‘कोविड’मध्ये ठाकरेंचे भ्रष्टाचार : उदय सामंत

    11-Oct-2023
Total Views |

Uday Samant


ठाणे : ‘कोविड’ काळात उद्धव ठाकरे सरकारने भ्रष्टाचार केला, असा भंडाफोड उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. संभाजीनगर व नांदेड येथे घडलेल्या दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहेत परंतु, विरोधकांनी त्याचे राजकारण न करता सूचना कराव्यात, असे आवाहन उद्योगमंत्री सामंत यांनी केले. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री काय जादुगार नाहीत, तरी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यात सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘कोविड’मध्ये शव ठेवण्यासाठीच्या बॅगा पुणे, कोल्हापूर, ठाण्यामध्ये ३५० ते ४०० रुपयांना मिळते. तीच बॅग मुंबई महापालिकेने ६ हजार, ५०० रुपयांना खरेदी केली. ही तफावत ‘कॅग’ चौकशीदरम्यान समोर आली. देशात ५ लाख, ३२ हजार मृत्यू झालेत. त्यातील १ लाख, ४८ हजार, ५६१ महाराष्ट्रात झालेत. त्यामुळे ‘कोविड’ काळात उद्धव ठाकरे सरकारने भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले. पण, त्यावेळेस आम्ही मात्र ‘कोविड’चे राजकारण केले नाही. आता मात्र विरोधी पक्षाचे नेते याबाबत सरकारशी कोणतीही चर्चा न करता राज्यातील सरकारला बदनाम करण्याचे काम करत असल्याचे मंत्री सामंत म्हणाले. ‘कोविड’ काळात जेव्हा फिरायचे होते, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री घरी बसून फेसबुक लाईव्ह करायचे, असा टोलाही त्यांनी लगावला.