ब्रिटन काय कारवाई करेल?

    11-Oct-2023   
Total Views |
Rishi Sunak said Hamas are terrorists, not freedom fighter

इस्रायल-हमास-पॅलेस्टाईन संदर्भातल्या युद्ध हिंसात्मक घटनांनी सगळे जग विमनस्क अवस्थेत आहे. ‘हमास’च्या कू्रर, राक्षसी कृत्याने जगभरात संतापाची लाट उठली. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ‘हमास’ हे विद्रोही किंवा लडाकू किंवा स्वातंत्र्यसैनिक वगैरे नसून, ते क्रूर दहशतवादीच आहेत, असे ठामपणे म्हटले. एक काळ होता, जेव्हा ब्रिटनच्या साम्राज्यात सूर्य मावळत नव्हता. त्या ब्रिटनला आता धर्मांध, अविवेकी लोकांचे ग्रहण लागण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण, ‘हमास’च्या राक्षसी दहशतवादी कृत्यांचे जगभरात कुणीही उघड-उघड समर्थन केले नाही. अर्थात, जगभरात ‘हमास’सारखेच विकृत विचारांचे लोक आहेत. त्यांना ‘हमास’च्या दहशतवाद्यांची हिंसा आवडलीही; पण तसे कसे बोलणार? म्हणून मग ‘हमास’ची उघड बाजू न घेता पॅलेस्टाईनवर इस्रालय हुकूमशाही लादतो, अत्याचार करतो म्हणून हे सगळे घडले, अशी सारवासारव या लोकांनी करायला सुरुवात केली. पण, ते एका चौकटीत. आपल्याकडे काँग्रेसने नाही का, पॅलेस्टाईनचे समर्थन केले. पण, हे सगळे आधीच सांगितल्याप्रमाणे एका चौकटीमध्ये. या सगळ्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये काय घडले?

तिथे ‘हमास’ने इस्रायलवर क्रूर हल्ला केला म्हणून पाच हजारांच्यावर मुस्लीम एकत्र आले. त्यांनी जल्लोष साजरा केला. अत्यानंदाने ते चेकाळले. ‘हमास’च्या दहशतवाद्यांनी एका नग्न मृत स्त्रीदेहाची विटंबना केली. लहान बालिका, वृद्ध महिला यांच्यावर बलात्कार केला. त्यांचा खून केला, निष्पाप लोकांना हालहाल करून मारले. या सगळ्या भयंकर विकृत घटनेबद्दल या लोकांना जराही वाईट वाटलेले दिसले नाही. उलट छान झाले, खूपच सुंदर, असे हे लोक म्हणत होते. एका महिलेने तर भाषण ठोकले की, ”बरे झाले, ‘हमास’च्या पोरांनी खूप चांगले केले. खूपच शानदार आणि सुंदर काम.” या लोकांना माणूस म्हणावे का? ब्रिटनमध्ये या लोकांना उघड-उघड दहशतवादी कृत्याचे समर्थन करणे इतके सुरक्षित कसे वाटले? याच ब्रिटनमध्ये मागे सरकारने जाहीर केले होते की, 20 वर्षांत ब्रिटनच्या पाच लाख बालिकांना अमली पदार्थांची नशा लावली गेली आणि त्यांना देहविक्री करण्यास भाग पाडले गेले. याचे गुन्हेगार कोण, तर 99 टक्के पाकिस्तानी मुस्लीम आणि एक टक्का आफ्रिकी मुस्लीम. बालिकांवरचे अत्याचार कमी होण्यासाठी ब्रिटनने तिथे पोलिसांची एक स्वतंत्र तुकडीही बनवली.
 
ब्रिटन आणि तिथे एकवटलेले हे ‘हमास’च्या दहशतवादाला समर्थन करणारे लोक, तिथल्या बालिकांवरचा अत्याचार, हे सगळे पाहून आजच्या दिवशी म्हणजे दि. 12 ऑक्टोबर रोजी 1871 साली ब्रिटिशांनी भारतातल्या काही जातींना गुन्हेगारी जातीचा शिक्का मारला, हे वाचलेले आठवले. या जाती राज्यभर, देशभर संचार करीत असत. त्यामुळे कुठे काय घडले, याची बातमी त्यांच्याकडे असे. देशाच्या कानाकोपर्‍यात काय घडले, याची विस्ताराने माहिती त्यांच्याकडे असायची. या सगळ्या माहितीमुळे आणि प्रत्यक्ष लोकसंपर्कामुळे या समाजबांधवांना कळले होते की, ब्रिटिश लबाडीने अत्याचार करत देश गिळंकृत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच यापैकी बर्‍याचशा समाजगटांच्या हातात कला होती. समाजगाडा व्यवस्थित चालावा, यासाठीचे कष्ट, कौशल्य त्यांच्याकडे होते. त्याचबरोबर हा समाज धर्मकर्म आणि रितीरिवाजांबाबतही कट्टरच होता.

धर्माने आणि संस्कृतीने दिलेले मानवी स्वातंत्र्य बांधवांच्या रक्तात होते. भारतावर अधिपत्य गाजवायचे असेल, तर या समाजगटांवर अंकुश ठेवायलाच हवा, हेे लबाड आणि धूर्त ब्रिटिशांनी जाणले आणि त्यांनी दि. 12 ऑक्टोबर 1871 रोजी या समाजगटांना गुन्हेगार ठरवत त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. अक्षरशः पशूसारखे जगणे त्यांच्या नशिबी आले. स्वतंत्र भारतात या समाजगटांवरचे ते क्रूर अमानवी निर्बंध उठले. पण, जखमा ताज्याच आहेत. ब्रिटिशांनी मारलेला तो गुन्हेगारीचा शिक्का आजही या समाजबांधवांच्या जीवनाला शाप बनून राहिला आहे.आता जगाच्या पाठीवर काय घडते, हे लिहिताना इंग्रज आणि त्यांनी षड्यंत्र रचत गुन्हेगार ठरवलेल्या जाती यांचा उल्लेख करावासा वाटला. कारण, ब्रिटिशांनी 18व्या शतकात भारतीय समाजघटकाला गुन्हेगार ठरवून त्यांच्यावर निर्बंध लादले. मग पॅलेस्टाईनच्या नव्हे, तर ‘हमास’च्या नावाने जल्लोष करणार्‍या, त्या ‘हमास’ समर्थकांवर ब्रिटन काय कारवाई करेल? ब्रिटन दहशतवादी समर्थकांवर गुन्हेगारीचा शिक्का उमटवणार का?





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.