आत्महत्येची ‘कोटा फॅक्टरी’ आणि विद्यार्थ्यांच्या नैराश्याची कारणमीमांसा

    11-Oct-2023
Total Views |
kota factory and student suicide
 
राजस्थानमधील कोटा शहरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय. कमी गुण मिळण्याच्या भीतीने विद्यार्थ्यांची होणारी घालमेल, त्यातून त्यांना होणारा मानसिक तणाव, यातून बाहेर कसे पडावे, याबद्दल बराच उहापोह झाला. मात्र, विद्यार्थ्यांची बाजू नेमकी काय? त्यांना होणार्‍या तणावातून मुक्त होण्यासाठी काय करावे लागेल, याबद्दल परखडपणे फारशी चर्चा झाली नाही. तसेच मानसिक तणावासारख्या गंभीर विषयावर आजही मोकळेपणाने संवाद होत नाही. या पार्श्वभूमीवर नुकत्याच संपन्न झालेल्या ‘जागतिक मानसिक आरोग्य दिना’च्या निमित्ताने ‘शहीद मेजर राजेश नायर संस्थे’च्या संस्थापक आणि मानसोपचारतज्ज्ञ सुप्रिया नायर यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद...

मानसिक ताण म्हणजे नक्की काय? त्याची लक्षणे आणि विविध स्तर याविषयी काय सांगाल?

बहुतांश लोकांना असं वाटतं की, मानसिक तणाव म्हणजे उपचार करण्यायोग्य नैराश्य. पण, नैराश्य हे ‘मानसिक आरोग्याचे विकार’ या प्रकारात मोडतं. आपले दररोजचे जे ताण असतात, त्यांना आपण सरसकट ‘नैराश्य’ असे म्हणू शकत नाही. कारण, मानसिक तणावाचा गुणधर्म हाच मुळी वेगळा असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःबद्दल असाहाय्य, निराशावादी, अनियंत्रित भावना वाटू लागतात, तेव्हा असलेला ताण हा त्याच्या मानसिक स्थितीवर परिणाम करीत असतो. त्यावेळी वाटणार्‍या स्थितीला आपण ‘मानसिक तणाव’ असे अर्थोअर्थी म्हणू शकतो. हळूहळू आपली इच्छाशक्ती कमी होऊ लागते, इतरांशी बोलण्यात फारसा रस वाटत नाही, भूक लागत नाही की वेळेवर झोपही येत नाही, निर्णयक्षमता कमी होते. या छोट्या-छोट्या गोष्टी जरी आपल्याला स्वतःमध्ये आढळून आल्या, तरी आपल्या लक्षात यायला पाहिजे की, कुठे तरी आपले मानसिक संतुलन बिघडत आहे.

राजस्थानच्या कोटा शहरात स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी देशभरातून हजारो विद्यार्थी दाखल होतात आणि तिथेच मागील काही महिन्यांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या कित्येक घटनादेखील उघडकीस आल्या आहेत. विद्यार्थ्यांवरील मानसिक ताणाचे पर्यवसान अशा आत्महत्यांमध्ये झालेले प्रथमदर्शनी दिसते. तेव्हा, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण या गंभीर समस्येकडे कसे बघता?

भारतातल्या ज्या उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्था आहेत, तिथल्या शिक्षण प्रकारात आणि इतर भागांतील शिक्षणाच्या प्रकारात नक्कीच फरक आहे. त्यामुळे आपल्याला जे मिळालं नाही, ते आपल्या मुलाला मिळावे, त्याने उच्चशिक्षण घ्यावे, यासाठी प्रत्येक पालक झगडत असतो. पण, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार करता, असं लक्षात येईल की, उच्च दर्जाच्या संस्थांमध्ये सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेलच, असे नाही. काही ठरावीक जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. अशावेळी कोटासारख्या ठिकाणी प्रवेश परीक्षांचा अभ्यास करायला देशाच्या विविध भागांतून विद्यार्थी दाखल होतात. मग इतर विद्यार्थ्यांना बघून त्यांना असं वाटतं की, आपण एवढा अभ्यास करु शकत नाही आणि तिथूनच त्यांची निराशावादी मानसिकतेची स्थिती सुरू होते. ही मानसिक स्थिती जरी विद्यार्थ्यांनी ओळखली, तरी त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना मदतीला कोणी नसतं. शिक्षकांना सांगितलं तर ते म्हणतील की, ‘हे जर तू आता सहन केलं नाहीस, तर तू पुढे उच्च दर्जाच्या महाविद्यालयात कसा प्रवेश मिळवणार? ही सामान्य परिस्थिती तुला हाताळता यायला पाहिजे.’ त्यामुळे कुठे तरी विद्यार्थ्यांना स्वतःबद्दल कमीपणा वाटू लागतो. यातून मानसिक ताणतणाव अधिक वाढू लागतो. त्यामुळे कोटासारखी ठिकाणं ही अतिताणाचे ‘क्लस्टर’ बनली आहेत. याठिकाणी संरक्षणात्मक घटकांचा अभाव आहे आणि जोखमीचे घटक अधिक आहेत. अशा परिस्थितीत म्हणूनच मदत मिळेपर्यंत विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतलेला असतो.

हा प्रश्न केवळ विद्यार्थ्यांच्याच मानसिकतेशी निगडित नाही, तर पालकांची मानसिकता, त्यांची भूमिकाही यामध्ये तितकीच महत्त्वाची. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांशी एकंदरीतच वागताना, बोलताना नेमक्या कोणत्या बाबींचा प्रकर्षाने विचार करायला हवा?

जेव्हा कुठलाही विद्यार्थी मानसिक तणावाला सामोरा जात असतो, तेव्हा त्याच्यातील स्वयंप्रेरणा ही कमी झालेली असते. त्यामुळे अशा पाल्यांना सर्वप्रथम पालकांनी समजून घेणं, हे खूप महत्त्वाचं. समजा, आपला हात दुखतोय तर आपण निश्चितच डॉक्टरकडे जातो. पण, मानसिक त्रासासाठी, ताणासाठी अशाप्रकारे वैद्यकीय मदत शोधण्याचे प्रमाण मुळी फार कमी आहे. विद्यार्थी स्वतःच मानसोपचारतज्ज्ञांकडे जातील, याची शक्यता तशी कमीच असते. मघ अशावेळी आजूबाजूच्या इतर विद्यार्थ्यांनी, मित्रांनी, पालकांनी त्या विद्यार्थ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नैराश्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या विचारांत, वागण्यात, स्वभावात, बोलण्यात नक्कीच बदल होत जातो. त्यावेळी ही स्थिती पालकांच्या लक्षात आली, तर त्यांनी आपल्या मुलाची अधिक आपुलकीने विचारपूस केली पाहिजे. पाल्याला धीर दिला पाहिजे. तसेच मानसोपचारतज्ज्ञांकडे समुपदेशनासाठी आवर्जून नेले पाहिजे.

पालकांप्रमाणेच सोबतच्या मित्रमैत्रिणींनीसुद्धा जागृत राहणे तितकेच गरजेचे. काहीवेळा विद्यार्थी आपल्या मित्रमैत्रिणींना सांगतात की, ‘मला काही झालं तर माझी पुस्तकं तू वापर’ किंवा त्यांच्या वागण्यात असे बरेचसे बदल होत असतात. त्यावेळी सोबतच्या मित्रमैत्रिणींनी आपल्या सहाध्यायीला समजून घेऊन धीर देणे गरजेचे असते. पण, बरेचदा शक्यता अशी असते की, मदतीसाठी प्रयत्न करताना वेळ खूप कमी मिळतो. दरम्यान, विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल गाठलेले असते. म्हणून मानसिक तणावाची लक्षणं लवकरात लवकर लक्षात येणं तितकचं महत्त्वाचं आहे. अशावेळी पालक, शिक्षक, मित्रमैत्रिणी अशा सगळ्यांचीच भूमिका अत्यंत महत्त्वाची.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी, त्यांच्या मनात नव्याने उमेद जागृत करण्यासाठी पालक, मित्रमैत्रिणींबरोबरच प्रशासकीय व सामाजिक स्तरावर नेमक्या कोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे?
 
२०१७ साली मानसिक आरोग्याविषयी काही अधिनियम तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार मानसिक आरोग्य केंद्र उभारणे प्रशासनाला अनिवार्य आहे. पण, मानसिक आरोग्य केंद्र उभारायचे तर त्याची व्यवस्था कोण बघणार? त्यासाठी निधी किती मिळणार? तज्ज्ञांची निवड कशी करणार? या सर्व बाबींची निश्चिती करणे गरजेचे आहे. सध्या गरजेच्या तुलनेत ०.००३ टक्के मानसोपचारतज्ज्ञ उपलब्ध आहेत. जसा ‘१००’ हा पोलिसांचा हेल्पलाईन नंबर आहे, त्याप्रमाणेच मानसिक आरोग्याविषयी एखादा हेल्पलाईन क्रमांक तयार केला पाहिजे. तसेच आत्महत्या प्रतिबंध योजना आखल्या पाहिजेत. आत्महत्यास्थळी प्रथम पोहोचणार्‍यांनी नेमकं काय केलं पाहिजे, पालकांना कसा धीर दिला पाहिजे, पोलीस, माध्यमे, डॉक्टर यांनी ही स्थिती नेमकी कशी हाताळली पाहिजे, याविषयीच्या जनजागृतीसाठीही कार्यशाळा, तत्सम उपक्रम आयोजित करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे.

आपल्या पाल्याच्या आत्महत्येनंतर पालकांनाही या घटनेचा साहजिकच मोठा मानसिक आघात सहन करावा लागतो. अशावेळी पालकांनाही मानसिक आधाराची गरज असते. तर अशा पालकांना, त्यांच्या नातेवाईकांना काय सल्ला द्याल?

यावेळी फक्त पालकच नाही, तर त्यांचे मित्रमैत्रिणी, सोबती या सगळ्यांनाच आधाराची गरज असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा एखादी व्यक्ती दुःखात असते, तेव्हा व्यक्त होण्याची कोणतीच योग्य किंवा अयोग्य पद्धत नाही. घरातील सदस्याच्या आत्महत्येच्या दुर्देवी घटनेनंतर जेव्हा त्या कुटुंबातील अन्य सदस्य महिन्याभरात शिक्षणासाठी बाहेर पडतात, कामावर रुजू होतात, तेव्हा लोक विचारतात की, एवढा अपघात झाला, त्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का? पण, दुःखातून बाहेर येण्यासाठी काय करायचं, हा मुळात प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपल्या पाल्याला गमावल्यानंतर वेळेआधी ही परिस्थिती आपल्या लक्षात आली नाही, आपण समजून घ्यायला कमी पडलो, अशी अपराधी भावना पालकांच्या, मित्रमैत्रिणींच्या मनात खूप काळ कायम घुटमळत राहते. घटनेनंतरचा हा जो पश्चाताप आहे, तो अगदी सामान्य आहे. नैसर्गिक पद्धतीने दुःख व्यक्त करण्याचा हा भाग आहे. म्हणून अशा कुटुंबातील सदस्यांनीसुद्धा गरज पडल्यास मानसोपचारतज्ज्ञांकडे नक्कीच गेले पाहिजे.

विद्यार्थ्यांवरील वाढता ताण, अटीतटीची स्पर्धा आणि पर्यायाने होणार्‍या आत्महत्या हे नकारात्मक चित्र नवीन शिक्षण धोरणामुळे बदलेल, असे वाटते का?

संधी, समानता, गुणवत्ता, क्षमता आणि जबाबदारी हे नवीन शैक्षणिक धोरणाचे पाच प्रमुख स्तंभ आहेत. यामुळे कमी दर्जाच्या शैक्षणिक केंद्रांवर लक्ष दिले जाईल आणि ‘कोटा’, ‘आयआयटी’सारख्या ठिकाणी जाऊनच मला उच्च दर्जाचे शिक्षण मिळेल, ही धारणा काहीशी कमी होईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्थलांतर करायची गरज नाही पडणार. कारण, जेव्हा तुम्ही स्थलांतर करता, तेव्हा कुटुंब, इतर नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्यापासून आपण लांब जातो. त्यामुळे तो देखील एका वेगळ्या प्रकारचा ताण असतो. हा ताण कमी होण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाचा नक्कीच उपयोग होईल.

मानसशास्त्र हा विषय महाविद्यालयीन स्तरावर शिकवला जातो. मात्र, शालेय जीवनापासूनच मानसशास्त्राविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली, तर फरक पडेल का?

नक्कीच पडेल. खरं तर मानसशास्त्र हा विषय म्हणून शिकवण्यापेक्षा शिक्षकांनी शालेय पातळीपासून मानसिक ताणतणावांना कसे सामोरे जायचे, याबद्दल विद्यार्थ्यांना आवर्जून मार्गदर्शन केले पाहिजे. पण, त्याविषयी परीक्षा घेऊन त्याला गुण देणार असाल तर मग याबाबत जागरूकता करणे कठीणच. याऐवजी मानसिक संतुलन विस्कळीत झाल्यावर काय प्रथमोपचार केले पाहिजेत, याबद्दल मार्गदर्शन करावे किंवा भावनिक विकास कसा होईल, याबाबत अभ्यासक्रम तयार करावा. तसेच सर्व शाळांमध्ये आत्महत्या प्रबंधक शिबिरे आयोजित केली पाहिजेत. मानसिक तणावाबाबतची लक्षणे पालक, विद्यार्थी, मित्रमैत्रिणी यांनी ओळखली पाहिजेत. ‘आत्महत्या’ या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. तसेच गरज पडल्यास तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. ज्याप्रमाणे शारीरिक त्रासाने आपण आजारी पडतो, त्याचप्रमाणे मानसिक आजारसुद्धा असतात. त्यामुळे यात काहीही कमी वाटण्यासारखं नाही.


-साक्षी रावणंग