मुंबई : ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. चित्रपटाच्या पहिल्या भागाने अर्थात ‘गदर- एक प्रेमकथा’ या चित्रपटाने देखील २२ वर्षांपुर्वी इतिहास रचला होता. अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरघोस प्रेम केले. दरम्यान, सनी देओलची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘बॉर्डर’ या चित्रपटाचा देखील दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले जात आहे.
‘बॉर्डर २’ चित्रपटाचे चित्रिकरण २०२४ मध्ये सुरु केले जाणार आहे. या चित्रपटात कोणते कलाकार असणार किंवा चित्रपटाचे कथानक काय असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, पुन्हा कोणत्या ना कोणत्या युद्धावर आधारित असणार हे मात्र नावावरुनच स्पष्ट होत आहे. बॉर्डर हा चित्रपट १९९७ साली प्रदर्शित झाला होता.