कचर्‍यालाही ‘अर्थ’ येण्यासाठी!

    16-Oct-2023   
Total Views |
Baby Kamble

कचर्‍यातून निर्माण होणारी अर्थव्यवस्था, यावर बेबी कांबळे यांचा विशेष अभ्यास. तसेच कचरावेचक समाजासाठी, त्या उल्लेखनीय कार्य करत आहेत. बेबी कांबळे यांच्या कार्यविचारांचा घेतलेला हा मागोवा...

कचरावेचक समाजगटाला माणसासारखे आयुष्य जगायला मिळावे, त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळावी, त्यांच्या श्रमाचे योग्य मोल व्हावे, त्यासाठी आयुष्यभर जागृती आणि प्रत्यक्ष कार्य करण्याचा संकल्प अहमदनगरच्या बेबी कांबळे या तरुणीने केला. एमकॉमपर्यंत शिक्षण घेतलेल्या बेबी यांनी ‘डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ’चे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी ‘घनकचर्‍याचे संकलन आणि विघटन’ या विषयावर एम.फिल केले आणि सध्या त्या ‘कचरा पुनर्प्रक्रिया उद्योगांचा अभ्यास’ या विषयावर पीएचडी करत आहेत. उच्चविद्याविभूषित बेबी दिगंबर कांबळे तळागाळातील समाजघटकांसाठी गेले अनेक वर्षे निःस्वार्थी कार्य करत आहेत. उच्चशिक्षण घेऊन चांगली नोकरी किंवा समाजात मानाचे लाभाचे पद भूषवायचे, सर्वसाधारण समाजात असाच मानस दिसतो. मात्र, या पार्श्वभूमीवर बेबी कांबळे यांचे ध्येय काय आहे, तर खर्‍या अर्थाने वंचित समाजघटकांच्या उत्थानासाठी कार्य करायचे.

समर्थ रामदास स्वामी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगे महाराज यांच्या कार्यविचारांनी प्रेरित झालेल्या बेबींनी लहानपणापासूनच सामाजिक बांधिलकी जपली. आपण जन्मतो का? तर केवळ हौसमौज करत मरेपर्यंत जगण्यासाठी का? तर नाही, ज्या समाजामध्ये आपण राहतो, त्या समाजाचे, त्या देशाचे आपण ऋणी आहेात. तो समाज आपला आहे. त्याच्या प्रगतीसाठी चांगल्यासाठी जगणे, हे आयुष्याचे ध्येय हवे, या विचारांचा ठसा बेबी यांच्या जीवनावर उमटला.अहमदनगरहून पुण्याला येत उच्चशिक्षण आणि त्यानंतर नोकरी करताना त्यांचा परिचय सफाई कामगारांसाठी काम करणार्‍या‘स्वच्छ’ या संस्थेशी झाला. संस्थेमध्ये काम करताना त्यांना समाजबांधवांचे प्रश्न, दुःख अनुभवायला मिळाले. त्या अनुभवांनी त्यांचे अवघे भावविश्व ढवळून निघाले. कामानिमित्त त्यांचा पुण्यातील सफाई कामगार महिलांशी संपर्क येऊ लागला.

 एकदा एक हसमुख चेहर्‍याची सफाई काम करणारी महिला भेटली. तिला एक हात नव्हता. अपघाताच्या खुणा उरलेल्या हातावर होत्या, तरीही ती एका हाताने कचरा वेचायचे काम करायची. कारण, घर तिच्यावरच अवलंबून होते. त्या महिलचे जीवन शब्दातीत कष्टमय होते. ती बेबी यांना म्हणाली की,”कचरा येचायला गेले. हातात बॉटल आली. मोठमोठाले लोक अंगाचा चांगला सुगंध यावा, म्हणून त्या बाटलीतला स्प्रे अंगावर मारतात. बाटलीची किंमत येईल, असं वाटून अगदी खुशीत बाटली उचलली. ती हलली आणि तिचा स्फोट झाला. त्या बाटलीत गॅस जमून राहिला होता. हे पाय माझा हात खराब झाला.” कोपरापासून हात नसलेली ती महिला डोळ्यात अश्रू आणून मात्र चेहर्‍यावर जराही कटूता न आणता बेबी कांबळे यांना सांगत होती. शिक्षण नाही, रोजगाराचे दुसरे साधन उपलब्ध नाही, अशा परिस्थितीमध्ये अत्यंत असुरक्षित वातावरणात कचरा वेचणार्‍या या भगिनी. त्यांचे प्रश्न, दुःख आणि समाजाची त्यांच्याविषयीची अनास्था पाहून, अनुभवून बेबी यांनी संपूर्ण जीवन कचरावेचकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन यावे, यासाठी व्यतित करण्याचा निर्धार केला.

इतर संधी असूनही त्यांनी घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात काम करण्याचा निश्चय केला. त्यासाठी सर्वप्रथम त्यांनी जगभरातल्या कचरावेचक गटांचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्यांचे जगणे, त्यातील आव्हाने आणि आधुनिक जीवनशैलीत त्यातील बदल, कचरा आणि आर्थिकतेचा संबध कसा जोडता येईल, यासाठी त्या विचार करू लागल्या. यावर काम करणार्‍या व्यक्ती आणि संस्थांना भेटून त्यांची कार्यपद्धती पाहिली. या कार्यपद्धती कचरावेचक समाजघटकांना वास्तविक स्वरुपात कशा कार्यान्वित करता येतील, याचे प्रत्यक्ष प्रयोगही केले. समाजात कचरावेचक बांधवांच्या श्रममूल्यतेला आणि कचर्‍यातून निर्माण होणार्‍या अर्थव्यवस्थेची जागृती व्हावी, यासाठी बेबी यांनी ‘वेस्ट रिव्हॅल्युएशन इंटरप्रायझेस’ची स्थापना केली. या संस्थेद्वारे त्या महाराष्ट्रभर यासंदर्भात जनजागृती करतात.

तसेच त्या ‘इकोनॉमिक अ‍ॅण्ड सोशल वेलफेअर फाऊंडेशन’च्या त्या सचिवपदी आहेत. या संस्थेमार्फतही त्या कार्य करत आहेत.अशा या समाजशील तरुणीच्या आयुष्याचा मागोवा घेतला, तर जाणवते की कांबळे कुटुंब मूळचे अहमदनगरचेच. दिगंबर आणि कुसूम कांबळे यांची सुकन्या बेबी. दिगंबर यांचे छोटेसे दुकान होते, ते वारकरी असून, भगवद्गीतेचे निरूपण अगदी तर्कशुद्ध पद्धतीने आणि रसाळतेने करीत. छोट्या बेबीलाही ते महाभारत, भगवद्गीतेचे श्लोक आणि अर्थ सांगत. भगवद्गीतेतल्या कर्मसिद्धांताने बेबी यांना प्रेरणा दिली. भगवद्गीतेतला कर्मावर आधारित वर्ण यावर अनेकदा बेबी यांनी त्यांच्या वडिलांकडून ऐकले होते.

पुढे बेबी शिक्षणासाठी पुण्यात आल्या. इथे काही लोक त्यांच्या संपर्कात आले. हे लोक धर्मसंस्कृती आणि कुटुंब पद्धतीही मानत नव्हते. देवाला सातत्याने नावे ठेवून ‘मनू’ वगैरे म्हणत, जातीपातीच्या उखाळ्या काढणारे होते. बेबी यांना हे अजिबात पटले नाही. कारण, त्यांच्या पित्याने त्यांना धर्मसंस्कार समजावून सांगितले होते. आजपर्यंत मनू वगैरेचे नावही त्यांनी घेतले नव्हते. मग हे लोक कोणत्या मनूबद्दल आणि जातीविषाबद्दल बोलतात, असे बेबी यांना वाटले. सगळ्या पुण्यात असेच लोक असतील का? याचा धांडोळा घेतानाच, त्यांच्या परिचयात ‘समरसता मंच’ आणि ‘विवेक विचार मंचा’चे कार्यकर्ते आले. त्यांचे विचार ऐकताना बेबी यांना वाटले की, अरे हे तर आपलेच मनोदय मांडत आहेत. तेथूनच बेबी यांचा शोषित, वंचित समाजासाठीच्या कार्याचा समरस प्रवास सुरू झाला. तरूण, तडफदार, समाजशील बेबी कांबळे यांच्या कार्याला खूप सार्‍या शुभेच्छा!



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.