे. ही अहंकाराने पछाडलेली माणसे आपणच तेवढे हुशार, ज्ञानी आहोत आणि इतरांना काही कळत नाही, असे मानणारी असतात. या प्रकारची माणसे हेकटतर असतातच, पण आपण श्रेष्ठ आहोत असा टेंभा मिरवणारी असतात. काही लोकांना केवळ वाद करण्यात आनंद असतो. दुसर्‍यांना वादात हरवण्यात त्यांचा अहंभाव सुखावतो. मागील श्लोकाच्या विवरणात दत्तावतार नृसिंहसरस्वतींशी अध्यात्म विषयात वाद घालून, त्यांना वादात हरवून नृसिंहसरस्वतींकडून जयपत्र लिहून घ्यावे, अशा भ्रामक समजुतीने आलेल्या दोन महामूर्ख पंडितांना या गैरवर्तणुकीबद्दल १२ वर्षे ब्रह्मराक्षस होऊन राहावे लागले, ही ’गुरुचरित्रा’तील हकिगत आली आहे. प्रसिद्ध व्यक्तींना वादात हरवून त्यांच्याकडून जयपत्रे लिहून घेण्याची प्रथा समर्थकाळीही होती. स्वामींच्या चरित्रात अशा गोष्टी आढळतात. समर्थांच्या काळी सदाशिवशास्त्री येवलेकर नावाचे पंडित कुणासमोर वादात हरले नव्हते.

त्याचा गर्व झाल्याने समर्थभेटीत त्यांनी समर्थांनाचवादासाठी पाचारण केले. स्वामींनी शांतपणे, अध्यात्म हा वादाचा विषय नसून अनुभूतीचा विषय आहे, असे सांगून शास्त्रीबुवांना वादापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, याचा अर्थ समर्थ वादविवादात पडू इच्छित नाहीत, असे समजून शास्त्रीबुवांनी वादाचा आग्रह धरला ते - ऐकत नाहीत असे पाहून स्वामींनी रस्त्यावरून चाललेल्या मोळीविक्याला बोलावून घेतले. त्याच्या डोक्याला स्पर्श करून त्याला सांगितले की, या शास्त्रीबुवांशी तुला शास्त्रार्थ सांगून वाद करायचा आहे. मोळीविक्याशास्त्रीबुवांसमोर बसून धडाधड शास्त्रवचने बोलू लागला. ते पाहून सदाशिवशास्त्री घाबरले. ते समर्थांना शरण आले. त्यांनी साष्टांग नमस्कार घातला व स्वामींची क्षमायाचना केली. समर्थांनी त्यांना ‘वासुदेवशास्त्री’ संबोधन आपल्या संप्रदायात सामील करून घेतले. पुढे काही दिवसांनी त्यांची अभ्यास योग्यता पाहून शास्त्रीजींना कण्हेरी मठाचे मठपती केले. मांढरदेवीच्या डोंगराच्या पायथ्याशी हे कण्हेरी गाव आहे. समर्थ वरवर कडक शिस्तीचे असले तरी त्यांच्या अंत:करणात मायेचा पाझर होता. त्यांच्या अंगी अपूर्व संघटन कौशल्य होते. समर्थांनी नेहमी लोकांच्या हिताचा विचार केला आहे. त्यांना लोकोद्धाराची तळमळ होती- पुढील श्लोकातून, स्वामींनी हेच विचार मांडले आहेत-

हिताकारणें बोलणें सत्य आहे।
हिताकारणें सर्व शोधूनि पाहे।
हिताकारणें बंड पाषांड वारी।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥१११॥
तपाचरणातून ब्रह्मसाक्षात्कार झाल्यावर जे सत्य गवसले ते लोकांच्या हितासाठी सर्वांना सांगावे असे समर्थांना वाटते. यासाठी ते श्रोत्यांशी संवाद साधत आहेत. समर्थांना लोकसंघटनाची आवड आहे. प्रथम त्यांनी धार्मिक पातळीवर सत्वगुणी, चारित्र्यवान, सज्जन माणसे एकत्र आणायला सुरुवात केली. हीच माणसे स्वराज्याच्या तसेच समाजाच्या कुठल्याही कामासाठी उपयोगी पडतात, हे स्वामींना माहीत होते. स्वामींना वाटत होते की, यांच्याद्वारा एकंदर समाजाचे हित साधून, समाजाला रामराज्यासाठी अनुकूल करून घेता येईल. स्वामींना लोकांच्या हिताची, त्यांच्या आत्मिक उन्नतीची तळमळ होती. त्यांचा उपदेश हा लोकांच्या हितासाठी आहे. त्यात त्यांचा अथवा त्यांच्या संप्रदायाचा कुठलाही स्वार्थ नाही.

या श्लोकाच्या पहिल्या ओळीत स्वामी सांगत आहेत की, जे सत्य आहे, ते मी तुमच्या हितासाठी सांगत आहे. असे असले तरी सर्वसामान्य माणसाला आपले हित कशात आहे हे समजत नाही, त्याचा त्याने कधी विचार केलेला नसतो. आपण सर्वजण देहबुद्धीत वावरणारी माणसे असल्याने आपल्या दृष्टीने देहसुखाला महत्त्वाचे स्थान आहे. देहसुखात माझे हित आहे, हा विचार पक्का झाल्याने प्रथम आपण या देहाला सुख कसे मिळेल, याचा विचार करतो. देहहितासाठी, देहसुखासाठी आपण भौतिक सुखसोयींचा, त्या मिळवण्याचा विचार करू लागतो. भौतिक सुखसोयीत तात्पुरता का होईना, पण एक प्रकारचा आनंद उपभोगता येतो, देहाला सुख मिळते, देहाबरोबर मनही अल्पकाळ तृप्त होते, हे नाकारता येत नाही. एक साधे उदाहरण घेऊन ते सांगता येते. सध्या वातावरणात ’ऑक्टोबर उष्मा’ तीव्र असल्याने त्याचा त्रास जाणवतो. अशावेळी स्वस्थचित्त राहायचे, तर त्यासाठी पंखा, वातानुकूलित जागा यांचे साहाय्य घ्यावे लागते, त्याने वातावरणातील असह्य उष्म्यापासून बचाव झाल्याने मनाला आनंद मिळतो.

असा देहाला आनंद मिळवून देणार्‍या साधनांचा वापर करणे, यात काही चुकीचे आहे, असे आपण म्हणू शकत नाही. पण, आपण देहबुद्धीची माणसे यालाच सर्वस्व मानतो- तथापि ब्रह्मसाक्षात्कार झालेल्या संतांची देहबुद्धी नष्ट झाल्याने ते या गोष्टींना फार महत्त्व देत नाहीत. त्यांचे सुखसमाधान आत्मबुद्धीत असल्याने बाह्योपचाराला महत्त्व नसते. पण, देहबुद्धीत वावरणार्‍या आपल्यासारख्या सामान्य माणसांना ते जमत नाही. पुढे श्लोक क्र. १७० मध्ये समर्थ स्पष्ट सांगतात, ’देहबुद्धी ते ज्ञानबोधे त्यजावी।’ समर्थ सांगत आहेत की, तुमच्या हितासाठी जे सत्य आहे, ते मी तुम्हाला सांगत आहे. तुमच्या हितासाठी तुम्हाला याचा शोध घ्यायचा आहे. आत्मप्रचिती घ्यायची आहे. माझे सांगणे जसेच्या तसे न स्वीकारता खरे हित शोधण्याचा तुम्हीच प्रयत्न करा. आत्मप्रचितीने खर्‍या हिताची जाणीव होते. देहबुद्धीमुळे आपले इंद्रियसुखाशी घट्ट नाते आहे. परंतु, इंद्रियसुखाच्या पलीकडे आत्मिकसुख नावाने सुख हितकारक काहीतरी आहे, ते आपण जाणत नाही.

कारण, तो प्रांत अतीद्रिंय अनुभूतीचा असल्याने इंद्रियसुखाच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागतो. देहबुद्धी सोडून आत्मबुद्धीचा विचार करावा लागतो. स्वामी सरळ सांगतात की, ‘देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी.’ सामान्य माणसाच्या विचारप्रक्रियेत एक दोष संभवतो तो असा की, भरकटत गेल्याने सारेच थोतांड, दांभिकपणा असे वाटू लागेल. असा अश्रध्येय तर्कदुष्ट विचार प्रयत्नपूर्वक दूर सारला नाही, तर माणसाला अहंकार होऊन तो वितंडवाद घालू लागेल. तेव्हा असा वाद न करता सारासार विचाराने संवाद साधला तर तो सर्वांच्या हिताचा नाही का? माणसाने सदोष विचारांच्या आहारी न जाता सारासार विचार करून आपले हित म्हणजेच आत्मोद्धार साधून घ्यावा.

७७३८७७८३२२
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..