मुंबई : वाघनखांच्या सतत्येबाबत खंडीभर पुरावे असताना, आणखी काय हवे? असा सवाल ज्येष्ठ अभिनेते आणि ऐतिहासिक व्याख्यानकार डॉ. राहुल सोलापूरकर यांनी केला आहे. मुंबई भाजपच्यावतीने स्वा. सावरकर सभागृहात गुरुवारी ’वाघनखांच्या निमित्ताने’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानानंतर त्यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधला. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची विशेष उपस्थिती होती. खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रसाद लाड, आमदार योगेश सागर आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. राहुल सोलापूरकर यांनी व्याख्यानाची सुरुवात करताना छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सरदार अफझलखान यांच्यात झालेल्या युद्धाचे वर्णन केले. महाराष्ट्राच्या इतिहासातील एक रोमांचकारी घटनेची सुरुवात कशी झाली, यासाठी तयारी कशी करण्यात आली, पत्रव्यवहार, भेटीची तारीख तीच का, मुघल सैन्याला नियंत्रित करण्यासाठी महाराजांनी केलेली व्यवस्था, खानाला अस्वस्थ करण्यासाठी उधळलेली कस्तुरी, पाजलेले सरबत, भेटीच्या ठरवलेल्या वेळेपेक्षा उशिरा जाणे यासर्वामागील महाराजांची युक्ती याचे विश्लेषण त्यांनी ओघवत्या शैलीत केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले असून शंखेखोरांना प्रत्युत्तर देणे गरजेचे असल्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लंडनच्या कार्यालयाशी संपर्क करून, त्यांच्याशी लेखी करार करणे, आदानप्रदान करणे यासाठी सरकारने खूप प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्राच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या वाघनखांचे दर्शन व्हावे, याकरिता प्रयत्न केले. करार झाला, वाघनखं भारतात येण्याची तारीख ठरली तेवढ्यात माशी शिंकली!
शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत का? असा सवाल करीत त्यावर आक्षेप घेतला आहे. याबाबत नीट घटनाक्रम पाहिला, तर लक्षात येईल की, हे सोची समजी साजिश आहे. हे एक षड्यंत्रच आहे. मविआचा भाग झाल्यावर ठाकरेंना गादी एवढी प्रिय झाली की, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून ज्या पक्षाचा जन्म झाला त्या पक्षाने महाराजांच्या वंशजांना पुरावे विचारले”. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अॅड. आशिष शेलार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर नंदेश उमप यांनी पोवड्यातून अफजलखानाच्या वधाचे वर्णन केलेे.