नवउद्योजकांसाठी 'विरार-हब इनक्यूबेटर' उपक्रमाची सुरुवात

कंटेंटस्टॅक कंपनीचे सहसंस्थापक निशांत पटेल यांची संकल्पना

    14-Oct-2023
Total Views |
Virar
 
 
 
नवउद्योजकांसाठी 'विरार-हब इनक्यूबेटर' उपक्रमाची सुरुवात
 
 
कंटेंटस्टॅक कंपनीचे सहसंस्थापक निशांत पटेल यांची संकल्पना 
 
 
मुंबई: स्थानिक पातळीवरील नवे संशोधन, संकल्पना राबविणाऱ्या होतकरू नवउद्योजकांना मदत करण्याच्या उद्देशाने विरार येथील कंटेंटस्टॅक कंपनीचे सहसंस्थापक निशांत पटेल यांनी विरार-हब इनक्यूबेटर हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.या परिसरातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे यशस्वी कंपन्यांसोबत भागीदारी करून तज्ज्ञांचे मार्गदर्शन,संसाधने आणि पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक भागीदारीची संधी देऊन प्राथमिक अवस्थेतील स्टार्टअप्सना पाठबळ देण्याचे इनक्यूबेटरचे उद्दिष्ट आहे.
 
विरार-हब डिजिटल माध्यमातून वसई-विरार परिसरात उद्योजकतेची संस्कृती निर्माण करण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करण्याचा तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजक आणि कंटेंटस्टॅकचे सह-संस्थापक निशांत पटेल यांचा मानस आहे. ते म्हणाले, "विरारमध्ये माझ्या कंपनीचा प्रवास सुरू केल्यानंतर,या भागातील सुप्त क्षमतेचा मी अनुभव घेतला आहे.या क्षमेतचा विकास करण्याच्या उद्देशाने, विरारमधील स्टार्टअप्सची आगामी पिढी विकसित करण्याची आकांक्षेने मी विरार-हब इनक्यूबेटरची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.आज या प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करताना मला अतिशय आनंद होत आहे. या मिशनला पुढे नेण्यासाठी,आम्ही रॉ इंजिनीअरिंग अॅकॅडमीदेखील सुरू केली आहे,जी तंत्रज्ञान आणि उद्योजकतेचे प्रशिक्षण देते आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्यांनी परिपूर्ण करते."
 
या उपक्रमात निशांत पटेल यांच्यासोबत रूट मोबाईल लि.चे संस्थापक आणि सीईओ राजदीप गुप्ता आणि महाराष्ट्र विधानसभेत नालासोपारा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य क्षितिज ठाकूर यांनी भागीदारी केली आहे.क्षितिज ठाकूर कायम वसई-विरार भागातील स्टार्टअपना पाठींबा देण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी तयार असतात, तर राजदीप गुप्ता एक अनुभवी उद्योजक असून, त्यांनी या मोहिमेला पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे.
 
यानिमित्त आयोजित विरार-हब स्टार्टअप क्वेस्ट स्पर्धेच्या ग्रँड फिनालेला क्षितिज ठाकूर हे प्रमुख पाहुणे आणि परीक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांनी या इनक्यूबेटरचे औपचारिक उद्घाटन केले आणि स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार केला.या स्पर्धेत बृहन्मुंबई परिसरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण स्टार्टअप कल्पना सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.यात दोनशेपेक्षा अधिक संघांनी भाग घेतला, त्याद्वारे ४७५ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी केवळ १० संघ अंतिम फेरीत पोहोचले.यापैकी,तीन संघ इनक्यूबेटरद्वारे मार्गदर्शनासाठी निवडले गेले. या संघाचे पुढे अधिक मूल्यांकन केले जाईल. भविष्यातील नावीन्यपूर्ण उद्योगांना आकार देण्यासाठी विरार-हब इनक्यूबेटर बृहन्मुंबई विभागातील सर्व उद्योजक,विद्यार्थी आणि महाविद्यालये यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे.