मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणात सुरू असलेल्या विधिमंडळ सुनावणीचा आणखी एक टप्पा गुरुवारी पूर्ण झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाच्यावतीने करण्यात आलेल्या तीनही अर्जांवर गुरुवारी सुनावणी पार पडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल अडीच ते पावणे तीन तास चाललेल्या या सुनावणीत दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. यावेळी पुढील कारवाई शुक्रवार, दि. २० ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
एकत्रच सुनावणी घ्या!
शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवर उबाठा गटाने आक्षेप नोंदवले. कायद्याचा किस पाडण्याचे काम या सुनावणीत होत आहे. अपात्रतेची सुनावणी लांबवण्यासाठी वेळेचा उपयोग केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी दखल घ्यावी, अशी आमची मागणी आहे. जर याचिकांवर एकत्र सुनावणी झाली, तर लवकर निकाल येईल. त्यावर विधानसभा अध्यक्षदेखील निकाल देत नाही. सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी घ्यावी, अशी आमची मागणी असल्याचा पुनरुच्चार ठाकरे गटाने केला. दरम्यान, गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर सर्व कागदपत्रे आणि इतर गोष्टींची पडताळणी करून शुक्रवार, दि. २० ऑक्टोबर रोजी निकाल दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.