मुंबईतील रस्त्यांचे रखडलेले काँक्रिटीकरण आणि सद्यस्थिती

    17-Oct-2023   
Total Views |
Mumbai City Road concretization and current status

पावसाळा संपल्यानंतर मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम महानगरपालिकेने कंत्राटदारांच्या मार्फत हाती घेणे अपेक्षित होते. परंतु, अद्याप या कामांना गतिमानता प्राप्त झालेली नाही. त्यानिमित्ताने मुंबईतील रस्त्यांची सद्यस्थिती, काँक्रिटीकरणाच्या प्रतीक्षेत असलेले रस्तेमार्ग यांचा आढावा घेणारा हा लेख...

मुंबईत महानगरपालिकेने पुन्हा पुढील पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामे सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. शहरातील रस्ते दुरूस्तीची प्रस्तावित कामे तब्बल ४०० कोटी रुपयांची असून ती अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यामुळे महानगरपालिकेच्या कारभारावर टीका होऊ लागली आहे. परिणामी, महानगरपालिकेने रस्त्यांची उर्वरित कामे लवकरात लवकर हातात घेण्याचे ठरविले आहे. यासाठी महानगरपालिकेने वाहतूक पोलिसांना परवानगीसाठी पत्रही पाठविले आहे. परंतु, नेहमीप्रमाणे मुंबईच्या रस्त्यांवर अनेक खड्डे पडलेले आहेत. मुंबई महानगरपालिकेला काही दिवसांपूर्वी सर्व रस्ते येत्या दोन वर्षांत काँक्रिटचे करण्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले होते. कारण, मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचा संकल्प सोडला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला उर्वरित सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी तब्बल ६ हजार, ७८ कोटींच्या निविदा मागविण्यात याव्यात, असे निर्देश दिले होते. या कामासाठी पाच कंत्राटदारंची निवडदेखील करण्यात आली होती. या कंत्राटदारांना जानेवारी महिन्यात कार्यादेश देण्यात आले होते. त्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. फेब्रुवारीच्या अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १११ रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कामे सुरू होऊ शकली नाहीत. काही रस्त्यांची कामे तातडीने सुरू करण्याची आवश्यकता होती. ती कामे सुरू न झाल्यामुळे त्या रस्त्यांची पावसाळ्यात अक्षरश: अगदी चाळण झाली होती. कामे सुरू करण्याचे आदेश देऊनही कामे सुरू न केल्याने पाचपैकी तीन कंत्राटदारांना एप्रिल महिन्यात १६ कोटी रुपये दंड पालिकेमार्फत ठोठावण्यात आला होता.

नंतरच्या काळात पावसाळा सुरू होणार म्हणून त्यांची पुढील कामे बंद करण्यात आली होती. साधारणपणे ही कामे ऑक्टोबर महिन्यात सुरू करण्याची अपेक्षा होती. सप्टेंबरमध्ये पाऊस ओसरल्यामुळे ही कामे सप्टेंबरमध्ये सुरू करावीत, अशी इच्छादेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाने परिपत्रकदेखील काढलेे. ज्या रस्त्यांची कामे वाहतूक सुरु असताना करावयाची आहेत, त्यासंबंधी परवानगी मिळण्यासाठी पोलीस विभागाकडे पालिकेकडून पत्र पाठविण्यात आले. त्याचा पाठपुरावा कंत्राटदारांनी करावा व टप्पाटप्प्याने कामे लवकरात लवकर सुरू करावीत, असे निर्देशपालिकेतर्फे देण्यात आले आहेत. जे कंत्राटदार कामे सुरू करणार नाहीत, त्यांच्यावर निविदांच्या अटी-शर्तीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकार्‍यांनी दिली.

रस्त्यांची कामे रखडलेलीच!

येत्या दोन वर्षांत मुंबईतील सर्व रस्ते काँक्रिटचे होणार आहेत, असा पालिका प्रशासनाने संकल्प सोडला असला तरी अद्याप कार्यादेश मिळूनही कंत्राटदारांनी कामे सुरू केली नाहीत. विद्याविहार- घाटकोपरचा भाग असलेल्या ‘एन’ विभागातील ४६ रस्त्यांची कामे अद्याप सुरू झाली नाहीत. इतकेच काय डिसेंबर २०२१ मध्ये हाती घेतलेली कामेही सुरू केलेली नाहीत. पावसाळ्यामध्ये ही कामे सुरू करता येत नाहीत पण ऑक्टोबरमध्ये तरी ही कामे हाती घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मुंबईत एकूण २,०५० किमी लांबीचे रस्ते असून त्यापैकी सुमारे एक हजार किमी लांबीचे रस्ते काँक्रिटचे आहेत. म्हणजेच फक्त ५० टक्के रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे. यावर्षी सहा हजार कोटींची कामे मंजूर केली होती. त्यापैकी ३९७ किमीच्या रस्त्यांचे काम तीन वर्षांत पूर्ण करावयाचे आहे. या सहा हजार कोटींपैकी १,१९८ कोटींची २४८ किमीची रस्त्यांची कामे पूर्व उपनगरातील आहेत.

खाली दिलेल्या अनेक रस्त्यांची कामे हातात घेणे गरजेचे असले तरी ती कामे हातात घेतली गेली नाहीत, असे दिसते. शिवडीतील तीन किमी रस्त्यासाठी कंत्राटदाराचा तीन महिने विलंब झाला आहे. शिवडीमधील ठोकरजी जिवराज रोड हा मोठ्या रहदारीचा रस्ता. दरवर्षी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. या तीन किमी रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे, असे पालिकेने ठरवले होते. कंत्राटदाराने हे काम सुरू केले नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे ठरत आहे.

वांद्रे रोड काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू झाले नाही. मोती महाल जंक्शन, गुरूनानक रोड, आर.आर. पाटकर मार्ग, पेरी रोड जंक्शन, सेंट अ‍ॅन्थनी रोड, नॅशनल लायब्ररी रोड, एक्स कार्पोरेटर झकेरीया म्हणतात हे रस्ते फार वाईट अवस्थेत आहेत. अरुंद रस्ते, गल्ल्या, सायनमधील रहिवाशांनी या छोट्या रस्त्यांवर काँक्रिटीकरण करण्याला विरोध दर्शविला आहे. सहा महिन्यांत फक्त ३८ काँक्रिटचे रस्ते पूर्ण झाले आहेत.

मुंबई महापालिकेने २०१७ मध्ये ठरविले की, सर्व रस्ते काँक्रिटचे करावे. गेल्या १८ महिन्यांमध्ये २६५ किमीचे काम सुरू आहे व १५८ किमी लांबीचे रस्ते काँक्रिटचे करण्यात आले आहेत. त्यापैकी ५९ किमी शहरांचे आहेत, ६४ किमी पश्चिम उपनगरातील आहेत व ३५ किमी पूर्व उपनगरातील आहेत. बांधकामाच्या ठिकाणांवरती ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावले आहेत, त्यातून कामाची गुणवत्ता अधिकार्‍यांना समजते. प्रयोगशाळेमध्ये काँक्रिटची गुणवत्ता अनेक वेळेला तपासून घेण्यात येते.

आतापर्यंत ११४० किमी काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. ९९० किमी काँक्रिटीकरण हे २०२२ सालापूर्वी पूर्ण झाले आहे. १५८ किमी हे गेल्या १८ महिन्यांत झाले.

मुंबईतील रस्त्यावर १४ हजार खड्डे!

महापालिकेने रस्ते बांधणीसाठी कोट्यवधी खर्चूनही रस्त्यावरील खड्डे कायम राहत आहेत. महापालिकेने दिलेल्या माहितीवरून दि. १ एप्रिल, २०२२ ते ३१ मार्च या वर्षभरात मुंबईत ४८,६०८ खड्डे पडले. त्यापैकी मार्चपर्यंत ३३,७९१ खड्डे कोल्ड मिक्स व नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बुजविले गेले. १४,८१७ खड्डे शिल्लक आहेत.

रस्त्यांचे काँक्रिटीकरण होत आहे तरीही महापालिकेनी खालीलप्रमाणे खड्डे बुजविले.
खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेची धडपड व विशेष पथके नेमली गेली आहेत.

गेले काही दिवस पावसाने न येण्याची कृपा केली आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग आला आहे. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी संबंधित अधिकार्‍यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी खड्डे बुजविण्यासाथी पथक तयार करण्याचे व दिवसा खड्ड्यांची पाहणी करून रात्री खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश अधिकार्‍यांना दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरातील रस्त्यांवर पावसामुळे तयार झालेले खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घ्यावे, असे आदेश पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना दिले आहेत.

खड्डे बुजविण्यासाठी त्रिसूत्री...

रस्त्यावर खड्डे पडू नयेत, म्हणून सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. सर्व रस्त्यांवर स्वत:हून नियोजन करून, पाहणी व सर्वेक्षण करून खड्डे बुजविले जात आहेत. खड्डे बुजविण्यासाठी मनुष्यबळाच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. पूर्वी नेमलेल्या ७५ रस्ते अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक विभागात एक असे २२७ दुय्यम अभियंत्यांचीसुद्धा नेमणूक केली आहे.

यंदा पावसाळ्यापूर्वी रस्तेदुरूस्ती, पुनर्पृष्ठीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. विविध यंत्रणासोबत समन्वय साधून खड्डे बुजविले जात आहेत. इतर नियोजन प्राधिकरणांच्या रस्त्यातील खड्डे त्यांनी न बुजविल्यास पालिका ते खड्डे स्वत: बुजवित आहे. जलद प्रतिसादासह रस्तेदुरूस्ती करता यावी, यासाठी मास्टिक तंत्रज्ञानाने खड्डे बुजविण्यासाठी अतिरिक्त निविदा मागवून पाच परिमंडळामध्ये कार्यादेश दिले गेले आहेत. अन्य एका परिमंडळाचीही कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. रॅपिड हार्डनिंग काँक्रिट, मास्टिक अस्फाल्ट, रिअ‍ॅक्टिव्ह अस्फाल्ट व कोल्ड मिक्स यांसारख्या विविध अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून तत्परतेने खड्डे बुजविले जात आहेत.

वरती माहिती दिल्याप्रमाणे रस्त्याची कामे दरवर्षी होणर असतील, तर महापालिकेच्या रस्त्याच्या कामात उत्तम प्रगती होऊ शकेल आणि मुंबईकरांना दिलासा मिळेल!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.