उमरेठ : उद्यापासून नवरात्र उत्सव सुरू होणार आहे. त्याआधीच आता उमरेठ, आनंद येथील हिंदू मंदिरावर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. मंदिरावरील भगवा ध्वज उतरवून नाल्यात टाकण्यात आला असून शिवलिंग व नंदीच्या मूर्तीचीही मोडतोड करण्यात आली आहे. मात्र, हे कृत्य कोणी केले हे अद्याप समजू शकलेले नाही. सध्या गुजरात पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आनंदच्या उमरेठ येथील ओड बाजारजवळ तलावाच्या काठावर असलेल्या सिद्धनाथ महादेव मंदिरात ही घटना घडली. दि.११ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री काही अज्ञात हल्लेखोरांनी येथील मंदिरावर दगडफेक केली. ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये मंदिराभोवती दगड आणि विटा दिसत आहेत.
दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी पुजारी व इतर भाविक मंदिरात पोहोचले असता त्यांना तोडफोडीची घटना घडल्याचे लक्षात आले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. वृत्तानुसार या हल्ल्यात शिवलिंगाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याशिवाय तेथे फडकवलेल्या भगव्या ध्वजाचाही अवमान करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी ध्वज दिसत नसताना भाविकांनी शोध घेतला असता नाल्यात ध्वज सापडला.
तिथल्या स्थानिकांनी ऑपइंडिया या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, ज्या भागात हे मंदिर आहे त्या भागात हिंदू-मुस्लिम दोन्ही समुदायांचे निवासस्थान आहे आणि अशीच एक घटना काही वर्षांपूर्वी घडली होती, ज्यामुळे मंदिराभोवती कुंपण घालण्यात आले होते. याशिवाय हिंदू तरुणही दररोज रात्री मंदिराजवळ बसतात. तरी स्थानिक हिंदू तरुणांनी हा प्रकार कट्टरपंथी तरुणांकडून घडवून आणल्याची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये चार तरुणांचा सहभाग असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्याची ओळख पटू शकली नाही.
याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले- तक्रार प्राप्त झाली असून, तपास सुरू आहेया घटनेबाबत पोलिसांचे म्हणणे आहे की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. उमरेठ पोलिस स्टेशनचे पीएसआय घनश्यामसिंग पावरा म्हणाले, “मंदिराबाहेर विटांचे तुकडे पडलेले आढळले.आम्हाला असेही वाटते की हे मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या लोकांचे काम असावे. कारण गर्भगृहात दगडफेक किंवा मंदिराचे नुकसान करण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाही, अद्याप कोणाचीही ओळख पटलेली नाही. आणि या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.”मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मंदिराच्या गर्भगृहात दगडाचे छोटे तुकडेही दिसत आहेत, जे जाळीमुळे बाहेर अडकलेले दगड असू शकतात. मात्र, तपासानंतरच खरे तथ्य समोर येईल.