मुंबई : गणेशोत्सव आणि दहीहंडी पाठोपाठ मुंबईत नवरात्रोत्सवही दणक्यात साजरा करण्यासाठी भाजपने जय्यत तयारी सुरू केली आहे. गतवर्षीच्या प्रमाणे यंदाही काळाचौकीच्या शहिद भगतसिंग मैदानावर मराठी दांडियाचे आयोजन करण्यात आले असून भव्यदिव्य आयोजनाची पुनरावृत्ती भाजपकडून करण्यात आली आहे. यासह भाजपकडून एकूण तीनशे ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्रिशतकीय दांडिया महोत्सवातून गुजरातीसह मराठी मतांना खेचण्याची रणनिती आखण्यात आली आहे.
मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. दादर येथील वसंतस्मृती या भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, आमदार मिहीर कोटेचा, माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, माध्यम सहप्रमुख ओमप्रकाश चव्हाण उपस्थित होते.संपूर्ण मुंबई शहरात भाजपतर्फे एकूण 300 ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यापैकी 200 ठिकाणचे कार्यक्रम थेट भाजपने तर उर्वरित 100 कार्यक्रम भाजप पुरस्कृत आयोजित करण्यात आले आहेत.
मराठी मतांना खेचण्याची भाजपची रणनिती
दरम्यान, भाजपने सलग दुसऱ्या वर्षी जंगी दांडिया उत्सवाचे आयोजन केल्याचे राजकीय परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. उबाठा गटाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वरळी - शिवडी - लालबाग व लगतच्या भागात भाजपने मुसंडी मारली असून या भागातील निर्णायक मराठी मतांचा टक्का आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपने रणनिती आखली आहे.
१८ ठिकाणी भव्य गरबा दांडिया महोत्सव
(भाजप नेते आणि आयोजित कार्यक्रमाची काही ठिकाणे)
\
मुलुंड येथे खा. मनोज कोटक - प्रेरणा रास दांडिया
आ. सुनील राणे - बोरीवली - रंगरात्री दांडिया
आ. प्रवीण दरेकर - बोरिवली - रंगरास नवरात्री २०२३
खा. गोपाळ शेट्टी आणि संतोष सिंग यांच्या माध्यमातून बोरिवलीत दांडिया होतो आहे.
भाजप नेते सुधिर शिंदे - लोखंडवाला
माजी नगरसेवक विनोद शेलार - मालाड
आ. अमित साटम - जेव्हीपीडी मैदान जुहू
माजी नगरसेवक मुरजी पटेल - अंधेरी
वांद्रे पश्चिम - आमदार आशिष शेलार