केरळमध्ये ‘हमास’ समर्थकांना राष्ट्रवाद्यांचे प्रत्युत्तर!

    16-Oct-2023   
Total Views |
M. Gopal

‘हमास’चे समर्थन होत असल्याच्या त्या वातावरणात इस्रायलला पाठिंबा दर्शविण्यासाठी राजधानी तिरुवनंतपुरममध्ये दि. १४ ऑक्टोबर रोजी कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. सचिवालयासमोर ही निदर्शने झाली. या निदर्शनांचे नेतृत्व हिंदू धर्म परिषद, तिरूवनंतपुरमचे अध्यक्ष एम. गोपाल आणि भाजप प्रवक्ते संदीप वाचस्पती यांनी केले.

केरळमध्ये राष्ट्रविरोधी शक्ती आपले डोके वर काढण्याचा प्रयत्न करीत असल्या तरी अशा शक्तींना आव्हान देणार्‍या राष्ट्रवादी शक्तीही त्यांच्या विरोधात उभ्या राहत असल्याचे दिसून येत आहे. इस्रायलवर ‘हमास’ने केलेल्या भयानक हल्ल्यानंतर भारत सरकारने इस्रायलला पाठिंबा घोषित केला. पण, आपल्या देशातील काहींना ‘हमास’चा पुळका आल्याचे दिसून येत आहे. इस्रायलचा निषेध करणारे मोर्चे त्यांच्याकडून काढले जात आहेत. सभांचे आयोजन केले जात आहे. दि. १३ ऑक्टोबर रोजी मलबार क्षेत्रातील मल्लपुरम जिल्ह्यात इस्रायलचा निषेध करणार्‍या आणि पॅलेस्टाईनचे समर्थन करणार्‍या सभा, निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. ‘जमात-ए-इस्लामी हिंद’ने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या निमित्ताने जी सभा योजण्यात आली होती, त्या सभेत भारतातील पॅलेस्टिनी राजदूत अदनान अबू अलहैजा आणि गाझामधील इस्लामिक युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. कम्लैनशाथ यांची आभासी पद्धतीने भाषणे झाल्याचे वृत्त आहे.

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर सरकारने बंदी घातली असली तरी फुटीरतावादी मुस्लिमांच्या कारवाया, त्या राज्यात सुरूच आहेत. सभेच्या स्थानी जे पोस्टर लावण्यात आले होते, त्यामध्ये इस्रायलने केलेल्या आक्रमणाचा निषेध करणारी वाक्ये मल्याळम् भाषेत लिहिली होती. ‘हमास’ने इस्रायलवर हजारो अग्निबाणांचा मारा करून कुरापत काढली होती. तसेच इस्रायलच्या प्रदेशात घुसखोरी करून काही इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले. प्रथम हल्ला केला ‘हमास’ने आणि इस्रायलने गाझावर आक्रमण केल्याचा आरोप करून भारतातील ‘हमास’प्रेमी गळे काढताहेत, याला काय म्हणावे!इस्रायलने ‘हमास’ला जबरदस्त उत्तर दिले आहे. ‘सुरुवात तुम्ही केली, आता शेवट करायचे, आमच्या हाती आहे,’ असा इशारा देऊन ‘हमास’चा नायनाट होईपर्यंत गप्प न बसण्याचा निर्धार इस्रायलने केला आहे. इराणसारखे मुस्लीम राष्ट्र ‘हमास’च्या पाठीशी आहे. अन्य मुस्लीम देशांचाही पॅलेस्टाईनला पाठिंबा आहे. रशिया, चीन हे देशही इस्रायलच्या विरुद्ध झुकल्याचे दिसून येते. जागतिक पटलावर असे चित्र दिसत असतानाच आपल्या देशातील काही मुस्लीम संघटना उघडपणे इस्रायलविरोधी भूमिका घेत आहेत. ‘पीएफआय’ या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेची राजकीय शाखा असलेल्या ‘एसडीपीआय’नेही अशा सभांचे आयोजन केले होते.

केरळमधील मुस्लीम संघटना इस्रायलविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना इस्रायलच्या समर्थनार्थ केरळमध्ये राष्ट्रवादी शक्ती उतरल्याचे दिसून येत आहे.‘हमास’चे समर्थन होत असल्याच्या त्या वातावरणात इस्रायलला पाठिंबा दर्शविण्यासाठी राजधानी तिरुवनंतपुरममध्ये दि. १४ ऑक्टोबर रोजी कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. सचिवालयासमोर ही निदर्शने झाली. या निदर्शनांचे नेतृत्व हिंदू धर्म परिषद, तिरूवनंतपुरमचे अध्यक्ष एम. गोपाल आणि भाजप प्रवक्ते संदीप वाचस्पती यांनी केले.असाच एक कार्यक्रम दि. १५ ऑक्टोबर रोजी तिरूवनंतपुरम शहरातील ख्रिस्ती समुदायाने आयोजित केला होता. इस्रायलच्या समर्थनार्थ योजण्यात आलेल्या, या शांती मार्चचा आरंभ भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि अभिनेते कृष्णकुमार यांच्या उपस्थितीत झाला. विविध ख्रिस्ती संघटनांचे प्रमुख, या शांती मार्चमध्ये सहभागी झाले होते.‘हमास‘-इस्रायल संघर्षामुळे राज्यात काही अनुचित घटना घडू शकतात, अशी भीती शांतताप्रेमी नागरिकांना वाटत आहे. पश्चिम कोचीमधील एका सिनेगॉगला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्या भागातील व्यापार्‍यांनी केली आहे. कोचीमधील या सिनेगॉगची स्थापना १५६७ मध्ये झाली होती.

आता ‘जय श्रीराम’घोषणेला उदयनिधी स्टॅलिन यांचा आक्षेप!

तामिळनाडूचे युवक कल्याणमंत्री उदयनिधी स्टॅलिन हे सनातन धर्माबद्दल त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जबरदस्त टीकेचे धनी झाले होते. एवढी टीका होऊनही आपण चुकीचे काही बोललो नाही, असे म्हणून त्यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थ केले होते. त्या टीकेचा धुरळा अजून खाली बसला नाही, तोच उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘जय श्रीराम’ घोषणा दिल्याबद्दल आक्षेप घेतला आहे.
या घटनेची पार्श्वभूमी अशी चेन्नई येथे अलीकडेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना झाला. त्या सामन्याच्या वेळी पाकिस्तानचा क्रिकेटपटू मुहम्मद रिझवान याने मैदानाच्या मध्यभागी नमाज पडला होता. खरे म्हणजे सामन्याच्यावेळी अशाप्रकारची धार्मिक किंवा राजकीय कृती कोणी खेळाडूने करणे अपेक्षित नाही. ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटने’च्या आचारसंहितेला ते धरून नाही, असे काहींचे म्हणणे. या प्रकारानंतर भारताने सामना जिंकल्यानंतर मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी ‘जय श्रीराम’,‘वंदे मातरम्’ अशा घोषणा दिल्या. या घोषणा कानावर पडल्याने उदयनिधी स्टॅलिन यांचा पापड मोडला. समाजमाध्यमांचा आधार घेऊन अशा घोषणा दिल्याबद्दल स्टॅलिन यांनी नाराजी व्यक्त केली, अशा कृतींमुळे समाजात द्वेष पसरविला जातो, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

क्रीडा सामन्यामुळे ऐक्य आणि शेजारी देशांसमवेत बंधुभाव वाढण्यास मदत होते, असेही त्यांनी म्हटले. ‘जय श्रीराम’ घोषणा स्टॅलिन यांना एवढी खटकली असेल, तर रिझवानने भर मैदानात पढलेला नमाजही, या मंत्र्याला खटकायला हवा. पण, सनातन धर्माबद्दल वाट्टेल तशी वक्तव्ये करणार्‍या, या मंत्र्याकडे तेवढी बुद्धी कशी असणार?दि. १० ऑक्टोबर रोजी पाकिस्तानने श्रीलंकेवर विजय मिळविल्यानंतर, आपला विजय गाझा पट्टीतील लोकांना अर्पण करीत आहे, असे कप्तान रिझवानने म्हटले होते. या अशा वक्तव्यावरून पाकिस्तानी क्रिकेट संघातील खेळाडूंची मानसिकता दिसून आली आहे. उदायनिधी स्टॅलिन यांनी पाकिस्तानला चार खडे बोल सुनवायला हवे होते. पण, तशी अपेक्षा त्यांच्याकडून नाही. ‘जय श्रीराम’ला विरोध दर्शवून हिंदू धर्मास असलेला आपला विरोध उदयनिधी स्टॅलिन यांनी पुन्हा उघड केला आहे!

सनातन धर्माचे अस्तित्व आहे, तोपर्यंत जागतिक शांतता : विहिंप नेते सुरेंद्र जैन


“जोपर्यंत सनातन धर्माचे अस्तित्व आहे, तोपर्यंत जगात शांतता राहील,” असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी म्हटले आहे. ‘शौर्य जागरण यात्रे’च्या समारोपप्रसंगी आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. राम जन्मभूमी आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्यांचे स्मरण करण्यासाठी, या यात्रेचे आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या सभेत हिंदू समाजाबद्दलच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. हिंदू समाजाने आपले शौर्य यापूर्वी अनेकदा दाखविले आहे. अयोध्येमध्ये उभे राहत असलेले राम मंदिर हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे, डॉ. जैन यांनी सांगितले. आज हिंदू समाजास ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ अशा अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. हे सर्व लक्षात घेऊन हिंदू समाजाने जागृत असले पाहिजे, याकडे डॉ. जैन यांनी लक्ष वेधले

सनातन धर्माबद्दल बोलताना डॉ. जैन म्हणाले की, “सनातन धर्म हा अविनाशी आहे. जगभरातील मानवतेच्या विकासासाठी सनातन धर्माचे तत्त्वज्ञान आणि जीवनमूल्ये आवश्यक आहेत. कोरोना महामारीच्या काळात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आपला जीव धोक्यात घालून समाजसेवा केली, हे त्यांच्या सनातन असल्याचे मूलभूत द्योतक होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपल्या धर्माच्या रक्षणासाठी शीख गुरुंनी जे बलिदान दिले, ते विसरता कामा नये. दिल्लीतील गुरुद्वारारकबगंज आणि शीशगंज या दोन्ही गुरुद्वारांचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करावे, अशी विनंती त्यांनी केंद्र सरकारला केली. मुलांना जो चुकीचा इतिहास शिकविला जातो,” तो दुरुस्त करण्याची गरज असल्याचे डॉ. जैन म्हणाले. ‘हमास’सारख्या दहशतवादी संघटना आपल्या देशामध्येही कार्यरत आहेत. त्यांना देशातील शांतता आणि स्थैर्य यास धक्का पोहोचवायचा आहे. मेवातच्या नूह भागामध्ये आपण त्याचे उदाहरण पाहिले, याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी देशभरात ३५५ शौर्य जागरण यात्रा काढल्या होत्या आणि या यात्रांच्या निमित्ताने ९० हजार गावांशी संपर्क साधण्यात आला. या काळात २ हजार, ५००हून अधिक सभांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.