नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी तिसऱ्या जागतिक भारतीय सागरी परिषद २०२३ चे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मुंबईत झाले. भारतीय सागरी नील अर्थव्यवस्थेची ब्लू प्रिंट असलेल्या 'अमृत काल व्हिजन २०४७' चे अनावरणही त्यांनी केले. या भविष्यवेधी योजनेच्या अनुषंगाने, भारतीय सागरी नील अर्थव्यवस्थेसाठी 'अमृत काल व्हिजन २०४७' शी संबंधित २३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण पंतप्रधानांनी केले.
बदलत्या जागतिक व्यवस्थेत जग भारताकडे नव्या आशेने पाहत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जगात भारताची अर्थव्यवस्था सातत्याने मजबूत होत आहे आणि आता तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक होईल असे ते म्हणाले. जागतिक व्यापारात सागरी मार्गांची भूमिका अधोरेखित करताना कोरोनानंतरच्या जगात विश्वासार्ह जागतिक पुरवठा साखळीच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला.
‘समृद्धीसाठी आणि प्रगतीसाठी बंदरे’ ही सरकारची ध्येयदृष्टी जमिनीस्तरावर परिवर्तनात्मक बदल घडवून आणत आहे," असे पंतप्रधान म्हणाले. 'उत्पादकतेसाठी बंदरे' या मंत्रालाही प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. दळणवळण क्षेत्र अधिक कार्यक्षम आणि प्रभावी बनवून आर्थिक उत्पादकता वाढवण्यासाठी सरकार मोठी पावले उचलत असल्याची माहिती मोदींनी दिली. तटीय नौवहन मार्गांचेही भारतात आधुनिकीकरण केले जात आहे. गेल्या दशकात किनारपट्टीवरील मालवाहतूक दुप्पट झाली आहे. त्यामुळे लोकांसाठी एक किफायतशीर दळणवळण पर्याय उपलब्ध झाला आहे असे त्यांनी अधोरेखित केले. राष्ट्रीय जलमार्गाच्या मालवाहतुकीत चार पटीने वाढ झाली आहे. गेल्या ९ वर्षात दळणवळण कामगिरी निर्देशांकात भारताने सुधारणा नोंदवली आहे असे त्यांनी भारतातील अंतर्देशीय जलमार्गाच्या विकासाबाबत बोलताना सांगितले.
भारत जागतिक क्रूझ केंद्र बनणार
भारतात सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या नदीवरील क्रूझ सेवेविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की मुंबईत हे उदयोन्मुख क्रूझ केंद्र विकसित केले जात असून याशिवाय विशाखापट्टणम आणि चेन्नई येथे देखील आधुनिक क्रूझ टर्मिनल उभारले जाणार आहे. भारत आपल्या स्वदेशी पायाभूत सेवा सुविधांच्या जोरावर जागतिक क्रूझ केंद्र बनण्याच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करत आहे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.