निज्जर असो वा लतीफ दहशतवाद्याना ठोकण्याचा जगभरात एकच पॅटर्न!
12-Oct-2023
Total Views |
पाकिस्तानमध्ये काल(११/१०/२०२३) भारताच्या २ मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची हत्या झाली. पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेला दहशतवादी शाहिद लतीफ आणि आयएसआय एजंट मुल्ला बहूर उर्फ होर्मुझ याची पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. यामुळे परदेशात राहून भारताविरुद्ध षडयंत्र रचणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
मागच्या काहीकाळापासून पाकिस्तानमधील इस्लामिक दहशतवादी असो की कॅनडातील खलिस्तानी दहशतवादी यांच्या मोठ्या प्रमाणावर हत्या झाल्या आहेत. त्यांच्या हत्येचा पॅटर्न पण सारखाच आहे. त्यामुळे त्यांच्या या हत्या कोण घडवत आहे. याविषयी लोकांमध्ये उत्सुकता पसरली आहे.
कॅनडाच्या पंतप्रधानांनी तर भारतीय तपास यंत्रणांनी खलिस्तानी दहशतवादी हरदिपसिंग निज्जरची हत्या केल्याचा आरोप केला होता. पण आपल्या आरोपांना बळ देणारे कोणतेही पुरावे ते सादर करु शकले नाहीत. त्यांचे हे आरोप भारत सरकारने फेटाळले होते. पण ज्या प्रकारे भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची हत्या पाकिस्तान कॅनडा आणि ब्रिटनमध्ये होत आहे, त्यावरुन लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे की, या परदेशात भारतविरोधी षडयंत्र रचणाऱ्या या दहशतवाद्यांचा खात्मा नेमकं कोण करत आहे.
मागच्या ४८ तासांमध्ये २ मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची हत्या झाली. पण त्याआधी सुद्धा अनेक दहशतवाद्यांची हत्या याचप्रकारे करण्यात आली आहे. याचवर्षी २० फेब्रुवारीला रावळपिंडीत दहशतवादी बशीर अहमद पीर उर्फ इम्तियाजवर गोळ्या झाडण्यात आल्या. या दहशतवादी इम्तियाजकडे हिजबुल मुजाहिद्दीनचे लॉन्च पॅड सांभाळण्याची जबाबदारी होती.
इम्तियाजची हत्या ज्याप्रकारे करण्यात आली, तशाचप्रकारे गेल्या महिन्यात 'लष्कर-ए-तैयबा'चा प्रमुख हाफिज सईदचा जवळचा सहकारी अबू कासिम याला रावळकोटमध्ये गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेला खलिस्तान कमांडो फोर्सचा दहशतवादी आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड परमजीत सिंग पंजवाड याचीही पाकिस्तानात अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
याशिवाय हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख दहशतवादी बशीर मीर उर्फ इम्तियाज आलम आणि जैशचा दहशतवादी जहूर मिस्त्री यांचाही पाकिस्तानात खात्मा झाला. कंदहार विमान अपहरण प्रकरणात जहूर मिस्त्री सहभागी होता. मागच्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तानमध्ये या सर्व इस्लामिक आणि खलिस्तानी दहशतवाद्यांची हत्या करण्यात आली. पाकिस्तानबरोबरच कॅनडामध्ये सुद्धा अनेक खलिस्ताना दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदिपसिंग निज्जरची हत्या करण्यात आली. हरदिपसिंग निज्जरप्रमाणेच खलिस्तानी दहशतवादी सुखा दूनिकेची सुद्धा हत्या करण्यात आली. हरदिपसिंग निज्जरच्या हत्येचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडोंनी भारतावर लावला होता. त्यांच्या या आरोपांमुळे दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधामध्ये तणाव निर्माण झाला होता. कॅनडाने भारताविरुद्ध लावलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खलिस्तान समर्थक रॅलीमध्ये भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात आला होता. खलिस्तानी दहशतवादी अवतार सिंग खांडा याने लंडनमधील भारतीय दूतावासाचा राष्ट्रध्वज खाली ओढण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या कृत्यानंतर त्याचे १५ जून रोजी बर्मिंगहॅम येथील रुग्णालयात संशयास्पदरित्या निधन झाले. त्याला विष देऊन मारण्यात आल्याचा दावा, अनेक रिपोर्टमधून करण्यात आला.
मागच्या काही काळात परदेशात राहून भारताविरुद्ध षडयंत्र रचणाऱ्या दहशतवाद्यांची ज्याप्रकारे हत्या होत आहे. त्यामुळे हे दहशतवादी आपले प्राण वाचवण्यासाठी भूमिगत झाले आहेत. आधी पाकिस्तान आणि कॅनडामध्ये खुलेआम फिरणारे हे इस्लामिक आणि खलिस्तानी दहशतवादी आता सार्वजनिक ठिकाणी दिसत नाहीत.