साहित्याचा नोबेल गौरव

    14-Oct-2023   
Total Views |
Norwegian writer John Fosse Won Nobel Prize in Literature

२०२३चा साहित्य क्षेत्रातील ‘नोबेल पुरस्कार’ जॉन फॉसे या नॉर्वेजियन लेखकाला नुकताच जाहीर झाला. त्यानिमित्ताने लेखक जॉन फॉसे आणि त्यांच्या साहित्य कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख...

खरंतर प्रत्येक कलाकार साहित्यनिर्मिती करीत असतो. नवनिर्मितीची आस असलेल्या प्रत्येक जीवाची उत्कट अभिव्यक्ती म्हणजे साहित्य! अर्थात, अभिव्यक्तीचं दस्तऐवजीकरण करणं गरजेचं असतं. जॉन फॉसे लिखाणासोबतच अनुवाद आणि अभिनयातही अव्वल! त्यांच्या नावीन्यपूर्ण नाटकांसाठी आणि लेखनासाठी त्यांना यंदा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. समाज म्हटलं की, संघर्ष आलाच. संघर्ष म्हटलं की, नियमही ओघानेच येतात. या नियमांचा विचार करताना बरेचदा कितीतरी गोष्टी दुर्लक्षित राहतात. समाजाच्या अभिव्यक्तीच्या पटलावर, त्या कधीच येऊ शकत नाहीत. या अशा विरून जाणार्‍या गोष्टी आपल्या दोन बोटांच्या लेखणीत उत्तमरित्या मांडण्यात जॉन यांचा हातखंडा.

आपल्या ६४ वर्षांच्या कारकिर्दीत ७० पेक्षा जास्त कादंबर्‍या, कविता, लहान मुलांची पुस्तके, निबंध, कथा आणि नाट्यखेळ, नाटके असे विविधांगी साहित्य प्रसुत केले. त्यांच्या लेखनाचे ५० पेक्षा जास्त भाषेत अनुवादही झाले आहेत. अनुवाद म्हणजे केवळ भाषांतर नाही, तर अनुवाद हे अनुसर्जन असतं. एका नव्या वाचकासमोर एक वेगळीच संकल्पना उलगडायची असते. त्या अनुवादित भाषा संस्कृतीत कदाचित मूळ भाषेतील शब्दही नसतील. त्यामुळे मग अशा संकल्पना त्या वाचकांच्या मनाला स्पर्शावणे किती कौशल्यपूर्ण असते, हे लक्षात यावे.

हेन्रिक इब्सेननंतर सर्वाधिक सादरीकण झालेले नॉर्वेजियन नाटककार आणि सध्या जगभरात एक हजारांहून अधिक मंचावर सादर केलेल्या कलाकृती पाहता समकालीन नाटककारांपैकी त्यांचे नाव अग्रणी घेता येईल. हेन्रिक इब्सेनने १९व्या शतकात स्थापन केलेल्या नाट्यपरंपरेच्या आधुनिक धाटणीचा हा नवा वारसच म्हणता येईल. त्यांची नाटके सखोल आणि आत्मचिंतनपर असतात. इतकेच नाही, तर भाषाशैली, पदांच्या गेय रचना कलाकृती सादर झाल्यानंतरही निरंतर राहतात. काही नाटकं अशी असतात, जी संपल्यानंतरही त्यांचा नाट्यांश, आशयगर्भ विचारमूल्य ही आपल्या मनात पिंगा घालतच असतात. विजयाबाईंची नाटकं रंगभूमीवर संपली की कशी डोक्यात वाजत राहतात, अगदी तस्सं! जॉन यांच्या लेखनशैलीचेही हेच वैशिष्ट्य.

जॉन फॉस यांचा जन्म १९५९ रोजी हॉगेसंड, नॉर्वे येथे झाला आणि ते स्ट्रांडेबर्म येथे लहानाचे मोठे झाले. आई-वडिलांच्या विचारांमुळे जॉन यांची आध्यात्मिक बैठकही दृढ झाली. आपल्या विचारांची एक बैठक पक्की झाली की, विचारांना दिशा मिळणे सुलभ होते. वयाच्या सातव्या वर्षी जॉन यांचा एक गंभीर अपघात झाला. अगदी मृत्यूच्या दाढेतून त्यावेळी ते कसेबसे बचावले होते. हा नवा जन्म त्यांना बरेच काही शिकवून गेला. हे असे अनेक अनुभव त्यांना घडवत गेले. जॉन म्हणतात की, “त्यांना वाचनाची आवड लहानपणी नव्हतीच आणि तरीही ते अगदी वयाच्या बाराव्या वर्षांपासून लिहित गेले.” त्यांना तेव्हापासूनच गिटार या तारवाद्याचा शौक. त्यांना संगीतकार व्हायचे होते. कलेची ओढ होतीच, ते अगदी स्पष्ट दिसतही होती. त्यांनी सारंगीदेखील वाजवली आणि त्यांच्या किशोरवयीन लेखनाच्या सरावात या कलेला स्थान होते. परंतु, कालांतराने संगीताप्रतीची महत्त्वाकांक्षा त्यांनी कमी केली आणि आयुष्यातला बराचसा वेळ ते लेखनकार्यासाठी देऊ लागले. वयाच्या एका टप्प्यावर आपण अराजकतावादी होतोच, जॉनही होते. साम्यवादाचा तर त्यांनी खुलेआमपणे पुरस्कार केला. स्वतःला तेव्हा ते ‘हिप्पी’ म्हणवून घेण्यात धन्यता मानत.

महाविद्यालयीन काळात तरुणांची तत्त्व आणि विचारांची जडणघडण होत असते. महाविद्यालय आणि तिथे शिकत असलेल्या विषयांचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडतो. जॉन फॉस यांनी बर्गन विद्यापीठात प्रवेश घेतला आणि तुलनात्मक साहित्याचा अभ्यास केला. तसेच त्याच काळात त्यांनी निनॉर्स्कमध्ये लिहायला सुरुवात केली. त्यांची पहिली कादंबरी १९८३ मध्ये प्रकाशित झाली. या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे, ही कादंबरी त्यावेळच्या नॉर्वेमध्ये लोकप्रिय असलेल्या सामाजिक वास्तववादी आणि काल्पनिक कथांशी विसंगत होती. तसेच या कादंबरीत कथानकाऐवजी भाषिक अभिव्यक्तीवर भर दिला होता. त्यानंतर १९८५ मध्ये जॉन यांनी दुसरी कादंबरी, ’डींशपसव सळींरी’ लिहिली. इथून त्यांच्या लेखनाला बहर आला. १९८६ मध्ये ’अपसशश्र ुळींह थरींशी ळप खीीं एूशी’ हे कवितांचे पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक त्यांच्या यशातील मैलाचा दगड.

या काव्यसंग्रहामार्फत ते घराघरात पोहोचले. याचवेळी त्यांची तिसरी कादंबरी ‘ब्लॉक’सुद्धा बाजारात उपलब्ध झाली. १९८९ मध्ये त्यांच्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर, फॉसे यांनी एक कादंबरी आणि त्यांचा पहिला निबंधसंग्रह प्रकाशित केला. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस, त्यांचे लेखनकार्य चालूच होते. मात्र, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक नव्या जुन्या घटना घडत होत्या. याचवेळेस त्यांची दुसरी पत्नी ग्रेथे फातिमा सय्यद हिच्यासोबत अनेक अनुवादांवर काम केले. अनुसर्जनाचे कार्य इथे सुरू झाले होते. फॉसने स्वतः सॅम्युअल बेकेट, तसेच जॉर्ज ट्रॅकल आणि थॉमस बर्नहार्ड यांचे उल्लेख केले आहेत. ते म्हणतात की, “ओलाव एच. हॉज, फ्रांझ काफ्का, विल्यम फॉल्कनर, व्हर्जिनिया वुल्फ आणि बायबल यांचा समावेश असलेल्या इतर लेखक आणि पुस्तकांचा माझ्या जीवनावर आणि कार्यावर प्रभाव आहे.”

‘द डेली टेलीग्राफ’ प्रकाशनाच्या बुद्धिमत्तेच्या यादीत त्यांना ८३व्या क्रमांकावर उल्लेख झाल्याचे मानांकन प्राप्त झाले आहे. ही यादी १०० बुद्धिवंतांची होती. ही घटना जॉनला राजकीय वर्तुळात स्थान देऊन गेली. २०११ पासून जॉन फॉसे यांना नॉर्वेजियन राज्याच्या मालकीचे आणि ओस्लो शहराच्या मध्यभागी असलेल्या रॉयल पॅलेसच्या आवारात असलेले ग्रोटन हे मानद निवासस्थान देण्यात आले. त्यांच्या लेखनकार्याचा हा केवढा मोठा गौरव! कायमस्वरुपी निवासस्थान म्हणून ग्रोटनचा वापर हा नॉर्वेच्या राजाने नॉर्वेजियन कला आणि संस्कृतीतील योगदानासाठी खास दिलेला सन्मान आहे. २०११ मध्ये प्रकाशित झालेल्या बायबलचा नॉर्वेजियन अनुवाद ही देखील महत्त्वाची घटना. यासाठी असलेल्या सल्लागार समितीत जॉन यांचे महत्त्वाचे स्थान होते. साधारण याच सुमारास त्यांना २०१५चा ‘नॉर्डिक काऊंसिल’चा ‘अ‍ॅण्डवाके’ (वेकफुलनेस), ‘ओलाव्हस ड्रॅमर’ (ओलाव्हची स्वप्ने), आणि ‘क्वेल्ड्सव्हेव्हड’ (थकवा) या तीन पुस्तकांच्या संचासाठी साहित्य पुरस्कारही देण्यात आला. मोहम्मद हामेद यांनी जॉन फॉस यांच्या अनेक कामांचे फारसी भाषेत भाषांतरही केले आहे. त्यांची नाट्यकृती इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर अजूनही सादर होते. फॉस यांच्या सहा नाटकांचे अनुवाद अमेरिकन-इंग्रजीमध्ये साहित्यिक कलाकार सारा कॅमेरॉन सुंडे यांनी केले. यात ’नाईट सिंग्ज इट्स सॉन्ग्स’, ’डेथ व्हेरिएशन्स’, साकाला, अ समर डे, या पुस्तकांचा समावेश आहे.

एप्रिल २०२२ मध्ये, जॉन फॉसची कादंबरी ’ए न्यू नेम ः सेप्टोलॉजी’ डॅमियन सेर्ल्सने इंग्रजीत अनुवादित केली, ती आंतरराष्ट्रीय ‘बुकर पुरस्कारा’साठी निवडली गेली. या पुस्तकाला ‘फिक्शन’मधील ‘२०२३ नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल पुरस्कारा’साठी नामांकनही देण्यात आले. तेव्हा, अशा या अष्टपैलू साहित्यिक जॉन फोसे यांना नोबेलनिमित्त मनस्वी शुभेच्छा!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.