रसिका शिंदे-पॉल
मुंबई : दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या 'दृश्यम' या चित्रपटाने प्रेक्षकांना भंडावून सोडले होते. यातील प्रत्येक कलाकाराचा अभिनय हा वाखाण्याजोगा होता. यात अजय देवगण, तब्बू यांच्यासोबत एक मराठमोळा चेहरा झळकला होता, तो म्हणजे सगळ्यांचा लाडका दगडू अर्थात अभिनेता प्रथमेश परब. २७ ऑक्टोबरला प्रथमेशचा 'सिंगल' हा आगामी मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या निमित्ताने प्रथमेशने महाएमटीबीशी गप्पा मारल्या आणि दृश्यम या त्याच्या हिंदीतील पदार्पणाच्या चित्रपटातील काही आठवणींना उजाळा दिला.
... आणि अजय देवगण प्रथमेशसाठी विमानतळावर थांबला
दृश्यम १ या चित्रपटाचे चित्रिकरण ज्यावेळी सुरु झाले होते त्याचवेळी प्रथमेश परबचा टाईमपास २ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तो गुंतलेला होता. अजय देवगण यांनी प्रथमेशला सांगितलं होतं की काजोलने तुझा टाईमपास चित्रपट पाहिला आहे आणि ती तुझी फॅन आहे. ते ऐकून मी भारावूनच गेलो होतो. पुढे त्यावेळेचा एक किस्सा सांगताना प्रथमेश म्हणाला, “दृश्यम १ चं चित्रिकरण सुरु झालं होतं त्याचवेळी टाईमपास २ प्रदर्शित झाला होता आणि प्रमोशनच्या गडबडीत माझं विमान चुकलं आणि मला उशीर झाला होता, त्यावेळी चक्क अजय देवगण माझ्यासाठी विमानतळावर थांबले होते. मी त्यांना भेटून त्यांची माफी मागितली, त्यावर ते म्हणाले अरे तुझा टाईमपास २ चित्रपट फार जोमात चालला आहे, मुंबईत बरेच शो आहेत अभिनंदन. त्यांच्या त्या वाक्याने मला खरंच जीव भांड्यात पडला होता आणि इतका मोठा कलाकार इतक्या अदबीने वागतो याचं खरचं कौतुक देखील वाटलं होतं”.
...आणि अजय देवगण यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला
‘दृश्यम २’ च्या चित्रिकणादरम्यानचा एक किस्सा सांगत प्रथमेश म्हणाला की, “शुट सुरु होतं आणि एका कलाकाराला त्याचे संवाद नीट जमत नव्हते. मी तेच पाहात उभा होतो आणि अचानक मागून खांद्यावर कुणीचरी हात ठेवला, बघितलं तर अजय देवगण यांचा तो भारदस्त हात होता. आणि त्यानंतर बराच वेळ ते त्या कलाकाराला समजावत होते, माझ्याशी गप्पा मारत होते. त्यामुळे खरंच खुप आपलेपणा ‘दृश्यम’च्या सेटवर वाटत होता”.