मुंबई : मराठी असो किंवा हिंदी चित्रपटसृष्टी असो स्त्री आणि पुरुष व्यक्तिरेखा या तितक्याच ताकदीचे पडद्यावर मांडल्या जातात. उलट काळानुरुप स्त्री भूमिका अधिक महत्वपुर्ण होत गेल्या आणि त्यानंतर स्त्री पात्रांच्या भोवती चित्रपटाचे कथानक फिरणारे अनेक चित्रपट मराठी, हिंदी अथवा इतर भाषिक चित्रपटसृष्टीत देखील मोठ्या प्रमाणात येऊ लागले. मनोरजंनसृष्टीत स्त्री प्रधान चित्रपट एकीकडे येत असताना मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने तिला ती स्वत: मुलगी असण्यावरुन खंत वाटत असल्याचे एक विधान केले आहे.
काय म्हणाली ऋतुजा बागवे?
बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा वेगळी भूमिका ऋतुजा तिच्या आगामी अंकुश या चित्रपटात साकारणार आहे. या वेळी एका मुलाखतीत तिने, “मला वाईट वाटतं की मुलगा का नाहीये? जर मी मुलगा असते तर मलाही चित्रपटात अॅक्शन सीन्स करता आले असते,” असे विधान केले होते.
मात्र, मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात डोकावून पाहिले तर अनेक दिग्गज अभिनेत्रींनी फायटींग आणि अॅक्शन सीन्स केले आहेत. यात प्रामुख्याने पहिले नाव घ्यायचे ते म्हणजे अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांचे. ८० च्या दशकात मर्दानी अभिनेत्री म्हणून त्यांनी आपली अनोखी छाप उमटवली. भन्नाट भानू, फटाकडी अशा अनेक चित्रपटांत त्यांनी फायटींग आणि अॅक्शन सीन्स केले आहेत. याशिवाय अभिनेत्री वर्षा उसगांवकर, अश्विनी भावे यांनी देखील पोलिसांच्या भूमिका साकारत मराठी अभिनेत्री सोज्वळ भूमिकांसोबत ताकदीची आणि डॅशिंग भूमिका देखील साकारु शकतात हे सिद्ध केले आहे. बऱ्याच चित्रपटात गावातील स्त्री अतिशय तंतोतंत साकारणारी अभिनेत्री म्हणजे रंजना. मात्र, रंजना यांनी देखील आपल्या अभिनयाच्या चौकटीतून बाहेर येत अशा भूमिका साकारल्या आहेत. इतकेच नव्हे, तर अभिनेत्री सायली संजीव ही देखील तिच्या आगामी 'काया' या चित्रपटात डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे.
मराठीच नव्हे तर अगदी हिंदी चित्रपटांत देखील राणी मुखर्जी, कॅटरीना कैफ, दीपिका पडूकोण, प्रियांका चोप्रा, राधिका आपटे यांनी देखील फायटींग आणि अॅक्शन सीन्स बऱ्याच चित्रपटात केले आहेत. त्यामुळे मुलगी म्हणून चित्रपटांत अॅक्शन सीन्स करता आले असते या ऋतुजाच्या विधानाचा तिनेच पाठपुरावा केल्यास आत्तापर्यंत ज्या अभिनेत्रींनी कामं करुन ठेवली आहेत त्याचा आदर नक्कीच होईल.