विविध केसांच्या तक्रारींवर एकच रामबाण उपाय असे नसते. प्रत्येक व्याधीचे कारण भिन्न असते. तसेच, केसांच्या विविध समस्यांची कारणेदेखील वेगवेगळी असू शकतात. आयुर्वेदशास्त्रात केवळ रोगांचे निर्हरण, समूळ उच्चाटन सांगितलेले नाही. यात प्रत्येक अंग-अवयवाची निर्मिती कधी व कशी होते, त्यासाठी लागणारी पूरक कारणे तसेच आरोग्य प्राप्ती म्हणजे केवळ रोगमुक्त अवस्था नसून शरीरातील प्राकृत अवस्था (समतोल) संतुलित स्थिती टिकविणे या बद्दलही विस्ताराने सांगितले आहे. पुढील लेखातून केसांबद्दलची ही सर्व माहिती आपण बघूयात.
सुंदर, काळेभोर केस सगळ्यांना हवे हवेसे असतात. स्त्री असो वा पुरुष, डोक्यावरील केसांची निगा प्रत्येक व्यक्ती घेत असतो. केस गळणे, विरळ होणे, पातळ होणे, रुक्ष होऊन तुटणे, कोंडा होणे, पिकणे, डोक्यात खाज, उवालिखा होणे इ. विविध तक्रारी व समस्या घेऊन रुग्ण दवाखान्यात येत असतो. प्रत्येक व्यक्ती यापैकी एकतरी त्रास अनुभवलेला असतो. त्यावर साबण-शाम्पू इ.चे तात्पुरते उपायही करून झालेले असतात. नवनवीन उत्पादने बाजारात आली, त्याची जाहिरात बघितली की, त्याचा उपयोगही बर्याच वेळा केला जातो. काही अंशी गुणही येतो. पण,पूर्ण आराम मिळत नाही.
आजच्या लेखाद्वारे प्रकृतीनुरुप केसांची नैसर्गिक स्थिती कशी असते, हे जाणून घेऊया. मनुष्य प्रकृती ही तीन दोषांवर आधारित आहे. वात, पित्त व कफ यांच्या विविध संयोजनाने एकूण सात प्रकारच्या प्रकृती निर्माण होतात. प्रत्येक प्रकृतीमध्ये तीनही दोष अस्तित्वात असतात. पण, तरतम भावांनी त्याचे प्रमाण कमी-अधिक असल्यामुळे ज्यांचे प्रमाण अधिक त्या दोषांच्या नावाने ती प्रकृती ओळखली जाते. म्हणजे वातज प्रकृती (यात वात दोषाचे प्राबल्य अधिक असते) पित्तज प्रकृती (यात पित्त दोषाचे प्रावीण्य अधिक असते) आणि कफज प्रकृतीमध्ये वात आणि पित्तापेक्षा कफाचे प्रमाण व कार्य अधिक प्राबल्याने घडते. या तीन एकल प्रकृती म्हणून ओळखल्या जातात. दोन-दोन दोषांच्या संयोजनाने व प्राबल्याने अजून तीन प्रकृतींचे प्रकार आढळतात. ते म्हणजे वात-पित्तज, पित्त-कफज आणि कफ-वातज. या तिन्हींना ‘द्वंद्वज प्रकृती’ म्हणतात. कारण, दोन दोषांचे प्राबल्य तिसर्या दोषापेक्षा अधिक असते. सातवी जी प्रकृती आहे, ती तिन्ही दोषांच्या समत्वाने निर्माण होते. याला ‘त्रिदोषज प्रकृती’ म्हणतात आणि सर्वांत ideal प्रकृती आहे. पण, वस्तुतः बघता द्वंद्वज प्रकृतीच्या व्यक्ती अधिक आढळतात.प्रत्येक दोषाची काही वैशिष्ट्ये आहेत. त्या-त्या प्रकृतीमध्ये त्या वैशिष्ट्यांचे दर्शन घडते. केसांसंदर्भातील प्रकृतीनुरुप वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत-
वातज प्रकृती : या प्रकृतीच्या व्यक्तींचे केस काळे असतात, पण पातळ असतात. केसांचा पोत रुक्ष असतो. केस थोडे खरखरीत व राठ असतात. अशाप्रकारच्या केसांना कितीही तेल लावले तरी थोड्याच वेळात ते पुन्हा कोरडे दिसू लागतात. वातज प्रकृतीच्या व्यक्तींचे केस सहसा खूप लांब सडक नसतात. बहुतांशी वेळेस तोकडे व तुटक असतात. त्या व्यक्तीच्या पाठीला जर केसांचा वारंवार स्पर्श होत असला, तर ते केस टोचतात, म्हणजेच तो स्पर्श सुखावह नसतो. केस खरखरीत असल्याने मानेवर पाठीवर त्वचेच्या संपर्कात आल्यास तिथे टोचतात आणि क्वचित त्यामुळे खाजवून त्वचा काळी ही पडू शकते. वात प्रकृतीच्या व्यक्तींचे केस लवकर गुंततात आणि जोराने केस खेचल्यास ते मुळासकटनिघू शकतात. पण, वातज प्रकृतीच्या व्यक्तींच्या केसाला वाढ मात्र चांगली असते. केस लवकर उगवतात, पण त्यांचा परीघ इतर प्रकृतीच्या व्यक्तींपेक्षा कमी असतो. म्हणून खूप केस असूनही त्याची वेणी, पोनीटेल पातळ-बारीकच येते.
वातज प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये ज्या केसांच्या कुरबुरी कायम राहतात, त्या मुख्यत्वेकरून रुक्षतेमुळे/कोरडेपणामुळे उद्भवतात. म्हणजे, केस रुक्ष, कोरडे व टोक टोचतील इतके तीक्ष्ण असतात. या केसांमध्ये डश्रिळीं एपवी होण्याची शक्यता खूप अधिक असते. तसेच टाळू कोरडा पडणे व ड्राय डॅण्ड्रफ होणे इ. केसांच्या तक्रारी वारंवार उत्पन्न होऊ शकतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये केस गळण्याचे प्रमाण अचानक वाढल्याचे जाणवते.
वरील सर्व गोष्टी वाचल्यावर एक गोष्ट लक्षात येते. जशी प्रकृती त्यानुसार विविध अंग-अवयांवर व मानसिक भावांवरही त्याचा परिणाम होतो. त्याचे पडसाद उमटतात. वातज प्रकृतीच्या व्यक्तींचा स्वभाव थोडा चंचल असतो. निर्णय क्षमता थोडी कमी असते. प्रत्येक गोष्ट सुरू करताना खूप उत्साह असतो. (आरंभ शूर) पण सातत्याने ते काम पूर्णत्वास नेताना तो उत्साह राहत नाही. यांचा राग-रुसवा खूप काळ टिकत नाही. स्वभावाने थोडे भितरट असतात. अतिविचार करणे, अतिचिंता करणे हा त्यांचा स्वभाव असतो. एखादी नकारात्मक घटना जर घडली, तर त्यावर सकारात्मक पाऊल उचलणे यांना चटकन जमत नाही. या स्वभावामुळे सतत चिंता करणे व त्याचा परिणाम शांत झोप न लागणे अशा स्वरूपात होताना दिसतो. मानसिक घालमेल होत असल्यासही केसांवर त्याचा अनिष्ट परिणाम होताना दिसतो. आपण हल्ली बघतोच, प्रत्येक वयातील व्यक्तींना काही ना काही चिंता, समस्या असतेच. पण, राईचे पर्वत करण्याची क्षमता वातज प्रकृतीच्या व्यक्तींची असते. स्वत: खूप नकारात्मक विचार करतात, घाबरतात व इतरांना ही घाबरावून सोडतात.
अशा व्यक्तिमत्वामुळे केसांची थोडी ही तक्रार असली, तरी ती खूप आहे असे भासते आणि खूप चिंतातूर होतात. अशा वेळेस केवळ तेल-शाम्पू-साबण-कंडीशनर बदलून फायदा होईल का? संपूर्ण फायदा नक्कीच होणार नाही, पण तात्पुरता होऊ शकतो. कुठल्याही व्याधींच्या चिकित्सेसाठी जसा सर्वांगीण त्रिदोष समत्वाचा, समतोलाचा विचार करावा लागतो, तसेच केसांच्या विविध आजारांवरही करावे लागते. केस हे शरीराचे अविभाज्य घटक आहेत. त्यांचे पोषण जतन शरीरच करते, म्हणून एकांगी विचार चिकित्सेसाठी फायदेशीर ठरत नाही.वातज प्रकृतीच्या व्यक्तींनी शरीरातील वाताला आटोक्यात ठेवणे, नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे. केसांची निगा घेतेवेळी नियमित शिरोभंग (केसांना तेल लावणे)व कोमट पाण्याने केस धुवावेत. खूप गरम पाणी केसांसाठी वापर करू नये. अतिचिंता, अतिजागरण, अतिउपास करणे उपाशी राहणे, अतिव्यायाम टाळावा.
केसांवर Hot treatments टाळाव्यात. STRAIGHTENING, PERMING COLOURING इ. विविध प्रक्रियांमध्ये खूप उष्णतेचा वापर होतो. तसेच बरीच रसायने वापरली जातात. या Hot treatments मुळे केसांच्या वरील संरक्षक कोटिंग खराब होते. निघून जाते. वारंवार असे व तत्सम विविध उपचार केल्याने केसांचे मूळही हलके होऊन तुटू लागते. यामुळे केस गळणे, कोरडे शुष्क होणे, केसांचा स्पर्श सहन न होणे (खराट्या सारखे खरखरीत होतात.) अशा अनेक तक्रारी उत्पन्न होतात व याच्या मागील कारण प्रकृती किंवा आहार नसून या विविध उपचार असू शकतात. सध्या विशी-तिशीतच Hair Dye वापरण्याकडे बर्याच जणांचा कल होताना दिसतो. यामुळे डोक्यावरील त्वचा खूप कोरडी होते व खाज वारंवार उत्पन्न होते. तसेच केसांचा पोत (TEXTURE) ही बदलते.प्रकृतीनुरूप जसे केस आहेत, ते समजून त्यानुसार आपल्याला काय सूट होईल याचा विचार सर्वांनी नक्कीच करावा(क्रमशः)
-वैद्य कीर्ती देव