शिक्षकांच्या खासगी आणि सार्वजनिक आयुष्याचा सन्मान करायलाच हवा – सुबोध भावे

    13-Oct-2023
Total Views |
 
subodh
 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : मिखील मुसळे दिग्दर्शित ‘साजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटात अनेक मराठी कलाकारांची फौज काम करताना दिसणार आहे. यात अभिनेता सुबोध भावे वेगळ्या पठडीची भूमिका साकारताना दिसणार आहे. एका शिक्षिकेच्या अर्थात सजनी शिंदेच्या जीवनात एक प्रसंग घडतो आणि ती गायब होते, त्यानंतर चित्रपटात अनेक रहस्यमय घटना घडतात असे या चित्रपटाचे कथानक आहे. शिक्षकांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाबद्दल ‘महाएमटीबी’शी बोलताना अभिनेता सुबोध भावे म्हणाला की, “सामान्य माणसांप्रमाणेच प्रत्येक शिक्षकांचे खाजगी आणि सार्वजनिक आयुष्य असते, आणि त्यांचा सन्मान हा आपण केलाच पाहिजे”.
 
काय म्हणाला सुबोध भावे?
“प्रत्येकाचं खासगी आणि सार्वजनिक आयुष्य असतं. शिक्षक ज्यावेळी शाळेत शिकवत असतात त्यावेळी त्यांचे व्यक्तिमत्व वेगळे असते, त्यांच्या घरी इतर सामान्य लोकांसारख्या संकटांचा सामनाही त्यांना करावा लागतो. कुठल्याही माणसाचे विविध पैलु आपल्यासमोर तेव्हाच येतात जेव्हा त्यांच्या आयुष्यात अशी एखादी घटना घडते ज्यामुळे ती व्यक्ती आणि तिच्या आजुबाजूच्या सर्वांचेच आयुष्य पुर्णत: बदलून जाते. त्या संकटाच्या वेळी सगळ्यांचेच खरे चेहरे समोर येतात. चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास, ज्यावेळी सजनी गायब होते, त्यानंतर तिचे पालक, मित्र-मैत्रिणी, शाळेतील तिचे सहकारी या सगळ्यांची खरी रुपं समोर येतात. शिक्षक हे महत्वाचे असतातच पण त्या शिक्षकांना शाळेच्या आणि शिकवण्याच्या पलिकडे एक खाजगी आयुष्य देखील आहे. आणि त्या प्रत्येकाच्या खाजगी जीवनाचा आपण सन्मान करणे गरजेचे आहे. आपण आपल्याला ज्या गोष्टी जाणवतात त्या नकळतपणे समोरच्या व्यक्तिवर लादण्याचा प्रयत्न करतो. हल्लीच्या सोशल मिडियाच्या काळात या घटना अधिक तीव्रतेने दिसून येतात. प्रत्येक जण एक आदर्श स्त्री किंवा पुरुष असल्याच्या भूमिकेतून लोकांवर सातत्याने टीका करत असतात. पण ज्यावेळी आपण स्वत: मध्ये डोकावून पाहतो त्यावेळी या आदर्शवादाच्या बुरख्याखाली आपलेच खरे रंग दिसून येतात. आणि ज्ञान आणि स्वत:ला शोधण्याच्या मार्ग तोच आहे जेव्हा आपण खरोखर कोण आणि काय आहोत हे आपल्यालाच पटेल”.
 
'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' या चित्रपटात अभिनेत्री भाग्यश्री, राधिका मदान, निमरत कौर यांच्यासह अभिनेता चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, शशांक शिंदे, सुमित व्यास असे मातब्बर कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट २७ ऑक्टोबर, २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.